वन बीएचके पर्वाचे पुनरागमन (भाग-१)

नोटाबंदीचा प्रभाव जसजसा कमी होत आहे आणि रेरा कायद्याला वर्ष पूर्ण होण्याबरोबरच अर्थव्यवस्थेचा वेगही वाढत आहे, तसतसे मोठ्या शहरांमधून अनेक निवासी प्रकल्प उभे राहू लागले आहेत. अनेक कारणांमुळे गरज म्हणून घर घेणाऱ्यांची संख्या वाढत असून, जास्त क्षेत्रफळाच्या घरात पैसा गुंतविणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. गरज म्हणून घर खरेदी करणाऱ्यांसाठी सध्या अनुकूल दिवस असून, वन बीएचके पर्व पुन्हा एकदा अवतरत आहे.

महानगरांमधील मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढत असून, त्यामुळे अनेकजण आपल्या राहत्या घराचा विचार करू लागले आहेत. घराचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याच्या मागे अनेकजण लागले असून, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, महानगरातील नागरिकांचे सरासरी मासिक उत्पन्न 40 हजारांच्या घरात पोहोचले असून, गृहकर्जही पहिल्यापेक्षा अधिक सुटसुटीत पद्धतीने उपलब्ध होत आहे. व्याजदरातील सुधारणांमुळेही स्वत:चे घराचे स्वप्न पाहणाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. गृहकर्ज घेण्यासाठी आजची परिस्थिती सर्वाधिक अनुकूल आहे. वन बीएचके घरासाठी मिळणाऱ्या गृहकर्जाचे मासिक हप्ते (इएमआय) भरणे सोपे होईल, अशा प्रकारे गृहकर्ज उपलब्ध होत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांमध्ये स्वतःचे घर विकत घेण्याच्या आकांक्षा पल्लवित झाल्या आहेत. वन बीएचके घरासाठी कर्ज घेणाऱ्याच्या जीवनशैलीवर किमान दहा वर्षे तरी मासिक हप्त्यांमुळे फारसा फरक पडत नाही. त्यामुळे या श्रेणीतील घरांना मागणी वाढली आहे.

घराचे स्वप्न साकार करण्यासाठी काही लोक शहर बदलण्यासही तयार आहेत. मुंबईहून पुण्यासारख्या ठिकाणी स्थलांतरित होण्यास अनेकांची पसंती आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महानगरांमध्ये सरकारी घर राहण्यासाठी मिळते. परंतु त्यांची पुढची पिढी त्याच महानगरात स्वतःचे घर बांधण्याइतकी सक्षम असतेच असे नाही. त्यांचे उत्पन्न मर्यादित असेल, तर असे लोक अन्य शहरांमध्ये स्थलांतरित होण्यास तयार असतात आणि नव्या शहरात जाऊन ते आपले घराचे स्वप्न साकार करतात. त्याचप्रमाणे अशा व्यक्तींना महानगरांमधील मोठे घरभाडेही परवडत नाही. त्यापेक्षा इएमआय भरणे अधिक सोपे असते. त्यामुळे किमान स्वतःचे घर झाल्याचे समाधान त्यांना मिळते. त्यामुळे महानगरांमध्ये अवास्तव भाडे भरून राहण्यापेक्षा तुलनेने लहान शहरात स्थलांतरित होऊन स्वतःचे वन बीएचके घर खरेदी करण्याकडे कल वाढताना दिसतो. हा कल विकसकांनी अचूक हेरला आहे. काही दिवसांपूर्वी टू बीएचके आणि त्याहून मोठे फ्लॅटच अधिक प्रमाणात बांधले जात होते. श्रीमंत वर्गाला परवडतील अशी ही घरे अधिक नफा मिळवून देणारी असल्यामुळे विकसकांचा कल मोठी घरे बांधण्याकडे होता; परंतु बदलत्या परिस्थितीत वन बीएचके घरांच्या योजना तयार करण्याकडे आता विकसक वळत आहेत.

वन बीएचके पर्वाचे पुनरागमन (भाग-२)

नोटाबंदीचा प्रभाव हळूहळू कमी होत आता पूर्णपणे दूर झाला आहे. त्याचप्रमाणे रेरा कायद्याला एक वर्ष पूर्ण झाले असून, अर्थव्यवस्थेलाही पुन्हा उभारी मिळाली आहे. या कारणांमुळेही शहरांत एका पाठोपाठ एक निवासी संकुले उभारण्याचे काम पुन्हा जोर पकडत आहे. शहरांत एक-दोन खोल्यांच्या घरात राहणारे लोक तसेच वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेऊन वास्तव्य करणारे लोक आता स्वतःचा वन बीएचके फ्लॅट शोधत आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहणारे लोक सांगतात की, भाड्याच्या घरात राहतानाच लवकरात लवकर आपले स्वतःचे घर बांधणे किती आवश्‍यक आहे, याची जाणीव होते. स्वतःचे घर जितके लवकर उभे राहील तितक्‍या लवकर भाडे भरण्याचा खर्च बंद होईल आणि बॅंकेचे मासिक हप्ते सुरू होतील. चढ्या दराने भाडे भरण्यापेक्षा इएमआय भरणे लोकांना अधिक सोयीचे वाटू लागले आहे.

– विधिषा देशपांडे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)