वन, महावितरण अन टॅंकरवरून अधिकाऱ्यांना घेरले

सातारा ः जिल्हा नियोजन सभेमध्ये प्रश्न उपस्थित करताना बाळासाहेब खंदारे. (छाया ः संजय कारंडे)

वृक्षलागवडीची होणार सखोल चौकशी: वारंवार डीपी जळण्यावरून संशय व्यक्त

 जिल्हा नियोजन समिती सभा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा,दि.28 प्रतिनिधी- वन विभागाच्यावतीने लावण्यात येणारे वृक्ष, निधीची तरतूद करून देखील महावितरणकडून डीपी बसविण्यास होत दिरंगाई आणि दुष्काळी तालुक्‍यांमध्ये होत असलेल्या टॅंकर घोटाळ्यावरून आमदारांसह सदस्यांनी खाते प्रमुखांना धारेवर धरले. दरम्यान, आ.जयकुमार गोरे यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर वृक्ष लागवडीची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सन.2019- 20 सालासाठी प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. त्यावेळी आमदारांसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर पालकमंत्र्यांनी चौकशी तसेच कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जि.प.अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर आदी.उपस्थित होते.
सभेदरम्यान, आ.जयकुमार गोरे यांनी वन विभागाचे केवळ पैसे खाण्याचे काम सुरू आहे, असा थेट आरोप केला. तसेच संजय चव्हाण नामक वनअधिकाऱ्याने मुलांच्या नावे स्थापित संस्थेच्या माध्यमातून माण तालुक्‍यात वृक्ष लागवडीची कामे घेतली आहेत. वृक्ष लावण्यासाठी अपेक्षित खोदकाम व माती टाकणे गरजेचे असताना जुजबी वृक्ष लागवड करून बिले काढण्याचे प्रकार घडले असल्याचे सांगितले. त्यावर आ.बाळासाहेब पाटील म्हणाले, माण तालुक्‍यातील हे उदाहरण समोर आले आहे. तसाच प्रकार संपुर्ण जिल्ह्यात झाला असल्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वृक्ष लागवडीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आ.पाटील यांनी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी संबधित चव्हाण अधिकाऱ्यांचा तात्काळ चार्ज काढून दुसऱ्या तालुक्‍यात नेमणूक करा आणि सर्व वृक्ष लागवडीची सखोल चौकशी करा, असा आदेश डिएफओ भारतसिंग हाडा यांना दिले.
वीत वितरणच्या कामाचा आढावा घेताना वारंवार डिपी खराब होत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिक्षक अभियंता रोकडे यांना फैलावर घेतले. पालकमंत्री म्हणाले, तुम्हाला डीपी बसविण्यासाठी 21 कोटी रूपयांची निधीची तरतूद केली तरी देखील नव्याने डीपी का बसविता येत नाही अशी विचारणा केला. त्यावर रोकडे म्हणाल्या, डीपी खरेदीसाठी तीन वेळा टेंडर कॉल केले मात्र, ठेकेदारांनाकडून प्रतिसाद मिळत नाही. असे रोकडेंनी सांगताच सदस्यांनी डिपी सातत्याने का जळतात आणि त्यावर आपण काय उपाययोजना केल्या का, अशी विचारणा केली. त्यावर रोकडे यांनी ज्या ठेकेंदारांकडून सदोष डीपी बसविण्यात आले त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. दरम्यान, आ.गोरे यांनी एका व्यक्तीच्या घरात केवळ दोन बल्ब आहेत आणि त्यांना थेट वर्षाचे लाईटबिल 1 लाख 20 हजार रूपयांचे देण्यात आले. मी लक्ष घातल्यानंतर ते बिल 50 हजार रूपयांनी कमी केले. मात्र, त्या माणसाची 70 हजार रूपये देखील भरण्याची ऐपत नसल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी, त्या व्यक्तीच्या वीज उपकरणांची माहिती घेवून नियमानुसार बिल आकारा, अशा सूचना दिल्या. तर माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर यांनी दुष्काळात वीज वितरणची वसूली न करण्याचे आदेश असताना वसूली केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पालकमंत्र्यांनी संबधित कार्यकारी अभियंत्याला फैलावर घेतले.
माण तालुक्‍यात टॅंकर घोटाळा असल्याचा मुद्दा सभेत चर्चेला घेण्यात आला. आ.गोरे यांनी, टॅंकरचालकांना गावापासून 7 किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची सुविधा असताना बिले वाढविण्यासाठी 30 किलोमीटरवरून पाणी आणण्यात येत आहे. त्याच बरोबर फेऱ्या अधिक दाखवून बिले काढण्यासाठी जीपीएस प्रणालीचा गैरवापर केला जात असल्याचे आ.गोरे यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदेंना त्या टॅंकरचालकांची 7 किलोमीटर नुसारच बिले काढा तसेच जीपीएस प्रणालीचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)