वर्तमान : एफटीआयआय परत बेवारस   

श्रीकांत नारायण 

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या नामवंत चित्रपट प्रशिक्षण संस्थेचे चेअरमन, अभिनेते अनुपम खेर यांनी मंगळवारी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने फिल्म इन्स्टिट्यूट पुन्हा बेवारस झाली आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून फिल्म इन्स्टिट्यूट ही संस्था या ना त्या निमित्ताने सतत चर्चेत होती. अनुपम खेर यांची चेअरमन म्हणून गेल्या वर्षी नियुक्‍ती झाल्यानंतर फिल्म इन्स्टिट्यूटचे काम चांगले मार्गी लागेल. अशी आशा सर्वांना वाटत असतानाच त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे फिल्म इन्स्टिट्यूटची अवस्था पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी झाली आहे. 

अभिनेते अनुपम खेर यांनी चेअरमनपदाचा राजीनामा देताना जे कारण दिले आहे, ते अनाकलनीय वाटते. आपल्या कार्यबाहुल्यामुळे, विशेषतः एका पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय जबाबदारीमुळे आपणास अमेरिकेत काही महिने राहावे लागणार असल्यामुळे आपण फिल्म इन्स्टिट्यूटच्या कार्याला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही म्हणून आपण पदाचा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी ज्यांनी खेर यांची निवड केली होती त्या तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना आपण तेव्हाच आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदारीची कल्पना दिली होती, असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मग ज्यांना फिल्म इन्स्टिट्यूटचे काम करायलाच वेळ नाही अशा व्यक्‍तीची स्मृती इराणी यांनी चेअरमनपदी का निवड केली? काम करायला वेळच नसताना स्वतः अनुपम खेर यांनी त्यावेळी चेअरमनपदाची जबाबदारी का अंगावर घेतली, असे प्रश्‍न साहजिकच निर्माण होतात. मात्र त्याची उत्तरे द्यायला ना स्मृती इराणी यांच्याकडे आता माहिती-प्रसारण खाते आहे; ना सरकारतर्फेही त्याचे योग्य निराकरण होईल.

गेल्या वर्षी (2017) ऑक्‍टोबर महिन्यात खेर यांची एफटीआयआयच्या चेअरमनपदी निवड झाली. त्यानंतर वर्ष पूर्ण होण्याच्या आसपासच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उणेपुरे वर्षभर त्यांनी चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळली. वास्तविक खेर यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत झाले होते. कारण त्यांच्या आधीचे एफटीआयआयचे चेअरमन गजेंद्र चौहान यांची निवड अतिशय वादग्रस्त ठरली होती. अभिनेते म्हणून फारसे परिचित नसलेले गजेंद्र चौहान यांची निवड पक्षीय भूमिकेतून करण्यात आल्याचा आरोप केंद्र सरकारवर करण्यात आला होता. या मानाच्या संस्थेच्या चेअरमनपदाची परंपरा फार मोठी आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी यापूर्वी या संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहिले होते आणि संस्थेला विशिष्ट दिशा देण्याचे काम केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर चौहान यांची निवड हा बालिशपणाचाच नमुना होता. एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी देखील चौहान यांच्या निवडीचा निषेध करण्यासाठी सुमारे 140 दिवस संप करून संस्थेचे कामकाज ठप्प केले होते. त्यानंतर साहजिकच केंद्र सरकारला गजेंद्र चौहान यांची उचलबांगडी करावी लागली. त्यांच्या जागी खेर यांची नियुक्‍ती करण्यात आली.

गजेंद्र चौहान यांच्या पार्श्‍वभूमीवर सुमारे 500 चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकार करून आपल्या अभिनयाचा जनमानसावर स्वतंत्र ठसा उमटविणारे अभिनेते अनुपम खेर एफटीआयआयला काही तरी नवा आकार देतील, असे या क्षेत्रातील सर्वांनाच वाटल्याने त्यांच्या निवडीचे उत्स्फूर्त स्वागत झाले होते. मात्र, अनुपम खेर यांचे “कार्यबाहुल्य’ आडवे आले. चेअरमन म्हणून आपल्या वर्षभराच्या काळात ते एफटीआयआयकडे फारसे फिरकलेही नाहीत. फक्त एक-दोनदा संस्थेला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना आश्‍वस्त केले होते तेवढेच. त्यातही गेल्या मंगळवारीच मुंबईत एफटीआयआयच्या सोसायटीची त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे बुधवारी खेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

एफटीआयआयच्या सोसायटीची ही बैठकदेखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सारखा तगादा लावल्यामुळेच घ्यावी लागली होती, हेही आता उघड झाले आहे. कारण अनुपम खेर यांनी चेअरमनपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून कामकाजाकडे तसे दुर्लक्षच केले होते. एफटीआयआयची ऍकॅडमिक कौन्सिल, गव्हर्निंग कौन्सिल तसेच वित्तीय समिती स्थापन करण्यात विलंब होत होता. म्हणूनच या सोसायटीची मुंबईत बैठक बोलावण्यात आली होती मात्र या बैठकीलाही सोसायटीचे अनेक मान्यवर सदस्य अनुपस्थित होते.

एफटीआयआयच्या कामकाजाकडे कोणीच गांभीर्याने पाहताना दिसत नाही आणि आता तर अनुपम खेर यांच्या राजीनाम्यामुळे चेअरमनपदासाठी नवीन सक्षम व्यक्‍ती शोधण्याचे जिकिरीचे काम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे आले आहे. त्यामुळे पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट आणखी किती काळ “बेवारस’ राहणार हाच खरा प्रश्‍न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)