वरुन कीर्तन आतून तमाशा!

पिंपरी-चिंचवड वर्तमान – निशा पिसे

वर्षभरातच झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, सत्ता येवून एक वर्ष झाले तरी अजूनही निष्ठावंतांचे सुरु असलेले रडगाणे, “शो बाजी’त अडकलेले नगरसेवक, पक्षांतर्गत सुरु असलेले “अडवा व जिरवा’चे राजकारण यामुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या कारभाराचे पुरते हसे झाले. “पार्टी विथ डिफरन्स’ अशी शेखी मिरवणाऱ्या भाजपमध्ये पक्षांतर्गत सुरु असलेल्या या तमाशामुळे विरोधकांबरोबरच शहरवासियांचे मनोरंजन होत आहे. “आयारामां’च्या जीवावरच सत्ता मिळवली हे सत्य पचवायला तथाकथित निष्ठावंत तयारच नाहीत. तर आमच्यामुळे सत्ता आली ही नशा नव्यांच्या डोक्‍यातून जात नाही. नव्यांचा एककल्ली कारभार, जुन्यांचा त्याला “खो’ घालण्याचा प्रयत्न त्यातून नव्या-जुन्यामधील दरी वाढत चालली आहे. त्याचा परिणाम थेट महापालिकेच्या कारभारावर होत आहे.
——-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून भाजपचे शहरातील अस्तित्व जेमतेम राहिले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाबरोबरच शहरातील राजकारणाचे चित्र बदलले. परिणामी विरोधी पक्षातील आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे, गजानन बाबर यांच्यासारखे बडेमोहरे भाजपच्या गळाला लागले. त्यावेळी तथाकथित निष्ठावंतांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला कोणताही विरोध केला नाही. उलट, भाजपची ताकद वाढल्याचे “ब्रॅंडींग’ केले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार जगताप व लांडगे यांच्या समर्थकांचाही भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. त्यावेळीही तथाकथित निष्ठावंत मूग गिळून बसले. महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपावेळी नव्यांना झुकते माप दिल्याचे दिसू लागल्यानंतर त्यांची ओरड सुरु झाली. मात्र, त्याही वेळी “गाजर’ दाखवून पक्षश्रेष्ठींनी निभावून नेले. महापलिकेत एकहाती सत्तेचा कौल लागताच पुन्हा तथाकथित निष्ठावंतांची अन्यायाची ओरड सुरु झाली. महापालिका स्वीकृत सदस्य निवड, पदाधिकारी निवड आणि आता क्षेत्रीय समित्यांच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळीही ही बोंब कायम आहे.

स्थायी समिती अध्यक्ष निवडीच्या वेळी जुन्यांबरोबरच नव्यांनीही राजीनामास्त्र उगारल्याने दोन्ही “आमदार द्वयीं’मधील दुफळी समोर आली. हा वाद शमत नाही तोच क्रीडा समितीच्या एका महिला सदस्याने राजीनामा पुढे करत नाराजीला वाट मोकळी करुन दिली. ज्या-त्यावेळी वाद शमवून वरुन कीर्तन सुरु असल्याचे भाजपकडून भासवले जात असले तरी नुकत्याच झालेल्या स्वीकृत सदस्य निवडीवरुन आत तमाशा सुरु असल्याचे चव्हाट्यावर आले. सदस्यपदी वर्णी लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्यापासून ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापर्यंतच्या सर्व निती तथाकथित निष्ठावंतांना वापराव्या लागल्या. 24 पैकी 20 जागांवर आपल्या समर्थकांची वर्णी लावत आमदार द्वयींनी एककल्ली कारभाराचे दर्शन घडवले. स्वीकृत सदस्य पदाचे निकषही त्यासाठी धाब्यावर टाकण्यात आले. आता हा वाद भाजप प्रदेशाध्यक्षांच्या “कोर्टा’त गेला आहे.

-Ads-

दुखावलेल्या तथाकथित निष्ठावंत मंडळींच्या संतापावर तेल ओतण्याचे काम जुन्यांपैकीच काहींनी केले. विशेष म्हणजे हे आग ओतणारेच नव्या पदाधिकाऱ्यांच्या वारंवार कानाला लागत आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांचेही कान “हालके’ असल्याने पक्षांतर्गत धुसफूस वाढत चालली आहे. महापालिकेतील सत्तेला एक वर्ष उलटूनही जुन्या-नव्यांमधील वाद शमायला तयार नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या कारभारावर होत आहे. एकाने पुढाकार घेतला की दुसऱ्याने खोडा घालायचा, असा कारभार सुरु आहे. कचऱ्याची निविदा, महिला प्रशिक्षण योजनांसाठी संस्था नेमणूक, महापालिकेसाठी माध्यम समन्वयक नेमणूक आदी निर्णयांवरून ही बाब प्रकर्षाने समोर आली. समाविष्ट गावे आजही मुबलक पाणी, वीज, आरक्षण विकासापासून वंचित आहेत. शहर-उपनगरात पाण्याची बोंब सुरु झाली आहे. मे महिन्यात ती आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे. शहरातील अतिक्रमणे, वाहनतळाचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. शहर स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. झोपडपट्टीवासीय आजही उपेक्षिताचे जीवन जगत आहेत. पाणी, हक्काच्या घरकुलासाठी नागरिकांना आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरावे लागत आहे. अशा परिस्थितीत “स्मार्ट सिटी’चे “लेबल’ लावायला निघालेल्या पिंपरी-चिंचवडसाठी सत्ताधाऱ्यांचे हे वागणे अशोभनीय आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरवासियांना सत्ताधाऱ्यांचे कोणकोणते तमाशे पहायला लागणार याची कल्पना न केलेलीच बरी.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)