#वर्तमान: ‘गोविंदा, गोविंदा, दहीहंडी उत्सवाचा झाला ‘धंदा’ 

– श्रीकांत नारायण 
भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि त्या अनुषंगाने उत्सवांची परंपरा चालत आलेली आहे. विशेषतः श्रावण महिन्यात नागपंचमीपासून गणेश उत्सवापर्यंत अनेक सण परंपरेचा एक भाग म्हणून मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. अर्थात, काळानुसार अशा सण आणि उत्सवांमध्ये बदलही घडून येत आहेत. बत्तीस शिराळा येथे एकेकाळी गाजलेला नागपंचमीचा उत्सव आता हळूहळू जिवंत नागाशिवाय पार पडला जात आहे. प्राणीमित्र आणि त्यांना न्यायालयाने दिलेली साथ यामुळे तेथे अनेक जिवंत नागांना अभयदान मिळाले आहे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, असे असले तरी काही उत्सवांना बदलत्या काळाच्या नावाखाली धंद्या’चे स्वरूप यायला लागले आहे की अशी शंका येऊ लागली आहे आणि ही बाब निश्‍चितच चिंता निर्माण करणारी आहे. नाही म्हटले तरी महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात गणेशोत्सवाचा केव्हाच व्यवसाय झाला आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त हजारो कोटींची उलाढाल होत असते यावरून त्याचे व्यावसायिक स्वरूप लक्षात येईल.
गणेशोत्सवापाठोपाठ आता श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवालाही व्यावसायिकतेचे स्वरूप येऊ घातले आहे. आणि नजीकच्या काळात तर त्याचा चक्‍क ‘धंदा’च केला जाईल अशा परिस्थितीकडे या उत्सवाची वाटचाल सुरू झाली आहे असे वाटते. वास्तविक ‘दहीहंडी फोडणे’ हा एक खेळाचा, कलेचाच प्रकार आहे. इतके दिवस त्याच्याकडे ‘एक खेळ आणि त्यानिमित्त पाहायला मिळणाऱ्या साहसाची गंमत’ याच नजरेतून पाहिले जात होते; परंतु गेल्या काही वर्षापासून दहीहंडी फोडण्यासाठी जेव्हा ‘थरावर थर’ वाढू लागले, जास्तीत जास्त थरांच्या स्पर्धा जेंव्हा सुरू झाल्या तेंव्हा या साहसी खेळातील ‘ती’ गंमत संपुष्टात येऊ लागली आणि एक ‘जीवघेणा खेळ’ पाहण्याचे प्रत्यंतर येऊ लागले. तसेच या उत्सवात पैशाचे तसेच इतर अनेक बाबींचे ‘राजकारण’ आले आणि पाहता पाहता या उत्सवात अनेक वाईट प्रवृत्तीचा शिरकाव झाला.
महाराष्ट्रात यापूर्वी प्रामुख्याने पुण्या-मुंबईत तसेच कोल्हापूरसारख्या प. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हा दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत असे. मात्र, आता हे दहीहंडी उत्सवाचे लोण राज्यात सर्वत्र पसरले आहे. त्यातही यापूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांकडून या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले जायचे (पुण्यात अजूनही सार्वजनिक गणेश मंडळांकडेचं प्रामुख्याने दहीहंडी महोत्सवाचा ‘ताबा’ आहे) मात्र हळूहळू राजकीय पक्षांनी या उत्सवाचा फायदा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे या उत्सवाला सवंग प्रसिद्धी आणि प्रचारकी थाटाचे स्वरूप आले आहे. या उत्सवाचा मूळ हेतूच नष्ट होत चालला आहे असे एकूण चित्र दिसत आहे.
दहीहंडीचा हा उत्सव रस्तोरस्ती साजरा होत असल्यामुळे संबंधित रस्ते बंद करण्यात येतात आणि पर्यायाने वाहतूक ठप्प होत होते. अशा गोष्टींना आता काही धरबंदच उरला नाही. त्यामुळे त्यादिवशी अघोषित सुट्टीच (काही ठिकाणी तर अधिकृत सुट्टी) असते. ज्यांचे हातावर पोट असते त्या कित्येकांना मात्र त्या दिवशीचा सक्‍तीचा उपवास घडलेला असतो; पण लक्षात कोण घेतो, अशीच परिस्थिती आहे. जर कोणी त्याला आक्षेप घेतलाच तर धार्मिक भावना दुखावण्याच्या नावाखाली त्याची ‘वेगळ्या पद्धतीने’ दखल घेतली जाते, ही आजची वस्तुस्थिती आहे.
याशिवाय दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदाना आणि दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्यांना प्रेक्षकांना थोपवून धरण्यासाठी हल्ली सेलिब्रेटींच्या नावाखाली नट-नट्यांचे नाच ठेवण्याचे फॅड आले आहे. ज्यांना हल्ली चित्रपटांत फारशी कामे मिळत नाहीत अशा नट्या ‘सुपारी’ घेऊन असे नाच करायला एका पायावर तयार होतात. तेवढेच दीड-दोन लाख सुटले हीच त्यामागची त्यांची निव्वळ भावना असते आणि त्यासाठी ‘पप्पी पप्पी दे पारोला …..’ किंवा ‘तू चीज बडी है मस्त मस्त ….’ यासारख्या गाण्यांवर थिरकताना प्रेक्षकांची करमणूक केल्याचे समाधान मिळाल्याचा आवही त्यांना आणावा लागतो (खरे समाधान मात्र मिळणाऱ्या मानधनाच्या चेकवरच अवलंबून असते). गाणे गाताना उपस्थितांना ‘फ्लाईंग किस’ दिला तरच आपल्या नाचाचे सार्थक होते असा दंडक काही नट्यांनी जणू घालून घेतला आहे. दहीहंडी उत्सवाचे स्वरूप कसे हिडीस होत आहे याला अन्य पुरावा आणखी दुसरा कोणता असू शकेल.
दहीहंडी उत्सवावर आपले वर्चस्व, आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींमध्ये सध्या अहमहमिका सुरू आहे. त्यावर होणारी वारेमाप खर्चाची उधळपट्टी हे त्याचेच एक द्योतक आहे. आपला प्रभाव कायम टिकविण्यासाठी प्रसंगी काही ‘राम’ तर ‘रावणा’चीही भूमिका घेत आहेत हे नुकत्याच पार पडलेल्या मुंबईतील दहीहंडी उत्सवाने दाखवून दिले. थोडक्‍यात सांगायचे तर दहीहंडी फोडण्यासाठी एकीकडे वरचेवर थर वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत तर दुसरीकडे मात्र उत्सवाच्या सांस्कृतिक पातळीचे थर झपाट्याने खाली येत आहेत. कोणत्याही उत्सवाला धंद्याचे स्वरूप आले की असे होणारच.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)