वरिष्ठ न्यायालयात मूळ अभिलेखा पाठवू नये

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 


झेरॉक्‍स अथवा स्कॅन केलेल्या प्रती पाठवाव्यात

पुणे – विविध न्यायालयांमध्ये सुनावणीसाठी प्रकरणांमधील दाखल मूळ कागदपत्रे वरीष्ठ न्यायालयांमध्ये पाठवू नयेत. कनिष्ठ न्यायालयाचे निर्णयाविरुद्ध दाव्यातील पक्षकारांनी अपील किंवा रिव्हिजन केल्यास वरीष्ठ न्यायालयात त्या प्रकरणाच्या झेरॉक्‍स अथवा स्कॅन केलेल्या प्रती पाठवण्यात याव्यात, असे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत.
न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल आणि न्यायमूर्ती रोहिंटन फली नरीमन यांच्या खंडपीठाने एका याचिकेच्या सुनवणी दरम्यान हा निकाल दिला आहे. कनिष्ठ न्यायालयातील मूळ अभिलेखा वरीष्ठ न्यायालयात मागवल्याने ही कागदपत्रे पाठवण्याच्या प्रक्रियेत नाहक दिरंगाई होते. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयातील प्रकरणे सुनवणीसाठी विनाकारण प्रलंबित राहतात. काही विशिष्ट प्रसंगी मूळ कागदपत्रे मागवावी लागली, तर ती मागवून त्याचे अवलोकन करून आवश्‍यक असल्यास त्याची झेरॉक्‍स किंवा स्कॅन प्रत ठेऊन पुन्हा ती मूळ कागदपत्रे संबंधित न्यायालयात पाठवण्यात यावीत. या निर्णयाची प्रत सर्व उच्च न्यायालयांकडे पाठवून त्यांनी संबंधित न्यायालयांकडे या निर्देशांची माहिती द्यावी, असेही निकालपत्रात म्हटले आहे.

विनाविलंब सुनावणीसाठी महत्त्वपूर्ण निकाल
बऱ्याच वेळा अंतरिम आदेशांवर अपील करताना आवश्‍यकता नसताना दाव्यातील सर्व कागदपत्रे मागविली जातात. अंतिम निकालावर वरीष्ठ न्यायालयात अपील दाखल केल्यावर दाव्याचे सर्व “रेकॉर्ड आणि प्रोसिडिंग’ कनिष्ठ न्यायालयातून मागवले जाते. ही सर्व कागदपत्रे पाठवताना या कागदपत्रांच्या प्रत्येक पानाला सलग क्रमांक देऊन ती पाठवावी लागतात. यात खूपच कालव्यय होतो. वरीष्ठ न्यायालयात अपीलाचा निकाल लागल्यावर ती कागदपत्रे पुन्हा ज्या कनिष्ठ न्यायालयातून आली त्यांच्याकडे परत पाठवावी लागतात. मूळ कागदपत्रे परत येईपर्यंत निकालाच्या अंमलबजावणीस विलंब होऊ शकतो. तसेच अपील कालावधीत कागदपत्रे नीट हाताळली न गेल्यास ती फाटण्याचा किंवा गहाळ होण्याच्या संभव असतो. या निकालामुळे मूळ कागदपत्रे कनिष्ठ न्यायालयाचे ताब्यात सुस्थीतीत राहू शकतील. निकालाची विनाविलंब अंमलबजावणी होऊ शकेल.
ऍड. शिवराज कदम जहागिरदार
माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)