वजनकाटा… 

काही वैज्ञानिक अविष्कारांवर माझा लहानपणापासून राग आहे. वैज्ञानिक अविष्कार हे माणसाचे कष्ट कमी करून जीवन सुसह्य करायचं काम करतात पण काही अविष्कार हे मानव जातीसाठी पाप ठरले आहेत हे माझे ठाम मत आहे. वजनकाटा ही वस्तू अशा वस्तूपैकी एक. आमच्या शाळेत वर्षातून दोनदा शारिरीक शिक्षण आणि वैद्यकीय तपासण्यांच्या नावाखाली सर्वांची वजन, उंची मोजली (मापं काढली) जायची. हा कार्यक्रम चौथीपर्यंत वर्गातील हुशार सुबक ठेंगण्या आणि त्यांच्या सोबतीला तोंडी गणितं सोडवणारा सुबक ठेंगणा राबवायचा. वर्गातल्या सर्व मुलांचे वजनं मोजून त्याची लिस्ट बनवायचं काम या टिमकडे बाईंनी सोपावलेलं. ही पोरं खूपच खुंखार असायची. वजन मोजून चुपचाप लिहायपेक्षा मोठमोठ्याने ओरडून वर्गात पसरवण्याचं दानवी कृत्य ही जोडगोळी करत असे. माझा रोल नं. पहिल्या दहात असल्याने आपल्या “वाढीव’ वजनाचा बोभाटा होणार हे माहिती असायचं. जसाजसा नंबर जवळ यायचा तेव्हा पोटात कळ उठायची, धाकधूक वाढायची. बुटं आणि सॉक्‍स पहिलेच काढून पावशेर-अर्धा किलो वजन कमी केलेलं असायचं. आज मधल्या सुट्टीनंतर वजन मोजमापाचा सोहळा पार पडणारं ही खबर लागल्याने डबा खायचा नाही, पाणी प्यायंचं नाही.

सर्व खटाटोप वजन कमी दिसावं म्हणून. मग आपला नंबर आला की डोळे बंद करून देवाचं नाव घेऊन “मनोजवं मारूततुल्य वेगं..’ म्हणतच वजनकाट्यावर दोन्ही पाय ठेवले जायचे. आमच्या शाळेतला वजनकाटा पण कुख्यात होता. माणसाने पाय ठेवल्यावर मिनीमम टू मॅक्‍सिमम चक्कर मारून वायपरसारखा फिरत फिरत एका जागी स्थिर व्हायचा. शेवटी व्हायचं तेच व्हायचं आणि वजनात “आमचा’ वर्गात पहिला नंबर यायचा. मग आठवडा भर आमची अन आमच्या वजनाची चर्चा वर्गात “ट्रेंडींग’ मधे असायची.

-Ads-

या दिवसातंच मला विचित्र स्वप्न पडायला सुरूवात झाली. क्रिकेट खेळत असताना “ऐ इंजमाम’ म्हणून मला एक टोळकी हाक मारत आहे हे मला तेव्हा पडलेलं सर्वात खुंखार, विचित्र आणि भीतिदायक स्वप्न. हे स्वप्न आजतागयत सत्यात उतरलं नाही ही गोष्ट वेगळी. जसेजसे दिवस पुढे सरकले तसं आमचं एकंदरीत वाढलेलं “वजन’ पाहून वजन मोजमापणाचं उदात्त कार्य आमच्यावर येऊन पोहोचलं. आता काम जरा सोपं वाटत होतं. रोल नंबरनुसार वजन घेताना आपला नंबर स्किप मारून सर्वात शेवटी सोयिस्कर वजन टाकायचो. पण आमच्याहून वीसएक पावसाळे जास्त पाहिलेल्या मास्तरला माझी ट्रीक लगेच कळाली आणि माझी उचलबांगडी झाली. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. पुन्हा मोजमापाला नवीन टोळकी आणि सर्वात सुदृढ बालक मीच.

या दिवसात महाराष्ट्र शासनाने “मीड डे मील’ चा प्रोग्राम हाती घेतला आणि दिवस पालटतील असे वाटायला लागले. आपल्या डब्यातली खिचडीही मी दुसर्यांना द्यायला मागेपुढे पाहत नसे. कोणाच्या बर्थडेला मिळालेले चॉकलेटसुद्धा लहान्या बहिणीच्या नावाखाली स्वतः खात नसे. त्या सहामहीत जेव्हा वजन मापन चालू झालं तेव्हा माझे सर्व कष्ट पाण्यात मिसळले. कुणाच्याच वजनात वाढ झाली नाही किंबहूना आपणच ढाई किलोनी वाढल्याचा साक्षात्कार झाला. मग हे उद्योग बंद करण्यात आले आणि नवीन आयडीया शोधण्यास सुरूवात झाली. माझ्या सुदैवाने माझा मित्र सीआर झाला आणि तपासणीच्या तारखा कळायला लागल्या आणि त्या दिवशी सुट्ट्या मारणे चालू झाले. पुढे शाळा संपली पण वजनानी काही पिच्छा सोडला नाही.

(परवाच आजारी मित्राला दवाखान्यात घेऊन गेलो. तेथे वजनकाटा पहिला अन जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहिले) 

– शिवम पिंपळे 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)