वनसौंदर्याचा पुरेपूर आस्वाद देणारा : किल्ले कर्नाळा

दुर्गभ्रमंती सोबत निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या मधोमध स्थित असलेला कर्नाळा किल्ला एक उत्तम पर्याय आहे. पनवेल शहराजवळ असलेल्या कर्नाळ्यास पूणे आणि मुंबई शहरापासून एका दिवसाची दुर्गदर्शनाची मोहीम सहज शक्‍य आहे.

पुणे शहरापासून अंतर आहे सुमारे 120 किमी आणि मुंबई पासून सुमारे 50 किमी. कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या प्रवेश कमानी पर्यत स्वतःच्या वाहनाने जाता येते तसेच पनवेल पासून सहा आसनी रिक्षा देखील उपलब्ध आहेत. कमानीपाशी अभयारण्याची प्रवेश फी आणि प्लास्टिक बाटल्यांची अमानत रक्कम द्यावी. समोरील डांबरी रस्त्याने काही अंतर चालल्यावर प्राण्यांचे पिंजरे दिसतात. अभयारण्यातील जखमी झालेले आणि सध्या औषधोपचार चालू असलेल्या पक्ष्यांना आणि इतर काही प्राण्यांना इथे ठेवले जाते. पिंजर्यांना वळसा मारून त्यांच्या मागूनच सुरु होते कर्नाळा किल्ल्याची चढण.

किल्ल्यावर जाणारा डोंगराळ मार्ग चांगला प्रशस्त आहे आणि दुतर्फा अभयारण्याच्या झाडांची घनदाट सावली असल्यामुळे चढणीचा फारसा त्रास होत नाही. दगडधोंड्यांच्या आणि गर्द वनराईच्या मार्गाने सुमारे तासाभराच्या चढणीनन्तर आपण डोंगराच्या मुख्य सोंडेवर येऊन पोहोचतो. इथून उजव्या हाताला सुमारे अर्धातास चालल्यावर कर्नाळा गड दृष्टिक्षेपात येतो. गडामध्ये प्रवेश करायला दोन प्रवेशद्वारे आहेत. विशेष म्हणजे हि दोन्ही द्वारे शिवकालीन गोमुखी पद्धतीने बांधलेली नाहीत. प्रथम दरवाज्याच्या पायऱ्यांची झीज झाल्यामुळे तिथे आधारासाठी लोखन्डी गज लावले आहेत.

कर्नाळा गडाच्या मधोमध असलेला उंच, अजस्त्र, महाकाय, सरळसोट उभा असलेला पूर्णपणे गोलाकार डोंगरी टेम्भा. सम्पूर्ण सह्याद्रीमंडळात असलेल्या अनेक गडकोटांपैकी कोणत्याही गडाच्या मधोमध असा महाप्रचंड सुळका दुसरीकडे कोठेच दिसणार नाही. ह्या सुळक्‍यावर चढण्यासाठी प्रस्तारोहणाचे साहित्य वापरूनच जावे लागते. मात्र ह्याच्या पायापाशी उभे राहून वर पाहताच त्याचा आकार आणि प्रचण्डपणा पाहूनच छाती दडपून जाते. दूरवरून पाहिल्यास ह्या सूळक्‍याचा आकार हा मानवी अंगढ्यासारखा दिसतो आणि त्यामुळेच पनवेल, माथेरान नजीकच्या अनेक डोंगररांगांवरून कर्नाळा किल्ला सहजगत्या ओळखता येतो. जर आकाशातून कधी कर्नाळा किल्ला पहिला तर मला वाटते कि ह्या सुळक्‍यामुळे किल्ल्याचा आकार शिवलिंगप्रमाणे दिसत असावा. सुळक्‍याच्या पायथ्याशी खडकात खोदलेल्या अनेक पाण्याच्या टाक्‍या आणि साठवणुकीच्या खोल्या दिसतात. भर उन्हाळ्यात देखील ह्या टाक्‍यांमधील पाणी कधीही आटत नाही मात्र सद्यस्थितीत येथील पाणी पिण्यायोग्य नाही. सुळक्‍याच्या डाव्या बाजूने काही अंतर चालल्यावर गडाचा तिसरा दरवाजा नजरेस येतो आणि त्या पुढे आहे एक प्रशस्त माची. माचीच्या संरक्षणासाठी हा तिसरा दरवाजा आणि आजूबाजूच्या बुरुजांची बांधणी केलेली आढळते.

कर्नाळा किल्ल्यास भेट देण्यास कोणताही ऋतू उत्तम आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर येथे येणे कधीही चांगले मात्र भर उन्हाळ्यात जरी कर्नाळा किल्ल्यास भेट दिली तरी अभयारण्याच्या आल्हाददायक वातारणामुळे उन्हाचा अजिबात त्रास होत नाही. पुणे ,मुंबई शहराच्या धकाधकीच्या दिनचर्येपासुन, पक्ष्यांचा मधुर गुंजारव ऐकत निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवण्यास आणि वन सौन्दर्याचा आस्वाद लुटण्यास कर्नाळा किल्ला हा एक उत्तम पर्याय आहे.

– प्रसाद जोशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)