वडूजच्या चैतन्य पतसंस्थेतील अपहारप्रकरणी 24 जणांवर गुन्हा

18 कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा घोटाळा; संजय इनामदारसह 23 जणांवर गुन्हा

वडूज/प्रतिनिधी :

येथील चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत कोट्यावधी रूपयांचे अनियमीत व्यवहार करून ठेवीदारांच्या पैश्‍यांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्ष, संचालकांसह अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 24 जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सनदी लेखापाल विष्णू बाळासाहेब साळुंखे (वय 35, मूळ रा. कुशी, पोस्ट नागेवाडी, ता.जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साळुंखे हे पुणे येथील राजकिशोर ऍन्ड असोसिएटस्‌ या लेखा परिक्षक फर्मचे भागीदार असून त्यांच्याकडे 14 सप्टेंबर 2015 पासून चैतन्य पतसंस्थेच्या लेखा परिक्षणाची जबाबदारी आहे. सन 2015 – 16 या आर्थिक वर्षात आपणास संस्थेमध्ये अनेक गैरव्यवहार तसेच अफरातफर आढळून आली. या प्रकरणी आपण सातारा येथील उपनिबंधक कार्यालयात अहवाल सादर केला.

त्यांच्या सुचनेनुसार गुन्हा नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेमध्ये 13 कोटी 72 लाख 64 हजार रूपयांचे बोगस कर्जवाटप करून अपहार करण्यात आला आहे. या कर्ज प्रकरणाचे अर्ज, वचनचिठ्ठी , कर्जरोखे अपूर्ण लिहीले आहेत. लेखा परिक्षणावेळी पतसंस्था व्यवस्थापनाने कागदपत्रे सादर केली नाहीत.

कर्जास योग्य मालमत्ता तारण घेतली नाही. कर्जातून पोट नियमानुसार शेअर कपात केली नाही. म्हणून पतसंस्थेच्या गैरव्यवहारात दिवंगत संस्थापक डॉ. गजानन दिगंबर इनामदार, त्यांचे बंधू व विद्यमान अध्यक्ष संजय दिगंबर इनामदार, संचालक गजानन भास्कर येळगावकर, जितेंद्र जवाहर गांधी, कमलाकर नरसिंहराव देशमुख, श्‍यामराव नथू रूपनवर, हणमंत निवृत्ती कुदळे, तेजस अंकुश मोरे, सौ. स्विटी जितेंद्र गांधी, रूक्‍मिणी हरीदास शिंदे, मुख्य व्यवस्थापक संतोष नंदकुमार इनामदार, व्यवस्थापक शैलेश रमेश देशपांडे, यांच्यासह कर्मचारी शिवाजी रघुनाथ काळे, निलेश गजानन येळगावकर, रविंद्र आनंदराव गोडसे, प्रसाद भानुदास निकम, अमित विलास काळे, अमोल विलास पुंडेकर, मकरंद अरविंद कुलकर्णी, सागर नामदेव रोमण, भानुदास वसंत काळोखे, वैभव गजानन दानवे, धिरज अशोक काटकर, संतोष मधुकर काळे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…असा आहे अपहार
चैतन्य पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून 13 कोटी 72 लाख 64 हजार 920 रूपयांचा अपहार केला आहे. तर दफ्तरामध्ये ऍक्‍सिस बॅंकेच्या खात्यात 31 मार्च 2016 अखेर 1 कोटी 68 लाख 61 हजार 166 रूपये एवढी शिल्लक रक्कम दाखविली आहे. प्रत्यक्षात बॅंकेच्या खात्यात शिल्लक दिसत नाही. आरोपींनी एका ठेवीदाराच्या नावावरील रक्कमेवर इतरांची संमती पत्रे न घेता कर्ज वाटप केले आहे. संस्थेच्या वडूज येथील मुख्य कार्यालयात ठेव रक्कम नसताना ठेव तारण कर्ज वाटप करून 2 कोटी 87 लाख 66 हजार 247 रूपयांचा अपहार केला आहे. अशा प्रकारे एकूण 18 कोटी 28 लाख 92 हजार 334 रूपयांचा अपहार झाल्याचे फिर्यादी साळुंखे यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)