वजन ठेवा नियंत्रणात… (भाग-१ )

‘स्थूलता’ म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात चरबी साठणे होय. या दीर्घकाळ, बहुधा कायमस्वरूपीच शरीरात राहणाऱ्या आजाराने जगभरातील दोन अब्जाहून अधिक लोक ग्रासलेले आहेत. अमेरिकेसह अन्य प्रगतशील राष्ट्रात तर स्थूलता ही एक महत्त्वाची आरोग्यविषयक समस्या बनली आहे.

फास्टफूड’ जीवनशैलीने आपल्याला अनेक आजारांचीही चांगलीच चव चाखवलेली दिसते. खरं तर ह्या जीवनशैलीतून येणारे आजार हे एकटे-दुकटे येत नसून ते शृंखलित स्वरूपातील असल्याने संपूर्ण शरीरावरच ते परिणाम करतात. असाच विविध आजारांना निमंत्रण देणारा आणि पूर्वी केवळ अनुवंशिकच समजला जाणारा स्थूलता’ हा आजार आता आपल्या जीवनशैलीनेही आपलासा केलेला दिसतो.

अर्थातच पाश्‍चिमात्य खाद्यसंस्कृतीचं आणि एकूणच जीवनशैलीचं आपण भारतीय दुबाहूंनी स्वागत करत असल्याने अनुषंगाने भारतातही स्थूलता’ फैलावत आहे. रोजच्या कामांतील यांत्रिकतेमुळे क्रियाशीलतेचं प्रमाणंही कमी कमी होत चाललं आहे, ही त्याला जोड.जेव्हा आपण आवश्‍यकतेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ ग्रहण करतो, तेव्हा त्याचे अतिरिक्त मेदात (चरबीत) रूपांतर होऊन ती शरीरात साचत जाते.

ह्या साचत गेलेल्या चरबीमुळे शरीराचं आकारमान वाढतं. चरबीचं प्रमाण वाढत असल्याने चरबीतील पेशींची संख्याही वाढते. अशावेळी आपण वजन घटवलं तरी त्या पेशी आकुंचन पावतात. मात्र त्यांची संख्या तितकीच राहते. आनुवंशिकता आणि जीवनशैलीबरोबरच वय, लिंग, मानसिक रचना, वातावरणातील बदल आणि झोप हेही स्थूलतेसाठी कारणीभूत ठरतात.

आनुवंशिकता : स्थूलतेला कारणीभूत ओबी नावाचे जनुक मनुष्याच्या शरीरात असल्याचं आढळून आलेलं आहे. प्रोओपिओमेलॅनोकॉर्टिन (पीओएमसी) मधील अनुवंशिक विकृतींमुळे स्थूलता निर्माण होते.

वय : वाढत्या वयानुसार स्नायू कमी होत जाऊन चरबी साठण्याचं प्रमाण वाढत जातं. चयापचयाची क्रियाही मंद होते. त्यामुळेच वयानुसार खाद्यपदार्थातील स्निग्धतेचं प्रमाण कमी करणं गरजेचं असतं.

लिंग : पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत जास्त स्नायू असतात. शिवाय त्यांना जास्त ऊर्जा निर्माण करावी लागत असल्याने स्निग्धपदार्थाचं अधिकचं सेवनही त्यांच्यासाठी आवश्‍यक असतं. तसंच पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त शारीरिक कामे करत असल्याने, कमी आराम करत असल्याने स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण अधिक असतं. त्याशिवाय गर्भावस्थेमुळेही स्त्रियांमध्ये स्थूलता येऊ शकते.

मानसिक रचना वा भावना : अनेकदा नैराश्‍य, चिंता, अति राग, मानसिक दबाव अशा अनेक कारणांमुळे अधिक खाण्याची मानसिकता दिसून येते. त्यात भूक हा भागच नसतो. याचा अर्थ असा नाही की वजनाचे आधिक्‍य किंवा स्थूलता असणाऱ्या लोकांना भावनांच्या समस्या इतर लोकांपेक्षा अधिक असतात. खरं तर अशा व्यक्ती भावनेच्या भरात जास्त अन्नग्रहण करतात. कारण त्यांच्या शरीराच्या आकारमानात विचित्रपणा आलेला असतो. अशा भावनिक समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांना केलेली मानसिक मदत त्यांना उपयुक्त ठरू शकते.

वातावरणातील घटक : थोडक्‍यात जीवनशैलीचाच अधिक प्रभाव असणारी ही गोष्ट. आपल्या खाण्याच्या सवयी आणि आपली क्रियाशीलता आपल्या आसपास राहणा-या लोकांकडून आपण शिकत असतो. अति खाणं आणि दीर्घकाळ एका जागी बसून काम करण्याची अलीकडची कार्यसंस्कृती घातक ठरत आहे.

झोप : झोप आणि स्थूलता यांचा आपसात संबंध असल्याचं अलीकडेच अमेरिकेतील स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन विभागातील टीमने संशोधनांती म्हटलं आहे. जे तरूण कमी झोप घेतात आणि अधिक खातात, त्यांना लठ्ठपणाचा त्रास उद्‌भवू शकतो असं म्हटलं आहे. अमेरिकन ऍकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्‍सच्या सल्ल्‌यानुसार तरुणांनी कमीत कमी 9-10 तास झोप घ्यावी.

अन्य कारणे : याव्यतिरिक्त हायपोथायरॉडिजम, कशिंग सिंड्रोम, पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम (स्त्रियांच्या गर्भाशयासंबंधित समस्या), प्राडर विली सिंड्रोम, लॉरेन्स मून बाडेर्ट बिडल सिंड्रोम तसंच इन्सुलिनोमा, ग्लॅड्‌स यांसारखे आजार, शिवाय स्टेरॉइड, अँटिडिप्रेसंट, गर्भनिरोधक गोळ्या अशा औषधांमुळेही स्थूलता उद्‌भवते.

स्थूलतेची वरील अनेक कारणं असली तरी स्थूलतेमुळे उद्‌भवणाऱ्या समस्याही तितक्‍याच गंभीर स्वरूपाच्या आहेत. स्थूलतेमुळे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, घोरणं, गॉल स्टोन, ऑस्टिओआर्थरायटिस, कॅन्सर(पुरुषांमध्ये- कोलोन, रेक्‍टम, प्रोस्टेट कॅन्सर तर स्त्रियांमध्ये- गल ब्लॅडर, बिल्ड डक्‍ट, ब्रेस्ट, सेर्विक्‍स कॅन्सर), स्लीप एप्निया(झोपेत सहज श्‍वसनक्रिया बंद होणे), सेल्युलायटिस (त्वचेखालील पेशीजालात पसरणारा दाह) अशा अनेक आजारांची शक्‍यता नाकारता येत नाही.’ सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शृंखलित स्वरूपातील आजार’ या शब्दप्रयोगाचा अभिप्रेत अर्थ हाच!

स्थूल व्यक्तींच्या एकूणच मानसिकतेबद्दल ते बोलतात, आत्मविश्‍वास कमी होणं, समाजापासून दूर राहावंसं वाटणं या वजनवाढीमुळे निर्माण होणा-या काही सर्वसाधारण समस्या आहेत. बहुतेक स्थूल व्यक्ती या सतत वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात आणि एकीकडे त्यांची अशीही धारणा होते की, वजन कमी करण्यासाठी केलेला कोणताच उपाय हा कायमस्वरूपी टिकू शकत नाही.’

वजन कमी करून स्थूलपणामुळे होणारे आजार टाळणं शक्‍य असल्याचं शास्त्रीयदृष्टया सिद्ध झालं आहे. त्यासाठी योग्य-संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे सूत्र आहे. मात्र स्थूलतेची सीमा ओलांडलेल्या अतिस्थूल व्यक्तींसाठी हा पर्यायही निकामी ठरतो. अशा व्यक्तींची नितंब, मांडया, पोट, कंबर या भागांत जमा झालेली अतिरिक्त चरबी व्यायाम आणि आहार नियंत्रणानेही कमी होत नसेल तर त्यासाठी विनाशस्त्रक्रिया चरबी कमी करण्याचा पर्याय म्हणजे, लायपोलायसिस एंडर मोलोंज.

डॉ. संजय क्षीरसागर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)