वर्तमान ‘स्टॅन ली : सुपरहिरोंचा सुपरनिर्माता’ 

श्रीकांत नारायण 

जनमानसाला अक्षरशः वेड लावणाऱ्या ‘स्पायडरमॅन’, ‘आयर्न मॅन’, ‘द हल्क’, ‘ब्लॅक पॅंथर’ ‘डेअरडेव्हील’, ”एक्‍समेन, ‘फॅन्टॅस्टिक फोर’ आदी फॅन्टॅस्टिक सुपरहिरोंचा सुपरनिर्माता स्टॅन ली नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. केवळ कॉमिक्‍स बुक जगतात नव्हे ‘टॉईज’, ‘व्हिडीओ गेम्स’, टीव्ही मालिका, चित्रपट आदी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे ‘सुपरहिरो’ गाजले. अद्‌भुत विषयाचा आगळावेगळा इतिहास निर्माण करणाऱ्या स्टॅन ली यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. 

गेली अनेक वर्षे कॉमिक जगतावर आपले अधिराज्य गाजविणारे स्टॅन ली नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. सुदैवाने त्यांना भरपूर आयुष्य लाभले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. जणू काही परमेश्‍वरानेच त्यांना त्यांचे स्वतंत्र अद्‌भुत जग निर्माण करण्यासाठी पृथ्वीतलावर पाठविले असावे. कारण त्यांनी निर्माण केलेल्या “स्पायडरमॅन’, “आयर्नमॅन’, “द हल्क’, “थोर’ “ब्लॅक पॅंथर’ “डेअरडेव्हील’, “एक्‍समेन, “फॅन्टॅस्टिक फोर’ आदी फॅन्टॅस्टिक सुपरहिरोंनी जनमानसाला अक्षरशः वेड लावले होते. केवळ लहान मुलांच्याच नव्हे तर तरुण आणि प्रौढ वाचकांच्या मनातही या सुपरहिरोंनी घर निर्माण केले होते. या सुपरहिरोंनी त्यांना अब्जावधी रुपयाची कमाई करून दिली. संपत्तीचे त्यांना फारसे अप्रूप नव्हते. आपल्या कल्पना आणि प्रतिभेला सातत्याने ‘भरारी’ मारायला लावून त्यांनी एकानंतर एक असे अनेक सुपरहिरो निर्माण केले. अगदी अलीकडे “डर्टमन’ या सुपरहिरोची निर्मिती करण्याच्या त्यांचा विचार होता आणि त्यादृष्टीने ते कामाला लागला होते. मात्र, दुर्देवाने या “डर्टमन’ची निर्मिती अर्धवटच राहिली आणि आणखी एका सुपरहिरोला रसिक प्रेक्षक मुकले.

स्टॅनली यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथे झाला. रूमानियानधून निर्वासित म्हणून आलेले त्यांचे वडील एक साधे शिंपी-कामगार होते. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती तशी गरिबीचीच होती. लहान असतानाच अर्थार्जनासाठी त्यांना सुरुवातीला पेपरविक्रेता आणि नंतर ऑफिसबॉयची नोकरी करून शिक्षण पूर्ण केले. मात्र, लहानपणापासूनच स्टॅन ली यांना अद्‌भुत कल्पनांचे वेड होते. साहसी कल्पनांनी भरलेली पुस्तके हे त्यांचे जणू खाद्य होते. त्यामधूनच त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचत असत. पदवीधर झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी एका थिएटर कंपनीत काम केले आणि काही स्टेज शोसाठी लेखनही केले. मात्र, तेथे त्यांचे मन रमले नाही. 1939 साली म्हणजे त्याच्या वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांना मार्व्हल या कॉमिक पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या कंपनीत नोकरी लागली. तेथेच त्यांनी स्टॅन ली या टोपण नावाने काही अद्‌भुत प्रकारच्या गोष्टी लिहायला सुरुवात केली. दोनच वर्षांनी त्या कंपनीतील एका संपादकाची जागा रिकामी झाली आणि त्या जागेवर अवघ्या 19 वर्षाच्या स्टॅन ली यांची वर्णी लागली. 1941 साली स्टॅन ली यांनी “डिस्ट्रॉयर’ या आपल्या पहिल्या सुपरहिरोची निर्मिती केली. “मिस्टिक कॉमिक्‍स’ मधून “डिस्ट्रॉयर’च्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या आणि पाहता पाहता त्या लोकप्रिय झाल्या. त्यामुळे स्टॅन लींचा आत्मविश्‍वास दुणावला आणि त्यांची लेखणी विविध कल्पनांनी बहरू लागली.

दरम्यान, 1942 साली स्टॅन ली अमेरिकेच्या लष्करात भरती झाला. वायरलेस ऑपरेटर म्हणून त्याची नोकरी दळणवळण विभागात होती. त्यानंतर त्यांची बदली फिल्म डिव्हिजन विभागात झाली. लेखन करणे, कार्टून्स काढणे आदी प्रकारची कामे तो त्या विभागात करीत असे. ‘प्लेराईट’ हे पद त्यांना देण्यात आले होते. अमेरिकन लष्करात ‘प्लेराईट’ हे पद मिळविणारे अवघे नऊ जण होते.

दुसऱ्या महायुद्धापर्यंत म्हणजे 1945 पर्यंत स्टॅन ली लष्करात होता. त्यानंतर त्यांनी लष्कराची नोकरी सोडली आणि ते पुन्हा कॉमिक जगतात लेखक म्हणून परतले. ‘मार्व्हल’ कंपनीत काम करीत असताना त्यांनी एकेका ‘सुपरहिरो’ला जन्म द्यायला सुरुवात केली आणि त्यांचे हे ‘सुपरहिरो’ आबालवृद्धांना इतके आवडू लागले की त्यांच्या कॉमिक्‍स बुकवर वाचकांच्या उड्या पडू लागल्या. त्यामुळे कंपनीत त्यांचे महत्त्व हळूहळू वाढू लागले आणि एक दिवस त्यांनी त्या कंपनीचाच ताबा घेतला. मात्र, मालक झाल्यामुळे त्यांचे लेखन थांबले नाही तर आपल्या प्रतिभावान चतुरस्त्र लेखणीतून त्यांनी आणखी काही “सुपरहिरो’ निर्माण केले. ‘सुष्ट आणि दुष्ट शक्‍तींच्या संघर्षात शेवटी सुष्टांचाच विजय होतो’ हेच अंतिम सत्य त्यांच्या या ‘सुपरहिरो’ निर्मितीमागे होते त्यामुळे त्यांच्या प्रत्येक ‘सुपरहिरो’ला मोठ्या प्रमाणावर वाचकांची पसंती मिळत गेली आणि हे “सुपरहिरो’ अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

1980 च्या सुमारास “स्पायडरमॅन’, “द हल्क’, “ब्लॅक पॅंथर’ “डेअरडेव्हील’, “एक्‍समेन, “फॅन्टॅस्टिक फोर’ हे त्यांचे “सुपरहिरो’ टीव्ही मालिकांमधून झळकायला सुरुवात झाली आणि घराघरात गेलेल्या या “सुपरहिरोंनी’ बच्चेकंपनीला अक्षरशः वेड लावले. विशेषतः त्याकाळी “स्पायडरमॅन’ ने खूपच धुमाकूळ घातला होता व तो लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला होता. त्यानंतर काही वर्षांनीच त्याच्या “स्पायडरमॅन’, “हल्क’, “आयर्नमॅन’, “डेअरडेव्हील’, “एक्‍समेन, “फॅन्टॅस्टिक फोर’ या ‘सुपरहिरोंची मालिकाच एकेक करून मोठ्या पडद्यावरही आली या सुपरहिरोंचे मानवी स्वरूपही प्रेक्षकांना खूपच भावले आणि सर्वच सुपरहिरो मोठ्या पडद्यावर लोकप्रिय झाले. प्रेक्षकांचा हा अमेझिंग प्रतिसाद पाहून स्टॅन ली यांची लेखणी आणखी बहरली. या “सुपरहिरों’च्या प्रत्येक चित्रपटात स्टॅन ली यांची एक छोटीशी भूमिका असायचीच. त्यामुळे आपण अभिनयातही मागे नाही हेच जणू त्यांनी सिद्ध केले होते. या चित्रपटांचा नफा तर अब्जावधी रुपयांचा होता. ‘स्पायडरमॅन’च्या रॉयल्टीबाबत चालू असलेल्या एका खटल्यात त्यांना केवळ तडजोडीसाठी दहा दशलक्ष डॉलर्स एवढी नुकसानभरपाई मिळाली होती.

केवळ कॉमिक्‍स बुक जगतात नव्हे “टॉईज’, “व्हिडीओ गेम्स’, टीव्ही मालिका, चित्रपट आदी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे सुपरहिरो गाजले आणि त्यांनी एक स्वतंत्र इतिहास निर्माण केला. अशा सुपरहिरोंचा सुपरनिर्माता असलेल्या स्टॅन ली यांनी 2002 साली “एक्‍सलसियर ! द अमेझिंग लाईफ ऑफ स्टॅन ली’ आणि 2015 साली “अमेझिंग, फॅन्टॅस्टिक, इनक्रेडिबल’ अशी दोन आत्मचरित्रेही लिहिली. तीही तेवढीच लोकप्रिय ठरली. अद्‌भुत विश्‍व निर्माण करणारे ते खरोखरच एक अद्‌भुत निर्माते होते, असेच म्हणावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)