वधूची मैत्रीण असल्याचे भासवून तीन लाखांचे दागिने लंपास

जेजुरी पोलीस ठाणे हद्दीतील लग्न कार्यातील घटना ःदोन महिलांविरोधात फिर्याद दाखल

जेजुरी -विवाहामध्ये वधूच्या मैत्रीणी असल्याचे भासवत वऱ्हाडी मंडळींमध्ये मिसळून सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज दोन अज्ञात महिलांनी लंपास केला आहे. ही घटना जेजुरी -मोरगाव रस्त्यावरील गणेश मंगल कार्यालयात बुधवारी (दि. 21) दुपारी 4 च्या दरम्यान घडली. याबाबत ईशा संजय फडके (मूळ रा. फलटण, जि. सातारा, सध्या रा. हडपसर, पुणे) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिलांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ईशा संजय फडके यांच्या आतेभावाचे लग्न येथील गणेश मंगल कार्यालयात बुधवारी (दि. 21) असल्याने त्या नातेवाईकांसह लग्नास आल्या होत्या. वधू पक्षाला दोन व वरपक्षाला दोन अशा खोल्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याचे सुमारास 25 ते 30 वयोगटातील दोन महिला वरपक्षाच्या खोलीत आल्या. यावेळी त्यांना ओळख विचारली असता त्यांनी वधूच्या मैत्रिणी असल्याचे सांगितले. संबंधित दोन महिलांनी आपले कपडे व्यवस्थित करून पुन्हा विवाहाच्या ठिकाणी गेल्या. त्यानंतर वरपक्षातील मंडळी खोलीला कुलूप लावून विवाहाच्या मंडपात गेली.

दुपारी लग्नविधी पार पडल्यानंतर पुन्हा खोलीत येऊन वधूची आई कल्पना विश्वास थोरात यांनी मुलीला देण्यात आलेल्या भेटी तसेच मुलीच्या अंगावरील दागिने, स्वतःचे दागिने, रोख रक्‍कम सर्व एका सुटकेसमध्ये ठेवल्या होत्या. ती सुटकेस त्यांनी वधूपक्षाच्या खोलीमध्ये 4 वाजता ठेवून त्या पुन्हा लग्न मंडपात आल्या. यानंतर पुन्हा 4:15चे दरम्यान खोलीत जाऊन पाहिले असता दागिने व ऐवज ठेवलेली सुटकेस आढळून आली नाही. दागिने व ऐवज असलेली सुटकेस चोरी झाल्याची खात्री पटताच लग्नात दोन अनोळखी महिलांबाबत वधूला विचारण्यात आले असता त्या ओळखीच्या नसल्याचे समजले. दरम्यानच्या काळात दोन मिनिटे वीज पुरवठा ही खंडीत झाला होता. कार्यालयात दोन महिलांचा शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.
घडलेल्या चोरीच्या घटनेत सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र, कानातील झुबे, सोन्याची नथ, चांदीच्या वाट्या, जोडवी, रोख 15 हजार रुपये, नवी साडी, सुटकेस असा 2 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज दोन अज्ञात संशयित महिलांनी लंपास केला आहे. त्या दोन महिलांचे वय अंदाजे 25 ते 30 असून उंची साडेपाच फूट, रंग निमगोरा, एकीच्या अंगात ऑफव्हाईट रंगाची साडी, गळ्यात मंगळसूत्र तर दुसरी गुलाबी रंगाच्या सलवार कुर्त्यामध्ये आहे, असे दोन महिलांचे वर्णन आहे. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांकडून मौल्यवान ऐवज लंपास करण्याची ही तिसरी घटना आहे. दहा दिवसांपूर्वी धनकवडी येथील एका परिवाराचे सुमारे 51 तोळे दागिने असलेला डबा अज्ञात महिलांनी चोरला होता. जेजुरी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात संशयित महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश माळेगावे हे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)