वनरक्षकावर हल्ला करणारे दोघे जेरबंद

राहू येथे गुन्हा करून होते फरारी; दोन दिवसांची पोलीस कोठडी

यवत- दौंड तालुक्‍यातील राहू येथे वनरक्षकावर हल्ला करून पाच महिन्यांपासून फरारी असलेल्या दोघांना गुरूवारी (दि.28) जेरबंद केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले. दोन्ही आरोपींना बारामती येथील सत्र न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने (दि.1 एप्रिल) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
या प्रकरणी फिरोज आदम शेख (वय 29, रा.राहू समतानगर, ता.दौंड) व सचिन चंद्रकांत नाणेकर (वय 28, रा.मेमाणेवाडी, वडगाव बांडे, ता. दौंड सध्या रा.उरुळी कांचन आश्रमरोड, ता. हवेली) अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी आहे की, राहू गावच्या हद्दीत सटवाईचे ओढ्यालगत राखीव वनक्षेत्र गट क्रमांक 1198 येथे वनरक्षक अरुण देशमुख हे सदर ठिकाणी गेले. यावेळी आरोपी रामभाऊ दादासाहेब सोनवणे व त्याचे 3 साथीदार हे वनविभागाच्या जागेत एक जेसीबी व 2 ट्रकच्या सहाय्याने फॉरेस्टचे हद्दीतील जागेत बेकायदेशीर काम करीत होते. त्याबाबत वनरक्षक देशमुख यांनी विचारपूस केली असता आरोपी रामभाऊ सोनवणे व त्याचे तीन साथीदार आरोपी यांनी वनरक्षकांना शिवीगाळ व दमदाटी करून, जा तुला काय करायचे ते कर, असे म्हणत आरोपी रामभाऊ सोनवणे याने त्याची सफारी गाडी वनरक्षक देशमुख यांच्या मोटार सायकलवर धडक देत देशमुख यांच्या अंगावर सफारी गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांचा मोबाइल फोन व त्यांच्या ताब्यातील सरकारी पुस्तक जबरीने हिसकावून चोरून घेत निघून गेले.

याबाबतची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार झाले होते. त्यानंतर आरोपी रामभाऊ दादासाहेब सोनवणे यास यवत पोलीस ठाण्याचे पोलीसांनी अटक केली होती. यातील इतर तीन आरोपी फरार झाले होते. त्यापैकी दोन आरोपी उरुळी कांचन शिंदावणे रोड येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम यांच्या पथकाने उरुळी कांचन येथून फरार आरोपी फिरोज आदम शेख व सचिन चंद्रकांत नाणेकर याला ताब्यात घेऊन यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)