वजन घटवण्याविषयी महत्त्वाचे…

वजन कमी होणे आणि वजन कमी करणे यात फरक आहे. यात जाणीवपूर्वक केली जाणारी क्रिया म्हणजे वजन कमी करणे ही होय. बाकी वजन कमी होणे यात अनेक कारणांचा समावेश असू शकतो. वाढलेले वजन हा मुळातच अनेकांच्या चिंतेचा विषय असतो. त्यातल्या त्यात स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास असतोच. तर या वाढलेल्या वजनाला जाणीवपूर्वक कमी करताना डोक्‍यात हमखास येणाऱ्या काही प्रश्‍नांविषयी…

कॅन्सर, टीबी, टायफॉइड अशा दीर्घकालीन आजारपणात वजन कमी होते. अशा आजारपणात शरीरावर आणि मनावर जास्त ताण असतो. भूक लागत नसल्यामुळे व अन्न कमी खाल्ल्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळत नाहीत. त्याची भरपाई करण्यासाठी शरीर आपल्याच चरबीचा इंधन म्हणून उपयोग करते. त्यामुळे वजन कमी होते. वजन कमी करणे म्हणजे वाढलेले वजन मुद्दाम कमी करणे. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींनी वजन कमी केले जाते.

प्रमाणापेक्षा कमी वजनही घातकच…
वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत.शरीरातले पाणी कमी केले तर वजन कमी होते. शरीरातल्या स्नायुंचा आकार प्रथिने कमी करून कमी केला तर वजन कमी होते.किंवा शरीरातील मेद किंवा चरबी कमी केली तर वजन कमी होते. वजन मुद्दाम कमी करणे हे आरोग्यासाठी चांगले असते. आजारपणात वजन कमी झालेले आरोग्यासाठी चांगले नसते.

सातत्य आणि सामंजस्य…
वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत कोणताही शॉर्टकट नाही. समतोल आहार आणि योग्य व्यायाम या दोनच गोष्टींनी वजन कमी करता येते, पण या दोन गोष्टींमध्ये सातत्य आणि सामंजस्य असले पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करुन चालत नाही. आहार एकदमच कमी करणे चांगले नाही.शरीराला प्रथिने, कर्बोदके, स्निग्धपदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि पाणी या सर्व घटकांची रोज गरज असते. यापैकी कोणतेही घटक कमी केले तर वजन कमी होईल पण ते आरोग्याला घातक आहे. केवळ फलाहार, केवळ पाणी, किंवा आठ दिवस लंघन असे अघोरी प्रकार केले तर शरीरातील चयापचयक्रिया बिघडते आणि आरोग्य बिघडते. तसेच शरीराला रोज व्यायाम आवश्‍यक असला तरी व्यायामाचा अतिरेक केला तर ते आरोग्याला घातक आहे.

उपवास खरंच कोण करतो?
आपल्याकडे लंघन हे पोट बिघडले असेल, अपचन झाले असेल तर करतात. म्हणजे एक किंवा दोन दिवस रोजचा आहार न घेता केवळ फलाहार किंवा पातळ हलका आहार घेतात.किंवा दोन दिवस काहीच घेत नाहीत. अशा लंघनामुळे बिघडलेले पोट बरे होते पण लंघनाने वजन कमी होत नाही. उपोषण किंवा उपवास याला एक धार्मिक महत्व आहे. एकादशी, संकष्टी चतुर्थी किंवा आठवडयातून एखादा वार उपास करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. उपवास याचा अर्थ शेजारी बसणे. देवाच्या सान्निध्यात बसून देवाचे चिंतन करणे हा उपवासाचा खरा अर्थ आहे. परंतु हा अर्थ आता कोणी ध्यानात घेत नाही. एकादशी आणि दुप्पट खाशी असा त्याचा नवीन अर्थ झाला आहे.

साबुदाणा,बटाटे, रताळी, शेंगदाणे, तूप इत्यादी उपवासाला जेवढे पदार्थ खातात ते मेद वाढवणारे आहेत. त्याने वजन कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्‍यता जास्त असते. सलग आठ दिवस किंवा वीस दिवस उपोषण करून वजन कमी होते. पण ते वर सांगितल्याप्रमाणे रोजची गरज भागवली गेली नाही तर शरीर स्वत:च्याच चरबीचा इंधन म्हणून उपयोग करते त्यामुळे वजन कमी होते पण ते आरोग्याला घातक आहे. कारण उपोषणामध्ये प्रथिने कर्बोदके स्निग्धपदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि पाणी या सर्वांचीच कमतरता असल्यामुळे शरीरातल्या बऱ्याचशा रासायनिक क्रियांवर त्याचा वाईट परीणाम होतो. तब्येत चांगली होण्याऐवजी बिघडण्याचीच शक्‍यता जास्त असते.

स्टीमबाथ आणि सोनाबाथ…
स्टीमबाथ आणि सोनाबाथमुळे वजन होते पण तात्पुरतेच. स्टीमबाथमुळे आणि बाष्पस्नानामुळे अंगातले पाणी घामावाटे बाहेर निघून जाते. पाणी कमी झाल्यामुळे वजन कमी झाल्यासारखे वाटते.स्टीमबाथ किंवा सोनाबाथ घेतल्यावर खूप हलके वाटते हेही खरे आहे पण बाहेर आल्यावर तुम्ही एक दोन ग्लास पाणी प्यायलात तर कमी झालेले वजन पुन्हा भरून निघते. वजन कमी करणे हा स्टीमबाथचा किंवा सोनाबाथचा उद्देशच नाही.शरीरातले रक्‍ताभिसरण सुधारणे आणि आखडलेले स्नायु शिथिल करणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी स्टीमबाथ किंवा सोनाबाथ अवश्‍य घ्यावा पण वजन कमी करण्यासाठी नको.

मसाज/मालिश…
मसाज किंवा मालीश करण्याने शरीरातील रक्‍ताभिसरण सुधारते. आखडलेले स्नायु शिथिल होतात पण वजन कधीच कमी होत नाही. मसाज किंवा मालीशमुळे अंगातली चरबी कमी होते हा एक गैरसमज आहे.

आहार…
शरीराला रोजच्या रोज प्रथिने, कर्बोदके, स्निग्धपदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, पाणी तंतुमय पदार्थ या सर्वांची गरज असते. रोजच्या आहारात तेल तूप आणि साखर म्हणजे स्निग्धपदार्थ व कर्बोदके जास्त प्रमाणात असतील तर वजन वाढते. हे लक्षात घेउन आहारात तेल तूप आणि साखरेचे पदार्थ कमी केले तर वजन कमी होते. मांसाहारी लोकांनी मटण जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यातील प्रथिने आणि चरबी यामुळे वजन वाढते. शिवाय आपल्याकडे नॉनव्हेज खूप तेलकट आणि मसालेदार असते. त्याने वजन वाढते. म्हणून त्याऐवजी मासे अणि चिकन खावे. मांसाहार करताना त्यासोबत पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात. दूध आणि दुधाच्या पदार्थात स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात असतात. त्याने वजन वाढते. वजन कमी करायचे असेल तर साय काढलेले दूध प्यावे. साय काढलेले दही आणि लोणी काढलेले ताक प्यावे. लोणी, तूप, चीज, खव्याचे पदार्थ खाऊ नयेत.

काय खाणे टाळावे…
तेल, तूप आणि साखर हे पदार्थ टाळावेत. तेलकट.पदार्थ उदा. बटाटेवडे, सामोसे, टिक्की, शेव, चिवडा असे पदार्थ खाऊ नयेत.जिलबी, रसगुल्ले, मिठाई, बासुंदी, रबडी असे गोड पदार्थ खाऊ नयेत. पण आहारात पूर्णपणे तेल व तूप आणि साखर वर्ज्य करणे हेही चुकीचे आहे. प्रमाण अगदी कमी असावे. अतिरेक नको.

व्यायाम…
तुम्हाला जो योग्य आणि सोयीस्कर वाटेल तो कोणताही व्यायाम केला तरी वजन कमी होते. पण सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालण्याचा व्यायाम आहे. त्याने वजन तर कमी होतेच शिवाय सांधेही मोकळे होतात, रक्‍ताभिसरण सुधारते. पण चालण्याचा व्यायाम म्हणजे रमतगमत चालणे नव्हे. भरभर चालावे. थोडास दम लागायला हवा आणि थोडासा घाम यायला हवा. गणिताच्या हिशोबात सांगायचं तर एका मिनिटात एकशे शहात्तर पावले पडली पाहीजेत, इतके भरभर चालणे सुरुवातीला जमत नाही पण घडयाळ घेऊन पावले मोजावीत. म्हणजे किती भरभर चालायचे याचा अंदाज येतो. असे भरभर पाऊण तास चालायला हवे. तरच शरीरातील चरबी कमी होते. अशा पद्धतीने चालण्याचा व्यायाम केला तर दोन ते तीन महिन्यात निश्‍चितपणे वजन कमी होते. पोहणे, सायकलींग आणि जॉगिंग तसेच दोरीवरच्या उड्या हेसुद्धा परीणामकारक आहेत.

वाईट परिणाम…
सामान्यांपेक्षा वजन जास्त असेल तरंच ते कमी करण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. गरज नसताना कमी केले तर ते आरोग्याला वाईट असते.

डॉ. जयश्री तोडकर 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
14 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)