वडोली निळेश्वर गावातील पाण्याची टाकी धोकादायक

पेयजल योजनेत समावेश नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप

कोपर्डे हवेली, दि. 6 (वार्ताहर) -वडोली निळेश्वर, ता. कराड येथील पिण्याच्या पाण्याची टाकी धोकादायक बनली आहे. अनेक वेळा ग्रामसभेचे ठराव तसेच संबंधित विभागाला पत्रव्यवहार करुनही पेयजल योजनेत गावाचा समावेश न करण्यात आल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावात शासनाने पेयेजेल योजनेला मंजूरी दिली आहे. मात्र वडोली निळेश्वरचा समावेश का करण्यात आला नाही. याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी यात लक्ष घालून गावाचा नव्याने या योजनेत सामावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
गावाच्या दक्षिण दिशेस असणार्‍या पाण्याच्या टाकीतून निम्म्या गावाला पाणी पुरवठा होत असतो. टाकीची कालमर्यादा संपल्याने टाकी धोकादायक बनली आहे. टाकीनजीक अनेक ग्रामस्थांची घरे आहेत. टाकीला अनेक ठिकाणी गळती लागली असून कितीही टाकीत पाणी भरले तरी टाकी लगेच रिकामी होते. तसेच पाण्याच्या टाकीच्या स्लॅबचे सिमेंटचे पोपडे अनेक ठिकाणी निघाल्याने आतील लोखंड गंजले आहे. त्यामुळे टाकी कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या तपासणी अहवालात ही टाकी वापरण्यास योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गावाच्या ग्रामसभेत दोन वेळा नवीन टाकीच्या ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागासही त्याबाबतचा तपशील व टाकी कालबाह्य असलेला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अहवाल देण्यात आला आहे.
पाण्याच्या टाकीबरोबर जुनी पाणी वितरण व्यवस्था कालबाह्य झाली आहे. अनेक वेळा ठिकठिकाणी ही पाईपलाईन सतत फुटत असते. पाणी पुरवठा करणार्‍या विहीरीत पावसाचे पाणी जाऊन रोगराईचे प्रमाणही वाढते. गावाची गरज ओळखून पेयजल योजनेत गावाचा समावेश करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरीत आहे.

पेयजलमध्ये समावेश करावा
वडोली निळेेश्वर या गावात पाणी पुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाकीला बर्‍याच दिवसांपासून गळती लागल्याने ती निम्मीच भरली जाते. टाकीला तडे गेले असल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरत असल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तसेच या टाकी शेजारी अनेक ग्रामस्थांची घरे आहेत. शिवाय या ठिकाणी लोकांची नेहमीच वर्दळ असते. टाकी धोकादायक स्थितीत असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात ही टाकी धोकादायक ठरु शकते. त्यासाठी पेयजल योजनेत सामावेश करणे गरजेचे बनले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)