“वशिलेबाजां’ची पदोन्नती धोक्‍यात?

आयुक्‍तांनी मागविली “कुंडली’ : अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
अमोल शित्रे
पिंपरी  – महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या कार्यकाळात दिलेल्या पदोन्नतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय वाढल्यामुळे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी वाघमारे यांच्या काळातील पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची माहिती प्रशासनाकडून मागविली आहे. यामुळे पैसे देऊन पदोन्नती घेतलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या पदोन्नती धोक्‍यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर 11 सहायक आयुक्त पदांना राज्य शासनाची मंजुरी आहे. त्यापैकी 6 पदे शासनाच्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमधून भरली जातात. तर, उर्वरीत 5 पदे महापालिका सेवेतील प्रशासन अधिकारी संवर्गातून भरण्यात येतात. त्यातील एक पद अनुसूचित जाती (प्रवर्ग) साठी राखीव ठेवण्यात आले. या पदावर अनेक वर्षांपासून पदोन्नती देण्यात आली नाही. परंतु, आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या कार्यकाळात अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांना अनुभवाची अट शिथील करून सहायक आयुक्त पदावर प्रभारी म्हणून नेमण्यात आले. तर, महापालिका सेवेतील प्रशासन अधिकारी संवर्गातील दुसरे रिक्त सहायक आयुक्त पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार प्रथम क्रमांक मनोज लोणकर यांना खुल्या प्रवर्गातून अनुभवाची अट शिथील करून प्रभारी म्हणून नेमण्यात आले.

त्याचबरोबर स्थापत्य विभागातील सह शहर अभियंता पदावर बढती होऊन रिक्त होणाऱ्या व नव्याने निर्माण होणाऱ्या कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदासाठी शैक्षणिक अर्हता व अनुभवाची अट शिथील ठेवून उपअभियंता मनोज सेठिया, राजेंद्र राणे, विजयकुमार काळे, शिरीष पोरेडी, अजय सूर्यवंशी आणि सुनिल भागवानी यांना कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती देण्यात आली. यासह अन्य पदोन्नत्या आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या कार्यकाळात झाल्या आहेत. त्यातच वाघमारे यांची बदली होण्याच्या तोंडावरच त्यांचा स्वीय्य सहायक राजेंद्र शिर्के याला 12 लाखांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणामुळे आयुक्त वाघमारे यांची प्रतिमा मलीन झाली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नवनियुक्त आयुक्त हर्डिकर यांनी पदोन्नती झालेल्या सर्वच अधिकाऱ्यांची माहिती प्रशासनाकडून मागविली आहे. त्यामुळे वाघमारे यांच्या कार्यकाळात बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्वतःचा बचाव करण्यासाठी हे अधिकारी धडपड करीत आहेत. परंतु, आयुक्त हर्डिकर यांची कार्यपध्दती अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय असल्याची चर्चा असल्यामुळे अधिकाऱ्यांची पदोन्नती धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.

प्रशासनाकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर अन्याय
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध घटकातील नागरिकांच्या कल्याणासाठी महापालिकेतर्फे विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी पालिकेत नागरवस्ती विकास योजना हा स्वतंत्र विभाग आहे. या विभागातील सहायक आयुक्त (सामुहिक विकास) हे पद पदोन्नतीने भरण्यासाठी शासन मान्य असताना महापालिका प्रशासनाकडून जाणूनबुजून या पदावर प्रशासनाचा अधिकारी नेमला जातो. यामुळे अर्हता व सेवा कालमर्यादेनुसार पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे. या विभागाचा गाडा कनिष्ठ अधिकाऱ्यांनी हकायचा आणि त्याचे श्रेय मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्याने लाटायचे, असा कारभार गेली अनेक वर्षे या विभागात सुरू आहे. वशिलेबाज अधिकाऱ्यांची सर्वच विभागामध्ये चलती आहे. आयुक्‍त हर्डिकर यांच्या कार्यकाळात प्रशासनातील या त्रुटी दूर होतील, अशी अपेक्षा इतर अधिकारी व्यक्‍त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)