वजन…

– हिमांशू

आजकाल वजनाला सर्वाधिक किंमत आहे. किंबहुना कुणालाही आणि कशालाही हल्ली वजनाप्रमाणंच किंमत मिळते. गुणवत्तेनुसार मूल्य ठरण्याचे दिवस मागे पडले. उमेदवारी अर्ज भरताना नेत्याच्या मागे गर्दी किती, यावरून मतदार अंदाज घेतात. त्यामुळं नेतेमंडळी हल्ली ढोलताशे लावून, फटाके लावून सरळ मिरवणुकाच काढतात. पूर्वी विजयी मिरवणुकाही एवढ्या मोठ्या नसत. हल्ली फॉर्म भरणं हाही इव्हेन्टच समजतात नेते. एवढं करून उमेदवारानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात किती आणि कोणत्या गुन्ह्यांचा उल्लेख केलाय, हे केवळ बातमीत वाचून लोक विसरून जातात. लक्षात ठेवतात फक्त तामझाम. सभेतसुद्धा हल्ली गर्दी आणि झगमगाट असावा लागतो. मंचावरून विचार मांडले जातात की नाही, याकडे कोणी लक्ष देत नाही. तिथंही वजन वाढवण्याचाच प्रयत्न जास्त होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्थात, आपलं वजन वाढवण्याजोगं नेत्यांकडे सांगायला काही नसतं. मग प्रतिस्पर्ध्याचं वजन कमी करून त्याच्यापेक्षा आपण वजनदार असल्याचं ठसवलं जातं. मीडियासुद्धा हल्ली आशयाच्या वगैरे मागे धावण्यात वेळ खर्च न करता तराजू घेऊन वजनांचीच तुलना करतो. केवळ राजकारणातच नव्हे, सगळ्याच क्षेत्रांत वजन वाढवण्यावर भर असतो. चित्रपटात कन्टेन्ट किती, याऐवजी बजेट किती, हेच महत्त्वाचं ठरतं. मग चित्रपटाची कमाई किती, याच्या बातम्या वाचायच्या. या पार्श्‍वभूमीवर पोल्ट्रीतल्या कोंबड्या आणि त्यांच्या मालकांचं काही चुकतंय, असं नाही. कोंबडी ही तर निव्वळ वजनावरच विकायची वस्तू आहे. त्यामुळं मालकांनी कोंबड्यांचं वजन वाढवायचं ठरवलं तर काही चुकीचं नाही. पण त्यासाठी मालकांनी कोंबड्यांचा खुराक वाढवला नाहीये, तर वेगळेच मार्ग वापरायला सुरुवात केलीय, हे कळल्यावर शौकिनांच्या पायाखालची जमीन सरकली. कोंबड्यांना म्हणे वजनवाढीची इंजेक्‍शनं दिली जातायत. अशा कृत्रिमरीत्या वजन वाढवलेल्या कोंबड्या खाणं धोकादायक आहे, हे कळल्यावर शौकिनांना चक्क पावसाळा सुरू झाल्याची आठवण झालीय. पावसाळ्यात खाऊच नये, वगैरे चर्चा सुरू झाल्यात. पण खरं सांगायचं तर त्यांना कोंबडीची भीती वाटू लागलीय. विशेषतः मुंबईकर जाम टरकलेत. कोंबडी आणायला गेल्यावर शौकिन चांगली वजनदार कोंबडी बघून घेतात.

ती चवीला कशी लागेल, याचा विचारसुद्धा न करता एका कोंबडीत किती जणांचं पोट भरेल, याचाच हिशेब आधी केला जातो. कोंबडी शिजली की घरातले सगळे टीव्हीसमोर बसून तिचा समाचार घेतात. टीव्हीवर वजनदार नेत्यांची भाषणं आणि पत्रकार परिषदा पाहता-पाहता वजनदार कोंबडीचा फडशा पाडतात. पण आता मात्र वजनदार कोंबडी बघितली की लोकांना कापरं भरतंय. तात्पर्य, कृत्रिमरीत्या इंजेक्‍शन घेऊन वाढवलेलं वजन बऱ्याचदा धोकादायक ठरतं. त्यामुळं सर्वच बाबतीत वजनापेक्षा गुणवत्तेवर अधिक भर देणं दीर्घकालीन फायद्याचं ठरतं. लोकांमधल्या घबराटीची बातमी कोंबड्यांना समजायला हवी. मोठा आनंदोत्सव साजरा करतील. आपलं मूल्य वजनावर ठरवलेलं त्यांनाही मान्य असणार नाही. अर्थात, प्रत्येक प्राण्याची गुणवत्ता वेगवेगळी असते. त्यामुळं कोंबडी पोपटासारखं बोलू लागेल, अशी अपेक्षा कुणीच करणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातला एखादा अपवादात्मक कोंबडा अण्णा-अण्णा म्हणून ओरडतो, हा भाग वेगळा. परंतु प्रत्येकानं आपापली गुणवत्ता वाढवावी आणि गुणग्राहक बनावं, वजनावरून मूल्यमापन करू नये, असाच या प्रकरणाचा सूचक संदेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)