#वर्तमान : निवडणूक आयोगाचा स्तुत्य निर्णय 

श्रीकांत नारायण 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकाही जागेवर निवडणूक न लढविणाऱ्या, जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्‍त ज. स. सहारिया यांनी जाहीर केलेले नवीन नियम राजकीय पक्षांना बंधनकारक राहणार आहेत. लोकशाही अधिक मजबूत दृष्टीने निवडणूक आयोगाने टाकलेले हे पाऊल योग्यच म्हणावे लागेल. 

भारतासारख्या खंडप्राय देशातील लोकशाही हा इतके दिवस एक ‘चमत्कार’ म्हणून ओळखला जायचा. अजूनही जगातील बरेच लोक भारतातील लोकशाहीकडे ‘चमत्कार’ म्हणूनच पाहतात. कारण प्रचंड लोकसंख्या, विविध भाषा, धर्म आणि पंथांमध्ये विखुरलेला समाज असूनही भारतातील लोकशाही वरचेवर परिपक्व होत चालली असल्याचे दिसून येत आहे. अर्थात निवडणूक आयोगाकडून लोकशाही बळकट होण्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न त्याला कारणीभूत आहेत, हे कोणी नाकबूल करेल असे वाटत नाही.

-Ads-

लोकशाही म्हटले की, निवडणुका आल्या; आणि निवडणुका म्हटल्या की विविध राजकीय पक्षांचा त्यामध्ये सहभाग असणे, हे अपरिहार्य आहे. मात्र, अशा राजकीय पक्षांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे निवडणूक आयोगाचे पहिले काम असते. आपल्या भारतीय लोकशाहीचा मागोवा घेतल्यास असे आढळून येईल की, आपला मतदार म्हणजेच नागरिक हे “व्यक्‍तीप्रेमी’ असल्याने व्यक्‍तिस्तोमाचे राजकारण प्रथमपासूनच फोफावत गेले. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष त्यांच्या मूळ विचारधारेपासून पूर्णपणे बाजूला फेकले गेले आणि त्या त्या नेत्यागणिक त्या त्या पक्षांची शकले झाली. आणि केवळ निवडणुका लढविणे आणि त्याद्वारे येनकेनप्रकारे सत्ता हस्तगत करणे हाच काही राजकीय पक्षांचा “उद्योग’ बनला. वास्तविक मजबूत आणि परिपक्व लोकशाहीच्या दृष्टीने हा प्रकार हानिकारक होता. त्यामुळे अनेकदा मतदारही गोंधळात पडले. तरीसुद्धा याच सुजाण मतदारांनी वेळोवेळी मतपेटीद्वारे आपला विचारी कौल देऊन अशा राजकीय पक्षांना धडाही शिकविला. अर्थात, अशा प्रसंगी निवडणूक आयोगानेही वेळोवेळी त्याला चांगली साथ दिली हे एका दृष्टीने फार महत्त्वाचे होते.

निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा असूनही अगदी सुरुवातीच्या काळात “सत्तारूढ पक्षाच्या हातातील एक बाहुले’ अशीच त्याची प्रतिमा होती. मात्र टी. एन. शेषन नामक सनदी अधिकाऱ्याने जेव्हा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली आणि निवडणूक आयोगाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली तेव्हापासून निवडणूक आयोगाला प्रतिष्ठेचे दिवस आले आणि लोकशाहीला हळूहळू बळकटी येऊ लागली. एरव्हीी “निवडणुका म्हणजे एक खेळ’ अशा पद्धतीने काही राजकीय पक्ष त्याकडे पाहात होते. मात्र निवडणूक आयोगाने अंकुशरूपी बडगा दाखविण्यास सुरुवात करताच राजकीय पक्षांचे हे “खेळ’ संपुष्टात येऊ लागले आणि निवडणुका जिंकण्याचे अवैध मार्ग बंद होऊ लागले. त्यानंतरही निवडणूक आयोगाने वेळोवेळी अनेक सुधारणा करून निवडणूक पद्धत कशी अधिक सोपी आणि मतदारांसाठी सुकर होईल यासाठी प्रयत्न केले.

इतके दिवस विविध राजकीय पक्षांना फक्‍त निवडणुकीच्या वेळीच मतदाराची आठवण यायची. “एका दिवसासाठी तो मतदारराजा’ ठरायचा. शिवाय काही राजकीय पक्ष आतापर्यंत फक्‍त विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवून त्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांच्या संख्येवर आपल्या पक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे. त्यांच्या दृष्टीने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक नगण्य असायच्या. मात्र, आता निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नवीन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकाही जागेवर निवडणूक न लढविणाऱ्या तसेच जाहीरनाम्यातील आश्‍वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली जाणार आहे. थोडक्‍यात, राजकीय पक्षांना तळागाळात असलेला पाठिंबाही आता सिद्ध करावा लागणार आहे. शिवाय मतदारांशी त्याला आता बांधिलकी ठेवावी लागणार आहे.

जाहीरनाम्यातील आश्‍वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी त्याला प्रसिद्ध करावा लागणार आहे. यापुढे कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा म्हणजे केवळ आश्‍वासंनाची जंत्री असणार नाही, तर त्यासाठी काय प्रयत्न केले गेले, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे मतदार साहजिकच त्या पक्षाला जाब विचारू शकतील. आयोगाच्या या नव्या निर्णयामुळे फुटकळ पक्षांना आपोआपच आळा बसेल. लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीने ती एक आवश्‍यक उपाययोजना ठरेल कारण ज्या लोकशाहीत उदंड राजकीय पक्ष आहेत तेथे गोंधळ होणे स्वाभाविक आहे. आणि या “गोंधळाचा’ प्रत्यक्ष अनुभव आपण आतापर्यंत अनेकवेळा घेतला आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाचा हा निर्णय स्तुत्य म्हणावा लागेल.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)