वनाज-शिवसृष्टी मेट्रोसाठी सर्वेक्षण सुरू

संग्रहित छायाचित्र

पुणे – प्रस्तावित शिवसृष्टीसाठी चांदणी चौकातील स.नं 99 आणि 100 जागा देण्यास राज्यशासनाने मान्यता दिली असली, तरी ही जागा ताब्यात घेण्यासाठी अजून शासन तसेच महापालिकेने काहीच हालचाल केलेली नाही. तरी, महामेट्रोकडून मात्र, वनाज ते चांदणी चौक या शिवसृष्टीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.

याशिवाय कोथरूड कचरा डेपोची सुमारे 28 एकर जागाही महापालिकेने महामेट्रोच्या ताब्यात दिली आहे. महामेट्रोने या जागेवर जमिनीखालील खडकाचे परीक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती महामेट्रोच्या वनाज ते धान्यगोदाम (रिच-2) चे प्रकल्प व्यस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी दिली.

महापालिकेने कोथरूड येथील कचरा डेपोच्या 28 एकर जागेवर शिवसृष्टी प्रस्तावित केली होती. मात्र, ही जागा मेट्रो डेपोसाठी आवश्‍यक असल्याने शिवसृष्टी नेमकी कोठे होणार, यावरून वाद सुरू झाला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 फेब्रुबारी 2018 रोजी मुंबईत बैठक घेत शिवसृष्टीसाठी चांदणी चौकाच्या परिसरातील प्रस्तावित बीडीपीच्या जागेला मान्यता दिली.

तसेच या जागेचा मोदबला तातडीने ठरवून निर्णय घेण्याचे सुतोवाच केले होते. मात्र, अजूनही बीडीपीबाबत निर्णय झालेला नाही. हे चित्र असतानाच; दुसऱ्या बाजूला चांदणी चौकात शिवसृष्टी होणार असल्याने महामेट्रोने वनाज ते रामवाडी हा मार्ग वनाजपासून शिवसृष्टीपर्यंत वाढविण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार, महामेट्रोने या मार्गांवरील रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. या शिवाय, या चारही मार्गांव्यतिरिक्त सध्याचे दोन मार्ग ज्या ठिकाणी संपतात, तेथून पुढे पाच ते दहा किलोमीटर मार्गांचे सर्वेक्षणही करणार असल्याचे बिऱ्हाडे यांनी म्हटले.

कारशेडसाठी खडकाचे परीक्षण
राज्यशासनाच्या बैठकीनंतर महापालिकेने तातडीने कोथरूड कचराडेपोची जागा महामेट्रोच्या ताब्यात दिली. त्यानुसार, महामेट्रोने या डेपोच्या जागेवर प्रत्यक्ष कामास सुरूवात केली आहे. त्यांतर्गत या डेपोच्या जागेचे “जिओ टेक्‍निकल इन्व्हेस्टिगेशन’ सुरू करण्यात आले आहे. त्यात या डेपोच्या भूगर्भात असलेल्या खडकाची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय, डेपोच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून याचेही काम सुरू केले जाणार असल्याचे बिऱ्हाडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)