वडगाव गुप्ता गावाचा पाच वर्षात कायापालट करणार

फक्‍त वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन- सरपंच शेवाळे
नगर – वडगाव गुप्ता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील सर्व ग्रामस्थांच्या व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पाच वर्षात फक्‍त वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन करुन हरित वडगाव गुप्ता करुन गावाचा पाच वर्षात सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचीत सरपंच विजयराव शेवाळे यांनी दिली.
वडगाव गुप्ताचे सरपंच विजयराव शेवाळे यांचा दि. 3 रोजी 51 वा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये राधाताई महाराज सानप, मिराबाई संस्थान बाडे, विद्याविनोद प्रकाश महाराज साठे, समाज प्रबोधनकार ज्ञानेश्‍वर महाराज पठाडे (कर्जत) यांचे किर्तन होणार आहे. दि.3 रोजी सरपंच शेवाळे यांच्या मातोश्री गं.भा.यशोदाबाई मुरलीधर शेवाळे यांची लाडुतुला कार्यक्रम होणार आहे.
शेवाळे यांनी दै.”प्रभात’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, वडगाव गुप्ताची नाविण्यपूर्ण ओळख निर्माण करावयाची आहे. गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे. शालेय व विद्यालय, कॉलेज परिसर स्वच्छ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. वाढदिवसानिमित्त रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण गाव स्वच्छ करीत असताना प्लॅस्टिक गोळा करणे, तणनाशकाची फवारणी केलेली आहे. वृक्षारोपण करीत असताना 10 ते 15 फुट उंचीची झाडांची लागवड केलेली आहे. त्या झाडांना नियमित पाणी देऊन वृक्षासंवर्धन केले जाणार आहे.
सरपंचपदावर निवड झाल्यानंतर नागरिकांच्या सोईसाठी गतिमान प्रशासनावर भर दिलेला आहे. ग्रामस्थांच्या अडीअडचणी लवकरात लवकर सोडविणार आहे.गावात घंटागाडी, जॉगिंग पार्क, योगापार्क, प्ले-ग्राऊंड, जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना खेळासाठी विविध योजना हाती घेतलेल्या आहेत. त्यांना खेळासाठी साहित्ये उपलब्ध करुन देणार आहे. ग्रामस्थांच्या आरोग्य सुधारण्याबाबत विशेष लक्ष देणार आहे. शासनाच्या विविध योजना वंचित घटकांना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. सीना नदी साफसफाई करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून गावातील ग्रामस्थांना वेळेवर पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन नवनवीन संकल्पना राबविणार असल्याचे सरपंच शेवाळे यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)