वनविभागाच्या वतीने लाभार्थ्यांना शेगडी आणि सिलेंडर वाटप

वडगाव मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्‍यातील वनपरिक्षेत्रातील वृक्षतोड व वनाचा ऱ्हास रोखण्यासाठी संयुक्‍त वन व्यवस्थापन समितीतंर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना 75 टक्के शासनाच्या अनुदानावर घरगुती स्वयंपाक गॅसचे वाटप सुरू आहे.

वडगाव मावळ वनपरिक्षेत्राधिकारी सोमनाथ ताकवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्‍यातील वनपरिक्षेत्राच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या कुटुंबाकडून घरगुती स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडासाठी वृक्षांची तोड केली जाते. यामुळे वनक्षेत्रातील घनदाट वने नष्ट झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. नैसर्गिक संतुलन बिघडल्याने अनेक आपत्तींचा सामना करावा लागतो.

वनक्षेत्राच्या हद्दीतील घनदाट वनांचे संवर्धन व संरक्षणासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना 75 टक्के शासनाच्या अनुदानावर घरगुती स्वयंपाक गॅसचे वाटप सुरू आहे. शासनातर्फे 4,900 रुपये अनुदान रक्कम देवून त्यांना घरगुती स्वयंपाक गॅस देवून प्रथम वर्षाला 12 सिलेंडर, द्वितीय वर्षाला 8 सिलेंडर, तृतीय वर्षाला 6 सिलेंडर व चतुर्थ वर्षाला 4 सिलेंडर असे सिलेंडर अनुदानावर दिले जातात. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)