वजनदार! 

– हिमांशू 

सध्या सगळीकडे बड्यांच्या गाठीभेटींचा हंगाम सुरू आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नाही, तर चक्क गल्लीपासून सिंगापूरपर्यंत! अनेक बडे नेते गेल्या आठवडाभराच्या काळात एकमेकांना भेटले आहेत. यातल्या काही भेटी संबंध सुधारण्यासाठी होत्या, तर काही नवे संबंध प्रस्थापित करण्याच्या अपेक्षेपोटी! वजनदारांच्या भेटीगाठींची सुरुवात झाली ती अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनं. भाजपचे अध्यक्ष थेट “मातोश्री’वर येणार म्हणून शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. शिवसैनिकांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुप्सवर तर भलभलते शब्द फिरत होते म्हणे! अमित शहा आले, दीड तासाऐवजी अडीच तास बसले आणि निघून गेले. संध्याकाळी होणाऱ्या या भेटीचे “वेध’ सकाळपासूनच मीडियाला लागलेले! कॅमेरे, बूम वगैरे तयार होते, थेट प्रक्षेपणं सुरू होती, इकडे चर्चा सुरू असताना चॅनेल्सवर चर्चात्मक कार्यक्रम सुरू होते. चर्चा लांबली याचा अर्थ काय, अशा प्रश्‍नांचा पाहुण्यांनी आपापल्या परीनं अर्थ लावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण भेटीत नेमकं काय बोलणं झालं, हे शेवटपर्यंत कुणाला समजलं नाही. आधी मुख्यमंत्री, उद्धवजी, शहा आणि आदित्य ठाकरे असे चौघे एका खोलीत होते नंतर उद्धवजी आणि शहा एका खोलीत गेले आणि मग बैठकीची वेळ लांबतच गेली. एवढं करून बैठकीत काय झालं? आजही कुणाला माहीत नाही. बैठक संपल्यानंतर मग कुणाची “बॉडी लॅंग्वेज’ कशी, याची चर्चा चॅनेल्सवर सुरू झाली. कुणाची बाजू बैठकीत वरचढ ठरली, याचे अंदाज या “लॅंग्वेज’वरून लावण्यात आले.

वजनदार लोकांचं असंच असतं. कॅमेरे लागतात, पोशाखापासून सगळ्याची चर्चा होते, पाहुण्यांना खायला काय-काय दिलं, हेही लोकांना समजतं; पण दोघं काय बोलले, हे मात्र पटकन कळत नाही. याच दरम्यान आणखी दोन वजनदारांची भेट दुर्लक्षिली गेली. नारायण राणे छगन भुजबळांना भेटायला गेले. तिथंही दोघांत चर्चा काय झाली, कुणालाच कळलं नाही. इकडे “संवाद से समर्थन’ असा नारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दिलेला… उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्याबरोबर त्यांची झालेली भेट तर आठवडाभर आधीपासूनच “वाजत’ होती. शेकड्यांनी पत्रकार जगभरातून गोळा झालेले. पण इथेही तोच प्रकार! नेमका चर्चेचा तपशील इतके पत्रकार असूनही तातडीनं समजू शकला नाहीच! मग वर्णनात्मक बातम्यांवर जगानं समाधान मानलं. सिंगापूरच्या ज्या हॉटेलात ही भेट झाली, तिथल्या वातावरणापासून ट्रम्प यांच्या आवडीचं आइस्क्रीम, त्याचा ब्रॅंड, त्याचा फ्लेवर, नाश्‍त्यापूर्वी कॉकटेल कोणतं, सलाड कोणतं, किम यांच्यासाठी भरलेली कोरियन काकडी कशी ठेवली होती इथपासून पेस्ट्री, चॉकलेट केकपर्यंत सगळं समजलं!

या ऐतिहासिक भेटीच्या वेळी देण्यात आलेल्या जेवणाचा मेन्यूसुद्धा जगाला कळला. मग दोघं आमने-सामने आले. किम जोंग उन खूपच लठ्ठ आणि ट्रम्पसुद्धा आपण लठ्ठ होऊ या भीतीनं ग्रस्त! शेकडो कॅमेरे दोघांच्या हॅंडशेकचा फोटो काढू लागले, तेव्हा ट्रम्प म्हणाले, “”बाबांनो, फोटो चांगले काढा रे. आम्ही स्लिम आणि हॅंडसम दिसलो पाहिजे.” आपली लठ्ठ होण्याची भीती व्यक्त करतानाच ट्रम्पसाहेबांनी किम यांनाही कोपरखळी कशी मारली, एवढा मसाला बातमीसाठी पुरेसा होता. चर्चेत काय ठरलं, हे यथावकाश आपल्याला समजेलच की!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)