वटपौर्णिमा : सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

12 घटना : शहरात गस्त वाढविण्याचे दुपारनंतर सूचले शहाणपण
– सांगवी पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक चार घटना

पुणे – वटपौर्णिमेच्या दिवशी नटूनथटून, अंगावर सोने घालून बाहेर पडलेल्या महिलांना सोनसाखळी चोरांनी लक्ष्य केले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 12 सोनासाखळी चोरीच्या घटना बुधवारी दुपारपर्यंत घडल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत. या घटनांची तातडीने दखल घेत पोलिसांनी शहरामध्ये दुपारनंतर मोठ्या प्रमाणात गस्त वाढवली तसेच काही ठिकाणी नाकेबंदी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात दररोज सोनसाखळी, मोबाइल चोरी व पाकिटमारीच्या घटना घडतात. याप्रकरणी आजवर अनेकांना अटकही झाली आहे. तरीही, या क्षेत्रात चोरटे नव्याने दाखल होत आहेत. यामुळे या घटना रोखणे पोलिसांना शक्‍य होत नाही. बुधवारी वटपौर्णिमा असल्यामुळे पूजेसाठी अनेक महिला सोन्याचे दागिने अंगावर घालून बाहेर पडल्या. यामुळे ही संधी साधत सोनसाखळी चोरट्यांनी शहरभर धुमाकूळ घातला. शहरातील सांगवी पोलीस ठाण्यात सर्वाधिक चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा मिनिटाच्या अंतराने दोन घटना घडल्या आहेत. तसेच, वाकड, शिवाजीनगर, लष्कर, डेक्कन, कोंढवा आणि भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. दुपारपर्यंत तब्बल 12 सोनसाखळी चोरीच्या घटनांची नोंद झाली होती.

महिलांनो, स्वत:च काळजी घ्या
शहरात दरारोच सोन साखळीच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात पोलिसही वेळोवेळी जनजागृती करतात. माध्यमातूनही यासंदर्भातील घटना प्रसिद्ध होतात. मात्र असे असतानाही महिला दागिने घालताना कोणत्याही प्रकारे काळजी घेताना दिसत नाहीत. वट पोर्णिमेच्या दिवशीही मोठ मोठी मंगळसूत्र गळ्याबाहेर लटकवत व इतर दागिने घालून महिला घराबाहेर पडलेल्या दिसत होत्या. रस्त्याने जाताना त्या दागिन्यांची कोणतीही काळजी घेताना दिसत नव्हत्या. नेमकी हीच बाब चोरट्यांच्या पथ्यावर पडली.

शहरात दुपारपर्यंत आठ घटनांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. यानंतर नाकाबंदी करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांना “अलर्ट’ करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे निरीक्षक व तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत.
– पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)