वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला

संग्रहित फोटो

संगमनेर : सोमवारी पहाटेच्या सुमारास संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या मंगळवारी मध्यरात्री अलगदपणे अडकला असून अद्याप दोन बिबटे या परिसरात असल्याने घबराट कायम आहे. तीनपैकी एक बिबट्या पिंजऱ्यात आल्याने नेमका नरभक्षक बिबट्या कोणता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संगमनेरनजीक मालदाड गावाजवळ दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या खळई मळा येथील उत्तम दत्तु नवले यांच्याकडे शेत मजूर म्हणून अकोले तालुक्यातील तांभेळ येथील दाम्पत्य काम करते. सोमवारी पहाटे चार-साडेचारच्या सुमारास आईसोबत प्रातविधीसाठी घराबाहेर पडलेल्या चार वर्षाच्या अश्विनी सिताराम कडाळे या चिमुकलीवर आईसमोरच बिबट्याने हल्ला केला होता. आईच्या ओरडण्यानंतर तिचा गळा पंजात पकडून तिला नेण्याच्या बेतात असलेल्या बिबट्याला तिच्या वडिलांनी दगड मारल्याने त्याने तिला तेथेच सोडून पलायन केले होते.

दरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परिसरात तीन-चार बिबटे सातत्याने दिसत असल्याने त्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. सोमवारच्या घटनेनंतर लगेचच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाजवळ पिंजरे लावले. मंगळवारी मध्यरात्री एक बिबट्या यात अलगदपणे अडकल्याचे सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यामुळे तेथे ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी पकडलेल्या बिबट्याला निंबाळे येथील नर्सरीत आणले आहे.

खळईमळा येथील भाग डोंगर आणि झाडाझुडपांचा आहे. या परिसरात डाळींबाच्या बागा आहेत. त्यामुळे तेथे लपण्यासाठी बिबट्यांना पुरेसी जागा आहे. याच कारणामुळे या परिसरात तीन बिबट्यांचा वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. मंगळवारी पिंजऱ्यात एक बिबट्या अडकल्यानंतर अद्यापही दोन बिबटे या परिसरात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)