वढु बुद्रुकमध्ये बिबट्याने पाडला वासराचा फडशा

वढू बुद्रुक/कोरेगाव भीमा-गेले वर्षभर वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील परिसरात बिबट्याचा व त्याच्या पिलांचा वावर असून काही दिवस परिसरात शांतता असतानाच रविवारी (दि.16) सायंकाळी पुन्हा बिबट्याने येथील शिवले मळळ्यातील सोमनाथ शिवले यांच्या गोठ्यातील वासरु बिबट्याने फस्त केले. यामुळे या परिसरात बिबट्याने आपला उपद्रव सुरु केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागल्याने वन विभागापुढे आव्हान उभे राहिले आहे.
वढु बुद्रुक (ता. शिरुर) याठिकाणी वासरे, शेळळ्या-मेंढ्या याबरोबरच बिबट्याने थेट मनुष्यावर हल्ले चढविले होत असल्याने गेले वर्षभर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी गावामध्ये आपल्या वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनजागृती केली होती. मात्र, बिबट्या पिंजरा लावूनही पकडला जात नसल्याने नागरिकांना आजही शेतात ये-जा करणे जीव घेणे ठरु शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वढु परिसरात चार ते पाच बिबटे असण्याची शक्‍यता नागरिक व्यक्त केली असून आजही बिबट्या पकडण्यासाठी केवळ पिंजरा लावण्यापलीकडे कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने नागरिक संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी (दि.17) पहाटे वढु बुद्रुक येथील केंदूर रस्त्यालगत असणाऱ्या शिवले मळा येथील शेतकरी सोमनाथ बारकू शिवले यांच्या गोठ्यातून बिबट्याने साडेतीन महिने वयाचे वासरू बिबट्याने गोठ्याबाहेर ओढून ठार मारले. तसेच त्यानंतर बिबट्याने शेतात धूम ठोकली. सकाळी शिवले गोठ्याकडे आले असता त्यांना वासरू मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांनी या परिसरातील वनरक्षक राठोड यांच्याशी संपर्क साधून बिबट्याने गोठ्यावर हल्ला केल्याचे सांगितले. तसेच काही महिन्यांपूर्वी भंडारे या वृद्धावर ज्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला झाला त्या ठिकाणाहून या हल्ल्‌याचे ठिकाण 5 -6 किलोमीटर दूर आहे. वनरक्षक घटनास्थळी पोहचेपर्यंत बिबट्याने केलेली शिकार घेऊन बिबट्या परत शेतात निघून गेल्याने गोठ्याच्या शेजारी वासरू कोणालाच दिसले नाही.
याबाबत जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वनविभागाला ज्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला होत आहे, त्या ठिकाणी पिंजरा लावण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनी देखील न घाबरता वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ बिबट्या दिसल्यास संपर्क साधावा.

  • ज्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला झाला. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आलेले नाहीत. तसेच त्या ठिकाणी वासराचा कोणताही असल्याचा पुरावा दिसला नाही. तरी देखील या भागातील नागरिकांचे म्हणण्यानुसार मंगळवारी (दि. 18) दुपारी वखारीचा मळा या भागात पिंजरा लावण्यात येणार आहे.
    – सोनाली राठोड, वनरक्षक
  • नागरिकांना वन विभागाचे आवाहन
    शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने न जाता समुहाने जावे. शेतात जाताना सोबत फटाके किंवा मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावावीत. हातात काठी व बॅटरी असावी. महिलांनी शेतात काम करताना विरुध्द दिशेकडे तोंड करुन काम करावे जेणे करुन बिबट्याची हालचाल लक्षात येईल, अशा विविध प्रकारच्या सूचना नागरिकांनी लक्षात घेऊन त्या अंमलात आणाव्यात, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी केले आहे.
  • इन्फारेड कॅमेऱ्यांचं झाल काय?
    वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी 10 मे रोजी वढुमध्ये इन्फारेड कॅमेरे बसविणार असल्याचे सांगूनही आजपर्यंत परिसरात एकही कॅमेरे बसविला नसल्याने इन्फारेड कॅमेरे नसल्याने बिबट्या पकडण्यासाठी अद्याप ठोस कारवाई न झाल्याचे दिसत आहे. याबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)