वर्तमान: न्यायालयाची बूज राखणार की नाही?

श्रीकांत नारायण

केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता. यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेली परंपरा मोडीत निघाली होती. त्यामुळे स्त्री-पुरुष भेदाभेद न मानणाऱ्या आधुनिक काळाला अनुसरून घेतलेल्या या निर्णयाचे एकीकडे जोरदार स्वागत होत असतानाच दुसरीकडे या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या विरोधात महिलांही सामील झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाची बुज राखणार की नाही?

शबरीमला हे स्वामी अय्यप्पा यांचे मंदिर आहे. अय्यप्पा हे ब्रह्मचारी होते म्हणून या मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास फार पूर्वीपासूनच बंदी घालण्यात आली होती. कारण महिलांपैकी कोणी रज:स्वला असल्यास मंदिराचे पावित्र्य नष्ट होते, स्वामी अय्यप्पा यांच्या ब्रह्मचर्यालाही बाधा येते, असा मंदिराच्या विश्‍वस्तांचा दावा होता. त्यामुळे कित्येक वर्षांपासून या मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र
सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे नुकतीच ही बंदी उठविली आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च असल्याने अनेकवेळा त्यांनी दिलेला निर्णय अंतिम मानून त्याचे पालन झाले आहे. मात्र, शबरीमला मंदिराच्या व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय जुमानला नाही; त्यामुळे बंदी उठविण्याचा निर्णय जाहीर झाल्यापासून या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येत असून मंदिराचे दरवाजे महिलांना अजूनही बंदच ठेवण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शबरीमला मंदिर हे केरळमधील पंडालम या राजघराण्याच्या मालकीचे आहे. त्यामुळे या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास या राजघराण्याने विरोध केला आहे. “आमची जुनी परंपरा यापुढेही कायम ठेवू आणि मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास प्रतिबंध करू,’ असा निर्धार या राजघराण्याने आणि मंदिराच्या व्यवस्थापनाने केला आहे. थोडक्‍यात सांगायचे तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडविला आहे. याशिवाय या मंदिर प्रवेश प्रकरणात आता उघड उघड राजकारण शिरल्याने हा प्रश्‍न आणखीनच चिघळण्यास मदत झाली आहे.

संस्कृती रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या संघ-भाजपने या मंदिरातील महिलांच्या प्रवेशाला उघडपणे विरोध केला आहे. स्मृती इराणी यांच्यासारख्या केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या महिलेने तर मंदिरातील महिलांच्या प्रवेशाला विरोध करताना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वक्‍तव्य केल्यामुळे आगीत आणखीनच भर पडली आहे. एकीकडे पुरोगामित्वाचे सोंग आणणाऱ्या कॉंग्रेसनेही न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध करण्याचे राजकारण सुरू केले आहे. कारण शेवटी सत्तेसाठी लोकानुनय महत्वाचा आहे. केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. त्याला विरोध करण्यासाठी भाजप-कॉंग्रेसने असा पवित्रा घेतला असल्यास त्याचे आश्‍चर्य वाटायला नको. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायचे ठरविले की, मूळ मुद्दा बाजूला पडून प्रकरण चिघळण्यास मदतच होते हे आतापर्यंत अनेक प्रकरणात सिद्ध झाले आहे. त्यामुळेच केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी, “संघ-भाजपकडून शबरीमला मंदिराचा वापर एखाद्या युद्धभूमीसारखा केला जात आहे,’ असा आरोप केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांना भाजपकडून जाणूनबुजून विरोध करण्यात येत आहे असा आरोप होत असतानाच, मंदिरात आतापर्यंत प्रवेश करणाऱ्या महिला बिगर-हिंदू आहेत असा प्रतिआरोप करण्यात येत आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. शबरीमलाच्या व्यवस्थापनानेच तसा इशारा दिला आहे. लोकांच्या श्रद्धेच्या आदर करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, हेही सरकारचे कर्तव्य आहे, हा विचार कोणीच लक्षात घेत नाही. उलट या प्रश्‍नावर लोकांच्या भावना भडकावण्याचे उद्योग करण्यात येत आहेत.

मंदिरात तरुण महिलांनाही प्रवेश देण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात करण्यात यावा अशा मागण्या करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्याची एकत्रित सुनावणी आता 13 नोव्हेंबरला होणार आहे. यासंबंधीचा निर्णय जो काही लागेल तो निर्णय अंतिम मानून सर्वांनीच सामंजस्य दाखवून तो मान्य करावा अशी अपेक्षा आहे. अन्यथा हे प्रकरण चिघळण्याची शक्‍यता आहे. एकीकडे आपल्याच शेजारी असलेला चीन आकाशात एक नव्हे, दोन नव्हे तर चार कृत्रिम चंद्र उभारण्याच्या तयारीत आहे आणि दुसरीकडे जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारतात मंदिरात महिलांना प्रवेश द्यायचा का नाही? या मुद्यावरून परस्परांत संघर्ष करावा लागणार असेल, तर त्यासारखे
दुर्दैव ते कोणते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)