वक्‍फ जमिनीचे हस्तांतरण

इस्माइलने वक्‍फच्या मालकीची जमीन खरेदी केली. या व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना 6 मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावली. मुदतीनंतर मंडलधिकाऱ्यांनी ही नोंद रद्द केली. तलाठी भाऊसाहेबांनी माहितीसाठी याचे कारण विचारल्यावर मंडलधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्यां वक्‍फ अधिनियम 1995 चा अंमल महाराष्ट्र राज्यात 1 जानेवारी 1996 पासून सुरू करण्यात आला आहे.

वक्‍फ अधिनियम, 1995 च्या कलम 3(आर) अन्वये वक्‍फ या शब्दाची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्वसामान्यपणे इस्लाम धर्माच्या धार्मिक कामाकरिता वापरण्यात येणाऱ्या सर्व मिळकती (मशीद, ईदगाह, दर्गा, मकबरा, कब्रस्तान, धार्मिक उपासना संस्था, अनाथालय) मशरूतुल-खिदमत इनाम या बाबी वक्‍फ कायद्याखाली येतात. धार्मिक किंवा धर्मदाय संस्थेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असलेली कोणत्याही व्यक्तीचा समावेश वक्‍फमध्ये स्वारस्य असणारी व्यक्ती म्हणून होतो. सर्वसामान्यपणे अशा वक्‍फ मालमत्तेच्या देखरेखीसाठी मुतवल्ली किंवा व्यवस्थापन समितीची नियुक्‍ती करण्यास वक्‍फ अधिनियमातील तरतुदींनुसार वक्‍फ मंडळाकडून मान्यता दिली जाते. वक्‍फ अधिनियमातील कलम 108-अ च्या तरतुदींन्वये सदर कायद्याला अधिभावी प्रभाव (र्जींशीीळवळपस शषषशलीं) प्रदान करण्यात आला असून त्यानुसार या कायद्यातील तरतुदी व अन्य कोणत्याही कायद्यातील तरतुदी परस्पर विसंगत ठरत असल्यास, अशा वेळेस वक्‍फ कायद्याच्या तरतुदी प्रभावी ठरतात. केंद्र शासनाच्या वक्‍फ अधिनियम 1995, कलम 51 अन्वये वक्‍फ मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही वक्‍फ मालमत्तेचा भाडेपट्टा निष्प्रभ असेल. तसेच, कलम 51(1-ए) अन्वये वक्‍फ मालमत्तेची कोणतीही विक्री, अशी मालमत्ता बक्षीस म्हणून देणे, त्यांची अदलाबदल करणे, ती गहाण ठेवणे किंवा तिचे हस्तांतरण करणे असे व्यवहार अवैध आणि निष्प्रभ ठरतात. वक्‍फ अधिनियम 1995, कलम 52 आणि 52-ए अन्वये वक्‍फ मालमत्तेचे असे व्यवहार झाल्यास ती मालमत्ता पूर्ववत वक्‍फ मंडळाच्या ताब्यात देण्याची तरतूद आहे. शासनाच्या आदेशानुसार, राज्यातील वक्‍फ मालमत्तेच्या गाव नमुना सात मध्ये भोगवटादार सदरी फक्‍त संबंधित वक्‍फ संस्थेचे नाव नोंदविण्यात यावे. त्याशिवाय अन्य कोणाच्याही नावाच्या नोंदी करण्यात येऊ नयेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील वक्‍फ मालमत्तेच्या सात-बारा उताऱ्याच्या इतर हक्क सदरी वक्‍फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील वक्‍फ मालमत्तांच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीत मुतवल्लीचे वा इतर कोणत्याही खासगी इसमांचे नाव अधिकार अभिलेखात नोंदविण्यात येऊ नये.

जर अशी नावे आधीपासून अधिकार अभिलेखात दाखल असतील तर अशी नावे संबंधितांना सुनावणीची संधी देऊन कमी करून वरीलप्रमाणे भोगवटादार सदरी फक्‍त संबंधित वक्‍फ संस्थेचे नाव आणि इतर हक्क सदरी वक्‍फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेण्यात यावी. अशीच कार्यवाही नागरी क्षेत्रातील (मिळकत पत्रिकेवर) वक्‍फ मालमत्तेबाबत करण्यात यावी. त्यामुळे इस्माइलने वक्‍फच्या मालकीच्या जमिनीची केलेली खरेदी अवैध आहे. (संदर्भ : वक्‍फ्‌ अधिनियम 1995 कलम 3 (आर), 108-अ, 51, 51(1-अ) ; शासन परिपत्रक क्रमांक वक्‍फ 2015/प्र.क्र.78/ज-1अ, दिनांक 13 एप्रिल 2016.)

आणेवारी म्हणजे वाटप नाही

गावात एका शेतजमिनीत, राजेश, विनोद आणि सुरेश या तीन भावांच्या नावे सात-बारा सदरी प्रत्येकी 5 आणे 4 पै आणेवारीने दाखल होती. त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 85 अन्वये तहसीलदारांसमोर वाटप करुन घेतले. वाटपाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना 6 मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावली. राजेश, विनोद आणि सुरेश सहीसाठी चावडीत आले तेव्हा मंडलअधिकारीही तेथे आलेले होते. सुरेशने तक्रारीच्या स्वरात मंडल अधिकाऱ्यांना विचारणा केली की, आमच्या शेतजमिनीच्या सात-बारा सदरी आधीच प्रत्येकी 5 आणे 4 पै आणेवारीने दाखल आहेत. मग पुन्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 85 अन्वये वाटप करून घ्यायचे कारण काय? मंडल अधिकाऱ्यांनी खुलासा केला की, सात-बारा सदरी आणेवारीने दाखल असणे म्हणजे आपोआप वाटप झाले, असे म्हणता येत नाही. अशा आणेवारीला, फारतर ‘कौटुंबिक व्यवस्था’ म्हणता येईल (ए.आय.आर.1992, मुंबई 72). वाटप म्हणजे मिळकतीचे सरस-निरस मानाने तुकडे पाडून माप आणि सीमांकनाने तुकडे करणे. पूर्वी आणेवारीने तुम्हीच आपसात ‘कौटुंबिक व्यवस्था’ ठरविली होती, आता कलम 85 अन्वये वाटप करून सरस-निरस मानाने, माप आणि सीमांकनाने जमिनीच्या हद्दी ठरवून घेतलेल्या आहेत. सुरेशची तक्रार दूर झाली आणि सर्वांनाच आणेवारी आणि वाटपातील फरक लक्षात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)