#वर्तमान: सर्वांनीच सदबुद्धीने वागण्याची गरज 

श्रीकांत नारायण 
अग्रपूजेचा मान असलेला गणराया ही बुद्धीची देवता आहे असे मानले जाते. त्यामुळे या गणेशोत्सव काळात सर्वांनाच सद्‌बुद्धीने वागण्याची प्रेरणा मिळो आणि गणेशोत्सव नेहमीप्रमाणे शांततेने पार पडला जावो हीच यानिमित्त सामूहिक सदिच्छा
सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात श्री गणरायाचे नेहमीच्या उत्साहात आगमन झाले आहे. निसर्गाच्या कृपेने यंदा राज्यात चांगला पाऊस झाला आहे. गणरायाच्या कृपेने दुष्काळाचेही सावट नाही. महागाईचे सावट जरूर आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गणरायाचे स्वागत तर धुमधडाक्‍यात झाले आहे. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये गणेशोत्सवाचे पहिल्यापासूनच अप्रूप आहे. प्रामुख्याने या दोन्ही शहरांमध्ये गणेशोत्सवानिमित्त करोडो रुपयांची उलाढाल होत असते.
आपला देश पारतंत्र्यात असताना सामाजिक आणि राजकीय जागृती होण्याच्या दृष्टीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सर्वप्रथम पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला आणि त्याला सामाजिक अधिष्ठान प्राप्त झाले. त्यामुळे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
पुण्यातील अनेक सार्वजनिक मंडळांनी सामाजिक जाणीव ठेवूनच आजपावेतो या गणेशोत्सवाचे सामाजिक अधिष्ठानाचे स्वरूप टिकवून ठेवले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा एक प्रमुख सांस्कृतिक सोहळा म्हणून त्याकडे आजही पाहिले जाते. हा सांस्कृतिक सोहळा आवर्जून पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून तसेच परदेशांतूनही पुण्यात लोक येत असतात. कारण पुण्याच्या गणेशोत्सवाला लोकप्रियतेची एक वेगळीच झालर आहे.
अर्थात, काळानुसार उत्सवाच्या स्वरूपातही बरेच बदल घडून आले आहेत. त्यातील काही बदल स्वागतार्ह मानले, तरी या उत्सवातील आर्थिक राजकारणाच्या जोरावर काही अपप्रवृत्तींचा शिरकावही झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर नियमावलीचे निर्बंध आले. लाऊडस्पीकरची जागा डॉल्बीच्या भिंतींनी घेतल्यामुळे आवाजावर बंधने आली. अर्थात या डॉल्बीच्या भिंतींतून बाहेर पडणारी गाणी ऐकताना आणि त्यावर तरुणाई नाचताना पाहून समाजाची सांस्कृतिक पातळी किती खाली घसरली आहे, याचेच दर्शन घडते. आवाजावर घालण्यात आलेल्या बंधनाचे अनेकवेळा पालन होत नसल्याने त्याचा समाजातील सर्वच घटकांना त्रास होत असतो मात्र “उत्सवा’ला प्राधान्य देण्याचा कल वाढत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. खुद्द न्यायालयाने या डॉल्बीच्या आवाजावर आणि वेळेवर मर्यादा घातली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यासाठी पोलीस खात्याला सहकार्य करण्याची गरज आहे. परंतु गणेशोत्सवात वस्तुस्थिती मात्र नेमकी उलट असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
डॉल्बीच्या आवाजावर आणि वेळेवर मर्यादा घातल्यामुळे नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचे सर्रास प्रकार घडतात. काही लोकप्रतिनिधी “राजे’ तर या प्रकरणात न्यायालय आणि पोलिसांनाच आव्हान देण्याचीच भाषा करतात आणि कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्यांचे समर्थन करतात, ही बाब निश्‍चितच कायदा आणि सुव्यवस्थेला सुरुंग लावणारी आहे. त्यामुळे निष्कारण तणाव निर्माण होतो आणि प्रसंगी गणेशोत्सव शांततेने पार पाडण्याच्या प्रक्रियेला गालबोट लागू शकते.
शेवटी गणेशोत्सव शांततेने पार पाडण्याची जबाबदारी ही पोलीस खात्याची असली तरी त्यासाठी त्यांना नेहमीच सहकार्य करणे हे सर्वांचेच कर्तव्य ठरते. गणेशोत्सव मंडळाशी संबंधित सर्वच घटकांनी आपले हे कर्तव्य पार पडणे हीच अपेक्षा असते. मात्र हा अपेक्षाभंग झाला की शांतताभंगाचा धोका निर्माण होऊ शकतो.
गेल्या काही वर्षात पुण्याच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील गर्दी वरचेवर वाढतच चालली आहे. या गर्दीवर नियंत्रण राखण्याचे काम अनेकदा जिकीरीचे होऊन जाते. त्यासाठीही प्रशासनाला योग्य ते सहकार्य करणे अपेक्षित आहे. गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी रस्त्यावर गणेश मंडप उभारण्यात येतात त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न आणखी गंभीर होतो. अरुंद रस्ते आणि बेशिस्त वाहतूक त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधीच बोजवारा उडालेला आहे. त्यात रस्त्यातील मंडपाची भर पडल्यामुळे आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते.
यावर्षी पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांवरती मेट्रोचे काम चालू असल्यामुळे गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील वाहतुकीचे काय हाल होतील, याचाही अनुभव सगळ्यांनाच घ्यावा लागणार आहे. एकूणच गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेचा सर्वांनी साकल्याने विचार करण्याची गरज आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)