वर्गणी गोळा करताना सक्‍ती करू नका

उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांचे मंडळांना आवाहन
घोडेगाव-गणेशोत्सवात डिजे व गुलालमुक्‍त करण्याचा सर्वांनी संकल्प करा तसेच गणपती सजावटीचे स्टेज रस्त्यावर उभे करू नका, रस्ता खोदू नका, वर्गणी गोळा करताना सक्‍ती करू नका, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी केले.
आगामी गणेशोत्सवाच्या संदर्भात सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची महसूल व पोलीस प्रशासनाने आंबेगाव पंचायत समिती येथील सभागृहात बैठक घेतली त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी आंबेगाव तहसीलदार रविंद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास काळे, घोडेगाव सरपंच रूपाली झोडगे, उपसरपंच सुनील इंदोरे, शरद बॅंक संचालक दिलीप काळे, प्रशांत काळे, मिलींद काळे व घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावातील मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सव समाज जागृतीसाठी साजरा करा, उत्सवात अवास्तव पैसे खर्च करण्याऐवजी शाळा, वाचनालये, वृक्षारोपण, व्यसनमुक्‍ती आदी विधायक उपक्रम हाती घेऊन अशा ठिकाणी सामाजिक काम करा. नियम व शिस्तीचे काटेकोरपणे पालन करून ध्वनी प्रदूषण, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. तसेच विद्युत मंडळ, ग्रामपंचायत, जागा मालक यांची परवानगी घेऊन स्टेज उभे करा. न्यायालयाच्या निर्देशानुसार गणेशोत्सव काळात डिजे वाजविल्यास त्या मंडळावर कारवाई केली जाईल. तसेच विसर्जन मिरवणूक दिलेल्या वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांनी केले.
विसर्जन मिरवणुकीत मंडळाचा एकही सदस्य दारू पिलेला नसल्यास त्या मंडळाला घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने बक्षिस देण्यात येईल. तसेच पोलिसांना चांगले सहकार्य केलेल्या मंडळांसाठी, समाजप्रबोधनपर देखाव्यांसाठी, शांततेत विसर्जन मिरवणूक अन्‌ मिरवणुकीतील प्रबोधनात्मक देखाव्यासाठी देखील बक्षिस दिले जाणार असल्याचे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)