वर्तमान: #MeToo वादळ 

श्रीकांत नारायण 

गेल्या काही दिवसापासून मी-टू’ च्या वादळाने देशात थैमान घातले आहे. सोशल मीडियामुळे या वादळाची तीव्रता घराघरात पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तिच्यासंबंधी घडलेल्या एका गैरप्रकाराला वाचा फोडली आणि पाहता पाहता तिच्या या ‘ठिणगी’चे रूपांतर वणव्यात झाले. त्यानंतर अनेक क्षेत्रातील महिलांनी या संधीचे निमित्त साधून आपल्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या अन्यायाच्या तक्रारी जाहीरपणे मांडायला सुरुवात केली त्यामुळे हा वणवा आता भडकतच चालला आहे.

-Ads-

वास्तविक अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने आरोप केलेले प्रकरण खूप जुने म्हणजे नऊ वर्षांपूर्वीचे आहे. ‘हॉर्न ओके प्लिज…’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्याशी लगट करून विनयभंग केला असा तिचा आरोप आहे. याप्रसंगी सेटवर उपस्थित असलेले नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग (लालन आणि कमलाकर सारंग यांचे चिरंजीव) आणि निर्माते सामी सिद्दीकी यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही असाही तिचा आरोप आहे. नाना पाटेकर, गणेश आचार्य, सारंग आणि सामी सिद्दीकी यांनी अर्थातच तनुश्री दत्ता हिचे आरोप फेटाळून लावले आहेत. “कल का सच, आज भी सच है और कल भी वो सचही रहेगा’ असे पाटेकर यांना वाटत आहे तर सिद्दीकी यांनी तर असा काही प्रकार घडलाच नाही. केवळ पब्लिसिटी स्टंटसाठी तनुश्रीने असे आरोप केले आहेत असा उलटा आरोप केला आहे. परंतु हे प्रकरण आता केवळ आरोप-प्रत्यारोपावर थांबले नाही तर याप्रकरणी तनुश्री दत्ता हिने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात चौंघांविरुद्ध तक्रार केली आहे.

काही अभिनेत्रींनीं तनुश्रीच्या पाठीशी उभे राहताना आपल्याला आलेल्या अशाच अनुभवांची उजळणी केली आहे. निर्मात्या विनिता नंदा तसेच अभिनेत्री संध्या मृदुल यांनीही अनेक मालिकांमधून ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून आपली प्रतिमा ठसविणारे अभिनेते आलोकनाथ यांच्यावर तर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अशा अनेक पीडित महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई, दिग्दर्शक विकास बहल, साजिद खान यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांवर आता असे आरोप व्हायला सुरुवात झाली आहे. मॉडेल-अभिनेत्री असलेल्या अमन संधू हिने तर ‘कास्टिंग काऊच’चा आरोप करून दिग्दर्शक दीपक मिश्रा यांचे सर्वांसमोर थोबाड रंगविले. सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावर देखील काही वर्षांपूर्वी एका मॉडेल-अभिनेत्रीने “कास्टिंग काऊच’ चा आरोप करून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

केवळ चित्रपटसृष्टीतील नव्हे तर पत्रकारिता, क्रीडा, आणि अन्य क्षेत्रातील अशी प्रकरणेही आता बाहेर येत आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री आणि दीर्घकाळ संपादकपद भूषविणारे एकेकाळचे वरिष्ठ पत्रकार एम. जे. अकबर यांच्याविरुद्ध सात महिला पत्रकारांनी लैगिक शोषणाचा आरोप केला आहे. मनेका गांधी, स्मृती इराणी यांच्यासारख्या महिला मंत्र्यांनीही अकबर यांच्यावरील आरोपाची शहानिशा करण्याची मागणी केली आहे. अकबर यांच्यावरील या आरोपाने मोदी-विरोधकांना मात्र आयतेच कोलीत हातात सापडले आहे. त्यामुळे अकबर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मोदी सरकारचीही अब्रू वाचवावी.

अशा प्रकरणाचा मागोवा घेतल्यास यासंदर्भात अनेक प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. संबधित अभिनेत्रींनीं असे प्रकार करणाऱ्या संबधित अभिनेत्यांविरुद्ध त्याच वेळेला लगेच का तक्रार केली नाही? तनुश्री दत्ता हिचे प्रकरण तर जवळजवळ नऊ वर्षापूर्वीचे आहे. हा प्रकार घडल्यानंतर ती रागाने सेट सोडून गेली होती हे खरे असले तरी तिने त्याचवेळी नाना पाटेकर आणि अन्य जणांविरुद्ध तक्रार का केली नाही? तिने तक्रार करू नये म्हणून तिच्यावर कोणी दबाव टाकला होता का? तिने केलेल्या आरोपांवर त्यावेळी कोणी विश्‍वास ठेवला नसता का? आणि दहा वर्षांनंतर असे आरोप करून बॉलीवूडमध्ये खळबळ माजविण्याचे नेमके कारण कोणते? या प्रकरणाची वाच्यता करण्यासाठी तिला किंवा अन्य अभिनेत्रींना आत्ताच का जाग यावी? असे काही प्रश्‍न साहजिकच निर्माण होतात अर्थात या प्रश्‍नांना तनुश्री किंवा अन्य अभिनेत्रीच नेमके उत्तर देऊ शकतील. पण पुन्हा त्यांच्याबाबत विश्‍वासार्हतेचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.
शिवाय अशा प्रकरणाची दुसरी बाजूही लक्षात घेण्याची आवश्‍यकता आहे.

आधुनिकतेच्या नावाखाली चित्रपटसृष्टीतील वातावरण वरचेवर इतके ‘खुल्लमखुल्ला’ होत आहे की, त्याला कसलाही धरबंद राहिलेला नाही. सेटवरचे वातावरणही अनेकदा खूपच मोकळे असते. एखाद्या चित्रपटाचा ‘प्रीमिअर’ असो की पुरस्कार सोहळा असो तेथे ‘गळामिठी’ चे प्रकार इतके कॉमन झाले आहेत की विचारता सोय नाही शिवाय अशा कार्यक्रमांना कमीत कमी तोकड्या कपड्यात उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्रींमध्ये जणू स्पर्धांचं लागलेली असते. अशा प्रतिष्ठित, वजनदार असामीविरुद्ध तक्रार केल्यास करिअरच्या दृष्टीने आपले चित्रपटसृष्टीत पुढे काय होईल? याचाही त्यांना विचार करावा लागतो.

‘मी-टू’च्या वादळाचे रूपांतर चळवळीत झाले तर आगामी काळात गैरवर्तनाचे असे प्रकार निश्‍चितच थांबतील. आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्यांच्यासारख्या अभिनेत्रींनीं हा लढा शेवटपर्यंत पुढे न्यावा. सोशल मीडियाद्वारे समाजाची शक्ती त्यांच्या बाजूने उभी राहिल्यास संबंधितांना चांगला धडा मिळून अशा प्रकारांना आळा बसू शकेल. सध्या निर्माण झालेल्या ‘मी-टू’ च्या वादळाचा हाच अन्वयार्थ आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)