#वर्तमान: दलित-मुस्लीम ऐक्‍य कोणाच्या मुळावर? 

श्रीकांत नारायण 
गांधी जयंतीच्या निमित्ताने औरंगाबाद येथे एक दलित-मुस्लीम मेळावा झाला. या मेळाव्यामुळे मात्र अनेक राजकारण्यांची झोप उडविली आणि दलित व मुस्लीम एकत्र आले तर त्याचे देशाच्या विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर भावी काळात काय परिणाम होऊ शकतील यासंबंधीच्या चर्चा सुरू झाल्या. 
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे निमित्त साधून मंगळवारी देशभरात अनेक कार्यक्रम झाले. अर्थात, त्यामुळे सामाजिक अभिसरण कितपत झाले हा वादाचा मुद्दा होऊ शकत असला तरी राजकीय अभिसरण होऊ शकतील असे दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडले. गेली पाच वर्षे सोडली तर त्याआधी अनेक वर्षांपासून दिल्लीत सत्ता असलेल्या कॉंग्रेसला शेवटी वर्ध्याचा आश्रय घ्यावा लागला. जनतेचा पाठिंबा पुन्हा मिळविण्यासाठी गांधी जयंतीचा मुहूर्त साधून कॉंग्रेस नेत्यांना वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात स्वावलंबनाचे धडे घेण्याची वेळ आली आणि गांधी जयंतीला साक्षी ठेवून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर कडाडून टीका करीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तर दुसरीकडे मराठवाड्यातील औरंगाबाद येथे दलित आणि मुस्लीम ऐक्‍याचा प्रचंड मोठा मेळावा पार पडला.
वास्तविक काही दिवसांपूर्वीच रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकीसाठी ‘एमआयएम’ पक्षाचे नेते खा. असदोद्दीन ओवेसी यांच्याबरोबर ‘युती’ केल्याची घोषणा केली होती. या युतीवर शिक्‍कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी औरंगाबाद येथे दलित आणि मुस्लीम ऐक्‍याचा प्रचंड मोठा मेळावा पार पडला आणि एका नवीन राजकीय अभिसरणाची नांदी झाली. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही राजकारणात ‘बहुजन विकास आघाडी”सारखे अनेक प्रयोग केले आहेत. मात्र, ते त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून होते. मात्र, त्यांनी यावेळेस प्रथमच ‘दलित-मुस्लीम’ ऐक्‍याची घोषणा करताना मजलिस-ए-इत्तिहादुल मुसलमीन (‘एमआयएम’) सारख्या कट्टरपंथीय राजकीय पक्षाचा आधार घेतला आहे. मधल्या काळात राजकीय विजनवासात असलेले प्रकाश आंबेडकर ‘भीमा-कोरेगाव’ प्रकरणानंतर एकदम प्रकाशात आले आणि त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेऊन राजकारणातील आपले महत्त्व आणखी वाढवले आहे.
औरंगाबाद येथील मेळाव्यात प्रकाश आंबेडकर आणि खा. असदोद्दीन ओवेसी यांनी अपेक्षेप्रमाणे परस्परांवर स्तुतीसुमने उधळली. खा. असदोद्दीन ओवेसी यांनी तर प्रकाश आंबेडकर यांना खासदार करण्याचेही आश्वासन दिले. स्वतःबरोबरच प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे पाच खासदार राहिले तर आम्ही मोदी सरकारच्या नाकातोंडात दम आणू अशी दर्पोक्‍तीही त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील दलित जनतेचे श्रद्धास्थान आहेत हे ओळखून त्यांनी डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचेही भावनिक भांडवल करून दलितांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता यापुढे निदान महाराष्ट्रात तरी आगामी निवडणुकीत ‘जय भीम–जय मीम’ (एमआयम) असा नारा ऐकू आला तरी कोणाला आश्‍चर्य वाटायला नको.
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि खा. असदोद्दीन ओवेसी यांनी मोठ्या हुशारीने दलित-मुस्लीम ऐक्‍याचे नवे राजकीय कार्ड खेळल्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना त्याची गंभीर दाखल घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये दलित आणि मुस्लिमांची मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे. त्यामुळे दोघांचीही मते एकत्र आली तर त्याचा इतर राजकीय पक्षांच्या मतांवर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः मराठवाड्यात अनेक शहरात दलित आणि मुस्लीम मते एकत्र आली तर त्याचा फायदा त्यांच्या संयुक्‍त उमेदवाराला होऊ शकतो. मराठवाड्यात ‘एमआयएम’ पक्षाने आधीच आपली पाळेमुळे रुजवायला सुरुवात केली केली आहे. त्यात त्यांना दलितांची साथ मिळाली तर स्थानिक स्वराज्य संस्था सारख्या निवडणुकांमध्येही त्यांना चांगले यश मिळू शकते त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या दृष्टीने ती डोकेदुखी ठरणार आहे.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दलितांवर मोठ्या प्रमाणावर झालेले हल्ले तसेच जमावाच्या ‘झुंडशाही’च्या नावाखाली घेण्यात आलेले काही बळी यामुळे दलित-मुस्लीम समाज मोदी सरकारवर नाराज असल्याची भावना लक्षात घेऊन त्याचा आपल्याला कसा लाभ करून घेता येईल यासाठी देशातील काही प्रमुख पक्ष प्रयत्नशील असतानाच दलित-मुस्लीम ऐक्‍याची ही तिसरी आघाडी झाल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. या दलित-मुस्लीम ऐक्‍याचा महाराष्ट्रात तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला चांगलाच फटका बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दलित-मुस्लीम मतांची पेढी आपल्या बाजूने वळविण्यासाठी सर्वच पक्षांची कसोटी लागणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दलित-मुस्लीम ऐक्‍य कोणाच्या मुळावर आहे हे मात्र निवडणूक निकालानंतर कळून येईल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)