वनाज, रेजहिल्स मेट्रो डेपोचे काम सुरू

दोन वर्षांत पूर्ण होणार काम ; 377 कोटींचा खर्च

पुणे – पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (रिच-1) आणि वनाज ते रामवाडी (रिच-2 ) या दोन मेट्रो मार्गांसाठी रेंजहिल्स आणि वनाज (कोथरूड कचराडेपो ) येथे मेट्रो डेपो उभारले जाणार आहेत. या कामाला अखेर सुरूवात झाली आहे. या कामांसाठी सुमारे 377 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

मेट्रो डेपो उभारण्यासाठी बंगळुरू येथील यूआरसी कंस्ट्रक्‍शन कंपनीशी करार केल्याची माहिती वनाज ते धान्यगोदाम मेट्रो मार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ शनिवारी यांनी दिली. या कंपनीने यापूर्वी अहमदाबाद आणि बंगळुरू मेट्रोचे डेपो उभारलेले आहेत.

मेट्रो कोचच्या देखभालीसाठी डेपो तयार करण्यात येणार आहे. यात रेंजहिल्स डेपोसाठी 13.27 हेक्‍टर, तर वनाज डेपोसाठी 12.2 हेक्‍टर जागा लागणार आहे. रेंजहिल्स डेपोमध्ये मेट्रोसाठी एकूण 18 लाइन असतील. तर, वनाज डेपोमध्ये एकूण 12 मेट्रो लाइन असतील. मेट्रो सुरू झाल्यानंतर डब्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी हे डेपो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

सध्या या डेपोचे काम प्राथमिक पातळीवर सुरू झाले असून पुढील दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचा करार यूआरसी कंपनीसह केल्याचे गाडगीळ म्हणाले. डेपोच्या ग्राउंड लेव्हलवर मेट्रो दुरुस्तीचे वर्कशॉप, साहित्य ठेवण्यासाठी स्टोअर रुम, मेट्रोचे कोच धुण्यासाठी वॉशिंग सेंटर आदी अनेक गोष्टी असणार आहेत. हे दोन्ही डेपो जमिनीवरच उभारले जाणार आहेत.

उर्वरित जागांचा व्यावसायिक वापर

रेंजहिल्स आणि वनाज येथील मेट्रो डेपो इमारतींवरील जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी बहुमजली व्यावसयिक हब बांधण्याची योजना आखण्यात येणार आहे. महामेट्रोकडून सुमारे साडेसहा हजार कोटींचे कर्ज घेतले जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी महामेट्रोकडून जागांचा पर्यायी वापर करून त्यावर ठिकाणी व्यावसायिक हब उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले व्यावसायिक हब हे रेंजहिल्स येथील असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)