• पोलीस निरीक्षक धस : पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्था राखणे कामी सहकार्य करावे

देहुरोड – गणेशोत्सव डॉल्बीमुक्‍त असणार आहे. वर्गणीसाठी सक्‍ती करू नये, गणेश मंडळांनी धर्मदाय आयुक्‍तांकडे नोंद करणे अनिवार्य असून, त्याशिवाय वर्गणी मागता येणार नाही. वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मूर्तीच्या सुरक्षेची जबाबदारी मंडळाच्या सदस्यांनी घ्यावी. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून वेळेवर संपवावी. गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी केले आहे.

देहुरोड पोलीस ठाण्याच्या वतीने देहूरोड येथे आयोजित देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश उत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक धस बोलत होते. या वेळी देहुरोड, किवळे, रावेत परिसरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक धस म्हणाले की, गणेश मंडळांनी 10 दिवसांच्या उत्सवाचे नियोजन करून योग्य खबरदारी घ्यावी, कोणताही गैरप्रकार संशयास्पद घटना आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा. उत्सव काळात रात्रंदिवस प्रत्येक मंडळाने मूर्ती व देखाव्याजवळ स्वयंसेवक नेमणे आवश्‍यक आहे. वर्गणीसाठी कोणालाही जबरदस्ती करू नये. मिरवणूक लवकर काढावी, जेणे करून वादविवाद टाळता येतील.

दर्शनाला व देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या व विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. डिजे डॉल्बीचा वापर करू नये. पारंपारीक पद्धतीने मिरवणूक काढावी. कायदा व सुव्यवस्था प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)