वडापाव खाण्यासाठीच नगराध्यक्ष बोलावतात का?

बारामती- बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेत सत्तारुढ पक्षाच्या नगरसेविका व नगरसेवकांसह विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांना नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी बोलूच दिले नाही. त्यामुळे सभेत बोलू द्यायचे नसेल तर आम्हाला काय वडापाव खाण्यासाठी बोलावले जाते काय? चर्चा न करताच सभा संपल्याचे नगराध्यक्ष जाहीर करतात. केवळ नावालाच सभा घ्यायची असेल तर याला अशा सभेला अर्थ नाही, असे खडे बोल नगराध्यक्षांना उपस्थितांनी सुनावले.
बारामती शहरातील आरोग्य विषयावर आरोग्य समितीच्या सभापती तरन्नुम सय्यद यांना बोलावयाचे होते. मात्र, नगराध्यक्ष तावरे यांनी, आपण नंतर बोलू असे सांगून सय्यद यांना गप्प बसवले. सर्वसाधारण सभेत महत्त्वाच्या विषयावर बोलू दिले जात नसेल तर याचा अर्थ काय होतो? प्रश्‍न विचारणारे आणि नुसतीच मान डोलावणारे नगरसेवक, असे सत्तारुढ गटातच दोन गट पडल्याचे सातत्याने जाणवत आहे.
आरोग्य खात्यात 90 कर्मचारी नगरपालिकेचे असून 37 कर्मचारी ठेकेदारांचे आहेत. नगरपालिका हद्दवाढ झाल्यामुळे आणखी 160 कर्मचाऱ्यांची गरज आहे, अशा स्थितीतही मागील सर्वसाधारण सभेत आरोग्याविषयक आलेली सात टेंडर प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. या टेंडरप्रमाणे आरोग्या खात्यास कर्मचारी मिळणार आहेत. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी काही त्रुटी काढून या निविदाच प्रलंबित ठेवल्या आहेत, असा आक्षेप आरोग्य सभापतींनी केला आहे. बारामतीच्या काही प्रभागात तब्ब्ल दहा ते बारा दिवसात घंटागाडी कचऱ्यासाठी जात असल्याने कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी सांगितले की, आरोग्य विभागासाठी नगरपालिकेच्या निधी पेक्षा शासनाकडून आलेला पाच कोटींपेक्षा जास्तीचा फंड वापरून आरोग्य विभागाची पुढील तीन वर्षाकरीताची कामे निविदा पध्दतीने केली जातील. याबाबतच्या इस्टिमेट तयार करण्याचे काम सुरु असून जिल्हाधिकाऱ्यांकडून या कामांना परवानगी मिळेल्यानंतर ही कामे केली जातील. नगरपालिकेतून 52 अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले आहेत तर काही राज्य सरकारने काढून घेतले आहेत तर काहींच्या बदल्या झाल्या आहेत, असेही मुख्याधिकारी कडूसकर यांनी स्पष्ट केले. सभेस नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी काम पाहिले. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, नगरसेवक संजय संघवी, गणेश सोनवणे, नवनाथ बल्लाळ, विरोधीपक्ष नेते सुनिल सस्ते, विष्णुपंत चौधर, नगरसेविका तरन्नुम सय्याद, निता चव्हाण, निलिमा मलगुंडे, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, तसेच नगसेविका नगरसेवक आदि मान्यावर उपस्थित होते.

  • दफन भूमीसाठी जागा आरक्षित…
    बारामती नगरपरिषदेच्या मुळ हद्दीच्या सुधारीत विकास आराखडा मंजूर झाला असून यात सर्व्हे नं. 36 पैकी क्षेत्रावरील आरक्षण क्र. 43 या संपूर्ण क्षेत्रावर दफन भूमीसाठी आरक्षित करण्यात यावे तसेच बारामती येथील मुस्लिम समाजाकरीता बहुउद्देशिय सभागृह बांधण्याकरीता जागा निश्‍चित करण्याचा निर्णय सभेत मंजूर करण्यात आला. या मागण्यांसाठी मुस्लिम समाजाने नुकतेच उपोषण केले होते.
  • उर्दु शाळबाबतचा प्रस्ताव करणार…
    तन्जीम ए वालेदिन उर्दु मदारीस उर्दु पालक संघ, पुणे यांच्या पत्रानुसार इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतची उर्दु शाळा नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावी व उर्दु माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षण घेण्याची सोय बारामतीत व्हावी. ही अनुदानित शाळा नगरपालिकेकडे शासनाच्या अनुदान मिळणाऱ्या बाबींसह हस्तांतरीत करुन घेण्यात यावी. यासाठी सक्षम प्राधिकरणाची व शिक्षण विभागाची संमत्ती घेणे आवश्‍यक असल्याने याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव करण्याचे या सभेत ठरले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)