वर्तमान: मोदी वाढवत आहेत जवानांचे मनोबल   

श्रीकांत नारायण 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून भारताची संरक्षण सिद्धता वरचेवर वाढत चालली आहे. त्याची अमेरिका, चीन आदी महासत्तांना दखल घ्यावी लागली आहे. परंतु केवळ संरक्षण सिद्धता चांगली आणि अत्याधुनिक असली म्हणजे झाले एवढ्यावरच मोदी संतुष्ट नाहीत तर ती ज्यांच्याकडे राबविण्याची जबाबदारी आहे त्या लष्करी अधिकारी आणि जवानांचे मनोबल सातत्याने वाढविणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी दिवाळीच्या दिवसांत सीमावर्ती भागातील जवानांना भेटून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळत आहे. 

संरक्षण सिद्धता केवळ अत्याधुनिक आहे असे म्हणून भागात नाही तर ती ज्यांच्याकडे राबविण्याची जबाबदारी आहे, त्या लष्करी अधिकारी आणि जवानांचे मनोबल सातत्याने वाढविणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी दिवाळीच्या दिवसांत सीमावर्ती भागातील जवानांना भेटून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळत आहे. म्हणूनच त्यांचा उपक्रम स्तुत्य मानावा लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“दीपावली की सभी देशवासियों को हार्दिक बध्‌‌‌ा। मेरी कामना है कि प्रकाश का यह पावन पर्व सबके जीवन में सुख, शांति एवं समृद्धि लेकर लाए्‌।’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना उद्देशून खास दीपावलीनिमित्त हा संदेश दिला आणि स्वतः मात्र आपली दिवाळी, देशाची सुरक्षा डोळ्यात तेल घालून करणाऱ्या जवानांसोबत साजरी करण्यासाठी ते सीमावर्ती भागात रवाना झाले. पंतप्रधान झाल्यापासून मोदी प्रत्येक दिवाळी जवानांसोबत साजरी करीत आहेत. या निमित्ताने सीमेवरील जवानांचे मनोबल वाढविण्याचा त्यांचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी सियाचीनसारख्या अतिदुर्गम बर्फाळ भागाला भेट देऊन तेथील जवानांसोबत त्यांनी आपली पहिली दिवाळी साजरी केली. वर्ष 2015 मध्ये पंजाब सीमेवरील भागांना भेटी देऊन तेथील जवानांसोबत आपली दिवाळी साजरी केली. वर्ष 1965 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मोदी यांनी ही भेट दिली होती. वर्ष 2016 मध्ये मोदी यांनी हिमाचल प्रदेशला भेट देऊन इंडो-तिबेटन सुरक्षा जवानांशी संवाद साधत दिवाळी साजरी केली. गेल्यावर्षी त्यांनी जम्मू-काश्‍मीरमधील गुरेझ सेक्‍टरमधील जवानांसोबत आपली दिवाळी साजरी केली. जम्मू-काश्‍मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्याजवळच हा गुरेझ भाग आहे. यावर्षी मोदी यांनी उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेजवळील हर्षिल भागाला भेट देऊन तेथील सीमा सुरक्षा जवानांशी संवाद साधला. तसेच त्यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले.

गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच मोदी प्रत्येक दिवाळी जवानांसोबत साजरी करीत होते. अर्थात मुख्यमंत्री असल्याने त्याला मर्यादा होती. मात्र पंतप्रधान झाल्यापासून ते प्रत्येक दिवाळी जवानांसोबत साजरी करीत असल्यामुळे त्याला विशेष आणि व्यापक महत्त्व आले आहे. भारतीय जनतेच्या तसेच भारतीय जवानांच्या दृष्टीने तो कौतुकाचा विषय ठरला आहे.

वास्तविक पाहता मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतरही काश्‍मीर खोऱ्यात अशांतता आहेच. तेथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळे उपाय केले जात आहेत. मात्र, या प्रयत्नांना अद्याप म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. तेथील जनतेचा जोपर्यंत विश्‍वास संपादन करता येणार नाही, तोपर्यंत तेथे शांतता निर्माण करणे अशक्‍य आहे, अशी सध्याची तेथील परिस्थिती आहे. पाकच्या सीमेवरील कुरबुरीही वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे सरकारला “सर्जिकल स्ट्राईक’चे अस्त्र अवलंबावे लागले. मध्यंतरी पाकिस्तानमध्ये झालेले सत्त्तांतर आणि पाकिस्तानची सध्याची आर्थिक दुरवस्था लक्षात घेता काही काळ भारत-पाक सीमेवर शांतता निर्माण झाल्याचा आभास आहे.

मात्र, अमेरिकेने आर्थिक मदत नाकारली असली, तरी आता चीनकडून भरघोस आर्थिक मदत मिळणार असल्याने पाकिस्तानला केंव्हाही मस्ती येऊ शकते. आणि सीमेवरील त्याच्या कुरापती वाढू शकतात. त्यामुळे भारताने केव्हाही सतर्क राहणे चांगले. हे लक्षात घेऊनच भारताची संरक्षण सिद्धता अधिकाधिक सक्षम ठेवण्याचे मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे भारतीय लष्कराची प्रतिकारक्षमता निश्‍चितच वाढीस लागली आहे. विद्यमान सरकारने गेल्या चार वर्षांत वाटाघाटीत अडकलेले लष्करासंबधीचे अनेक विषय मार्गी लावल्यामुळे भारताची संरक्षण सिद्धता अधिकाधिक मजबूत होण्यास मदत झाली आहे. “अल्ट्रा लाईट हॉवित्झर’ आणि “वज्र-के 9′ सारख्या अत्याधुनिक तोफा भारतीय लष्करात नुकत्याच दाखल झाल्या आहेत. या तोफा जगातील सर्वोत्तम तोफांपैकी आहेत. या स्वयंचलित तोफा हेलिकॉप्टरमधून डोंगराळ भागात कोठेही वाहून नेता येतात. त्यामुळे अतिशय दुर्गम भागातही संरंक्षण सिद्धता आता सुकर झाली आहे.

याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाचे कामही सध्या जोराने सुरू आहे. परंतु केवळ आधुनिकीकरण केल्यामुळे लष्कराची संरक्षण सिद्धता पूर्ण होतेच असे नाही; त्यासाठी लष्करातील जवानांचे मनोबल वाढविण्याचे काम करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी आपली प्रत्येक दिवाळी लष्करी जवानांसोबत साजरी करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम सातत्याने करीत आहेत. म्हणूनच त्यांचा उपक्रम स्पृहणीयच मानावा लागेल. डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करण्याचे काम करणाऱ्या जवानांच्या भरवशावरच प्रत्येक भारतीय नागरिक सुखाने आणि आनंदाने आपली दिवाळी साजरी असतो. त्यामुळे साहजिकच भारतीय जवानांबद्दल त्याला सार्थ अभिमान असल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)