वर्गखोल्यांच्या कामात ठेकेदाराची “शाळा’

म्हाळूंगे-माण हायटेक सिटी मधील म्हाळुंगे जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था

हिंजवडी- मुळशी तालुक्‍यातील म्हाळूंगे-माण हायटेक सिटी मधील म्हाळुंगे जिल्हा परिषद शाळेची मोठी दुरवस्था झालेली आहे. बांधकाम केलेल्या वर्गखोल्या निकृष्ट दर्जाच्या झाल्याने त्या पावसाळ्यात पाणी येवून खराब झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या, कौले तुटलेल्या वर्गात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून ज्ञानार्जनाचे धडे गिरवावे लागत आहे. ना धड मैदान ना धड छप्पर अशी रया गेलेल्या शैक्षणिक इमारतीत तब्बल 800 ते 850 विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहे.
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मनुष्यबळ मंत्री विलास जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे व जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांच्या उपस्थितीत म्हाळूंगे-माण सिटीचे भूमिपूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. ज्या जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीवर भूमिपूजनाच्या कोनशिलेचे अनावरण केले त्या शाळेची दुर्दशा मात्र, या मंत्र्यांना दिसली कशी नाही? याचे आश्‍चर्य वाटत आहे.
साडेआठशे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेत नुकतेच सीएसआर फंडातून एक सभागृह बांधण्यात आले आहे. मात्र, मैदानाच्या परिसरात छोट छोट्या दगडांचा, विटकरी तुकड्यांचा, वाळूचा राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात मनसोक्‍त फिरता येत नाही. केवळ वर्गात जावून बसावे लागत आहे. वर्गांपैकी 4 वर्ग जे काही वर्षांपुर्वी बांधले असतील ते दुरवस्थेमुळे भंगार अवस्थेत पडून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सध्या जुन्या व पडीक झालेल्या वर्गाचाही वापर करावा लागत. या वर्गाचे छप्पर कौलारू असून काही कौले चक्क तुटली असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, जर दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल ही उपस्थित होत आहे.
शाळेच्या संरक्षक भिंतीच्या बाहेरही विद्यार्थ्यांना जीव मुठीतच घेवून वावरावे लागत आहे. कारण हायटेक सिटीच्या भूमिपूजनासाठी एका रात्रीत चकाचक डांबरी रस्ता प्रशासनाने तो ही चांगल्या दर्जाचा केला. मात्र मुख्यमंत्र्यांना प्रवासात कोणताही त्रास होवू नये म्हणून गतिरोधक जाणूनबुजून बसवलेच नाहीत. भूमिपूजन कार्यक्रम उरकल्यानंतर प्रशासन तिकडे औषधालाही फिरकले नाही. त्यामुळे गतिरोधकांच्या अभावी सुसाट गाड्यांमुळे लहान लहान विद्यार्थ्यांचे जीव प्रशासनाने आयतेच धोक्‍यात घातले आहे.

 • प्रशासन लोकप्रतिनिधींचे सेवक?
  निकृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ठेकेदारावर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ यांनी सांगितले. मग हा संबंधित ठेकेदार या विद्यार्थ्यांच्या जीव मुठीत घेवून शिकण्याच्या कृतीचा जबाबदार असून त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रशासनाची तत्परता दिसत नाही. मात्र एका दिवसात चकाचक रस्ता तयार करून प्रशासन हे जनतेचे नव्हे तर लोकप्रतिनिधींचे सेवक असल्याचे आपल्या कृतीतून दाखवत आहेत.
 • मूलभूत गोष्टिकडे करंटेपणाने दुर्लक्षित
  जिल्हा परिषदेने 2 लाख 99 हजार रुपयांचा निधी संबंधित निकृष्ट 4 वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी नुकताच मंजूर केला असून हा निधी अजून उपलब्ध व्हायचा आहे. या निधीतही जीएसटी वगैरे सारखे कर असणार आहेत. त्यामुळे ते कर वगळता उर्वरीत पैशातून असे कितीसे दर्जेदार काम होणार आहे, हे सांगता येणार नाही. आणि ते कधी होईल ते होईल? तोपर्यंत विद्यार्थी मात्र भयभीतपणेच शाळेत येणार, हे नक्की. स्टेडियमसाठी, मेट्रोसाठी, आयटीसाठी, खसगी वसाहतींसाठी, रस्त्यांसाठी शासन येथील जमिनी संपादित करू शकते. मात्र, शिक्षणाच्या मूलभूत गोष्टिकडे करंटेपणाने दुर्लक्षित करते याची प्रचिती या म्हाळूंगे-माण हायटेक सिटीच्या रूपाने घेता येते. विद्यार्थ्यांच्या जीवासाठी तरी प्रशासनाला बुद्धी द्यावी अशी प्रार्थना येथील पालक करत आहेत.
 • शाळेच्या दुरावस्थेबाबत हायटेक सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले होते, त्यावेळी पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून शाळा बांधण्यासाठी प्रयत्न करू असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. मात्र अजून त्यावर काहीच झाले नाही. तर जिल्हा परिषदेकडून निकृष्ट दर्जाच्या 4 वर्गखोल्यांच्या दुरुस्ती साठी आलेले 3 लाख रु.मात्र अपुरे पडणार आहेत. उर्वरित निधी मात्र ग्रामपंचायत मधून द्यावा लागन्याची शक्‍यता आहे.
  -एस. टी. नवले, ग्रामविकास अधिकारी, म्हाळूंगे-माण
 • दुरुस्तीकरिता मंजूर 2 लक्ष 98 हजार रुपायांपैकी 50 टक्के रक्कम शाळेस प्राप्त झाली असून महिन्याभरात या वर्ग खोल्या दुरुस्त होतील. त्यानंतर मग कौलारू वर्गातील मुलांना त्या नवीन वर्गात बसवले जाईल. दुरुस्तीचा निधी अपुरा असून ग्रामपंचायत किंवा इतर मदत निधी मिळवावाच लागणार आहे.
  – व्ही. डी. भरम, मुख्याध्यापक, म्हाळुंगे जिल्हा परिषद शाळा
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)