वरखेडमध्ये नारळी सप्ताहाचे आयोजन

शेवगाव – गेल्या पाच दिवसांपासून तालुक्‍यातील वरखेड या तीन-साडेतीनशे उंबऱ्याच्या खेड्याच्या वाटेला प्रचंड वर्दळीमुळे महामार्गाचे स्वरूप आले आहे. तारकेश्वर गडाचे वैकुंठवासी महंत नारायणबाबा यांच्या 40 व्या नारळी सप्ताहामुळे हा संपूर्ण परिसर सध्या तीर्थक्षेत्र बनला आहे. रविवार (दि. 18) पासून अखंड हरिनाम सप्ताहात मान्यवर संत-महंताच्या कीर्तन, प्रवचन, संगीत भजन, हरिपाठ अशा 24 तास सुरू झालेल्या हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमले असून, वै. नारायण बाबांची गादी चालविणारे, सर्वांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य आदिनाथ महाराज शास्री येथे उभारलेल्या शामियान्यातच वास्तव्याला असल्याने ही भूमी भक्‍तिमय, मांगल्यमय वातावरणाने भारावली आहे.

प्रत्येक दिवशी सरासरी 15 ते 20 हजार भाविकांची उपस्थिती येथे होत आहे. त्यांना अध्यात्मिक ज्ञानाच्या शिदोरीबरोबरच प्रसादाचे केलेले नियोजन थक्क करणारे आहे. रोज एका गावाहून हजारो भाकऱ्या ट्रक व ट्रॅक्‍टरने येतात. आमटी, भाजी येथेच बनवली जाते. सप्ताहाच्या समाप्तीसाठी महाप्रसादाची बुंदीही आतापासूनच तयार करण्यात येत आहे. भोजन समिती त्यासाठी कार्यरत आहे. शंभर स्वयंसेवकांच्या 15 समित्या आपापली कामे स्वयंशिस्तीने करीत आहेत. रोज येणाऱ्या शेकडो वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, स्वच्छता समिती, राज्यभरातून येणाऱ्या संत-महंत महाराजांची व्यवस्था पाहणारी समिती, तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांच्या स्वागतासाठी, आरोग्यासाठी आरोग्य समिती आहे. ग्रामीण भागातील अडाणी माणसेही एखाद्या कार्यक्रमाचे इव्हेंट मॅनेंजमेंट कसे करू शकतात हे येथे पाहायला मिळते. अध्यात्म, अपार श्रद्धा आणि भक्तीच्या समान धाग्यांनी ही सर्व मंडळी एकत्र बांधलेली असतात. त्यामुळे येथे कोणी कोणाला काम सांगत नाही. समोर दिसेल ते काम प्रत्येक जण करत असतो.

एखाद्या ठिकाणचा अखंड हरिनाम सप्ताह वेगळा व नारळी सप्ताह वेगळा आहे. पूर्वी एखाद्या सम्राटाच्या दरबारात काही करण्यासाठी विडा उचलण्याची पध्दत होती; तशी संतांच्या दरबारात अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावी करण्याची तयारी दाखविणारे ग्रामस्थ नारळ घेतात. वर्षाकाठी होणारा हा नारळी सप्ताह मिळण्याचे भाग्य लाभायला किमान सात, आठ वर्षे लागतात. वरखेड सांगवी येथे सुरू असलेल्या या नारळी सप्ताहाचा नारळ वै. नारायणबाबा यांनी स्वतः 2011 मध्ये येथील ग्रामस्थांना दिला होता. तब्बल सात वर्षांनी वरखेड येथे नारळी सप्ताह यंदा सुरू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)