वय वाढले, अपेक्षाही वाढल्या…लग्न जमवताना दमछाक

पालकांच्या जीवाला घोर :


पूर्वीपेक्षा पर्याय वाढूनही लग्न जुळवण्यास होतोय उशीर


सुवर्णमध्यासाठी मुलींनी आव्हान स्वीकारण्याची गरज

राजेंद्र वारघडे

पाबळ – नुकत्याच झालेल्या एका समाजाच्या वधूवर मेळाव्यात उपवर मुले-मुली व पालकांनी मोठी उपस्थिती असूनही, आयोजक सामुदायिक विवाहासाठी सज्ज असताना, एकही विवाह जुळून येत नसेल तर…? ‘विवाह संस्था टिकवून समाज संघटीत ठेवणे’ या संकल्पनेला पुन्हा उभी करण्याचे मोठे आव्हान प्रत्येक समाजापुढे उभे ठाकले असल्याचे वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे.

एकेकाळी उपवर मुलींना गृहीत धरून विवाह ठरवले जात असे. याउलट आता उपवर मुलांना गृहीत धरूनही विवाह जुळून येणे महाकठीण झाल्याने मुलामुलींच्या विवाहाचे वय मागे पडून पाळण्याऐवजी अठराव्या वर्षी, पुढे शिक्षणामुळे पंचविशीत आता नोकरीमुळे तिशीत आली असताना मानवाच्या आयुष्याची मर्यादा अर्धशतकाकडे वाटचाल करत असल्याच्या वास्तवाकडे डोळेझाक होत आहे. धावत्या जीवनशैलीचा परिणाम व भारतीय संस्कृतीचा बदलता प्रवाह आणि करीअर यात मध्यबिंदू सापडत नसल्याने विवाहसंस्था कात्रीत सापडली असल्याचे पुढे येत आहे. यापूर्वी असणारी समाजातील विवाह जुळवण्याचे काम करणारी मध्यस्थांची मांदियाळी लुप्त झाल्याने व नवी समाजसेवा करणारी पिढी याबाबतीत तटस्थ भूमिका घेत असल्याने दोन कुटुंबे जोडून समाज संघटन करत सुख-दुखा:त सहभागी होणारी व्यवस्था केव्हाच हद्दपार झाल्याचे दिसत आहे. मुले, मुली, पालक व समाजाची व्यवस्था सांभाळणारे वधूवर मेळावे घेऊनही अस्वस्थ होत असल्याची बाब पुढे येत आहे. एकीकडे समाज द्विधा मनःस्थितीत आहे तर मुलींसाठी येणारी स्थळे वाढती आहेत. त्यामुळे चोखंदळपणा वाढत आहे, पर्यायाने कोणी गंमत पाहत आहे तर कोणी टाईमपास करत आहे. त्यामुळे विवाह जमवताना निश्‍चित भूमिका घेतली जात नसल्याने वरून संघटित दिसणारा समाज आतून मनाने एकमेकांपासून दूर जात असल्याने वेगळी समस्या निर्माण होऊ लागली आहे.

समाजाच्या माध्यमातून मेळावे, वधुवरांची अद्ययावत माहिती आणि विवाह मध्यस्थ अशा विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. विवाह जुळवताना वधुवरांची अद्ययावत माहिती एकमेकांना उपलब्ध व्हावी यासाठी वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मुलींना योग्य जोडीदार निवडता येणार आहे. त्याचबरोबर समाजातील समन्वयकांच्या माध्यमातूनही समस्या वेगाने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. –भूषण कडेकर, विवाहसंस्थेचा वेबसाइटचालक

एक गोष्ट मात्र चांगली पुढे आली आहे, ती म्हणजे नारी जातीला सन्मान दिला जात आहे. आदर दिला जात आहे; मात्र काळाचे आव्हान कसे पेलायचे, समाज संघटित करताना मजबूतीसाठी मदतीला येणारी विवाहाची दोरी कमजोर का होत आहे? त्यावर उपाय शोधणे ही काळाची गरज झाली असल्याचे वास्तव पुढे येत आहे. अर्थात हे आव्हान स्वयंनिर्णयाचे बळ आलेल्या विद्यमान शिक्षित मुलींनी स्वीकारायला हवे, हा एक मतप्रवाह पुढे येत आहे कारण…

असे आव्हान आजच्या निवृत्त, सुशिक्षित, समाजातील मुलांनी पेलून त्यांनी नाती गोती टिकवताना, तत्कालीन अशिक्षित, कमी शिकलेल्या, गरीब मुलींशी विवाह करून उत्तम संसार करून दाखवताना, शिक्षणाचा बाऊ न करता स्वीकारून दाखवले आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा काकणभर कमी शिक्षण असलेल्या, व्यापारात नाव कमावत असलेल्या, स्वाभिमानाने घर, कुटुंब सांभाळत असलेल्या मुलांना स्वीकारण्याचे आव्हान मुलींनी स्वीकारावे. त्याचप्रमाणे समाजाच्या संघटीतपणाची ओळख देण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मात्र…. कोणीतरी जाणीवपूर्वक सुरुवात करावी लागणार आहे.

मुळात मुलींनी शिकले पाहिजेच! कारण त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ येते, आत्मविश्‍वास येतो. विवाहासाठी मनमिळाऊ, कमावता जोडीदार असावा, दोन्हीकडचे आई-वडील असावेत. शेवटी आपल्या संसारात अडचणी आल्या तर आपण समर्थ असताना आईवडिलांची माने दुखावून का वर संशोधन करायचे? अनेक अपेक्षांचे ओझे का लादायचे? हे चुकीचे आहे, असे मला वाटते. मी सुशिक्षित असूनही आई वडील निवडतील त्या वराशीच विवाह करणार. –अनामिक वधू

सुशिक्षित मुलींना व्यवसाय व व्यावसायिक स्थळाच्या बाबतीत आक्षेप नसून पारंपरिक व्यवसायात कौटुंबिक जीवनाला वेळ देता येत नाही, याची खंत आहे. अर्थात आता व्यावसायिकांच्या दिनक्रमात खूप सुधारणा आहेत. त्यामुळे घर आणि व्यवसाय यात सीमारेषा स्पष्ट असेल तर सुशिक्षित मुली अशी स्थळे नाकारू शकत नाहीत; मात्र अशा कुटुंबाचा वैचारिक स्तरही तितकाच आधुनिक विचारसरणीचा असावा असे वाटते. –मेधा खैरे, एक उपवर वधू

काळाच्या ओघात, एकत्रित कुटुंबात वास्तव्य करताना, ते कुटुंब आजही एकसंध ठेवताना, शिक्षित मुली मोठी भूमिका बजावू शकतात. याचीच प्रचिती केमसारख्या खेडेगावातील बारावी पास असलेल्या व्यावसायिकाशी सात वर्षांपूर्वी विवाह केल्यानंतर मला आली. आज सतरा व्यक्तीचे कुटुंबातील एक शिकलेली (पदवीधर व पुण्यातील) सून असल्यामुळे घरातील ज्येष्ठ, सासू-सासरे व सदस्य जो खास आदर, मान व स्वातंत्र्य मला देतात, तोच आनंद मला महत्त्वाचा वाटतो. आज सर्व प्रकारच्या सुखसोयी यात संगणक, इंटरनेट या सुविधा, वीज, पाणी, खेडेगावातही मिळत असताना कौटुंबिक आनंदात दिवस कसा जातो, हे कळत नाही. –गायत्री सागर वारघडे-वासकर, केम (ता. करमाळा)

खरे तर चांगला मुलगा मिळावा यासाठी निकष लावले जाताना अधिकाधिक चांगला मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात नक्की कोणाचे समाधान होणार आहे? योग्य अनुरूप जावई मिळण्यासाठी प्रयत्न हवेत; मात्र ते करताना जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. मुला-मुलींचे विवाह योग्य वयात व्हायला हवेत, उत्तम कुटुंबाशी संबंध जोडला जावा, यात काही अशक्‍य नाही फक्त अवास्तव अपेक्षा असू नयेत असे वाटते. -एक पालक

शक्षण होऊन नोकरी करताना काकांनी जोडीदार निवडला, त्याला आई-वडिलांनी संमती दिली. मी शेतकरी कुटुंबातील व नोकरी करणारी, तर पती शेती व खासगी व्यवसाय करणारा. सासरकडून पाठींबा, त्यामुळे माझी पतीला व पतीची मला साथ मिळाली. त्यातून बारा वर्षांत घर, संसार, शेती, करताना मुलांचे शिक्षण, घरातील इतर सदस्यांची प्रगती व पतीची पत्रकारिता यात उत्तम सुवर्णमध्य साधता आला. यासाठी सहकारी उत्तम हवा इतकेच असावे, असे वाटते. रेश्‍मा पिंगळे-रसाळ, पाबळ

माझ्या परंपरागत व्यवसायात उतरून व्यवसाय विस्तार करताना माझ्या मुलांनी घराचं घरपण टिकवले आहे. त्यामुळे मलाही समाजात तन, मन, धनाने काही करता येत आहे. त्याचवेळी मुलांनी समाजात आपला वेगळा ठसाही उमटवून सामाजिक प्रतिष्ठा कमावली आहे. याची साक्ष सासवड सारख्या वेगाने शहरीकरण झालेल्या भागात असताना “शिक्षण व नोकरी’ या निकषावर मुलांच्या विवाहासाठी प्रयत्न करताना, पिढ्यान्‌ पिढ्यांची नाती गोती, सलोखा “पणाला’ लागत आहे.-प्रवीण पवार, प्रसिद्ध व्यापारी सासवड

जसे वैयक्तिक समुपदेशन असते तसेच सामाजिक समुपदेशनही काळाची गरज आहे. समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मुलींनी सुद्धा सरसकट नोकरीवाला व शहरात राहणारा हा अट्टाहास थोडा बाजूला ठेवावा, असे वाटते. कारण त्यांच्यातील शिक्षण व अंगभूत गुणांमुळे व्यवसायही हायटेक होऊ शकतो. असं काही नाही की शिक्षणाला वाव फक्त नोकरीत मिळतो. शिक्षित मुलींची साथ मिळाल्यामुळे अनेकांनी आपल्या व्यवसायात उत्तुंग भरारी मारून दाखवल्याची उदाहरणे आहेत. डॉ. संतोष जठार, वधूवर मेळावा आयोजक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)