वकिलाची फसवणूक पडली महागात

पिंपरी – उर्से टोल नाक्‍याजवळ नाष्टा करण्यासाठी थांबलेल्या सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात प्रॅक्‍टिस करणाऱ्या एका वकिलाला तिघांनी मिळून सोन्याचे बनावट दागिने देऊन दहा लाख रुपयांना गंडा घातला. तसेच वकिलाने दिलेले दहा लाख रुपये एका वर्षात दुप्पट करण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तीन आरोपी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडले असून 72 तासात गुन्ह्याची उकल केली आहे.

भीमाभाई गुलशनभाई सोळंकी (वय-43, रा. तळवडे रोड, पुणे. मूळ रा. बडोदा, गुजरात), राजा बलीराम भोईर (वय-32, रा. तळवडे रोड, पुणे. मूळ रा. शिवमंदिर अंबरनाथ रोड, अंबरनाथ, जि. ठाणे), सोनू उर्फ छोटू राधामोहन जोशी (वय-20, रा. तळवडे रोड, पुणे. मूळ रा. रामनगर, बडोदरा, गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अब्दुल मजीद दार यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली की, परंदवाडी रोडवर पवना हॉस्पिटल जवळ साई लीला हॉटेलच्या पार्किंगमध्ये एक चॉकलेटी रंगाची डस्टर कार (जीजे 06, एफक्‍यू 4141) उभी आहे. त्यामध्ये तीनजण संशयितरित्या बसले असून त्यांच्याकडे बनावट सोने आहे. बनावट सोने दाखवून ते फसवणूक करीत आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिकीमध्ये साडेसात किलो वजनाचे खोटे सोन्याचे दागिने, 6 लाख 28 हजार 780 रुपये रोख रक्कम मिळाली. पोलिसांनी एकूण 14 लाख 86 हजार 755 रुपयांचा ऐवज जप्त केला.

आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोन येथे आणून कसून चौकशी केली असता आरोपींनी सांगितले की, पुणे-मुंबई रोडवर उर्से टोलनाक्‍याजवळ पुणे लेनवर कार्निवल फूड मॉल येथे नाष्टा करण्यासाठी थांबलेल्या सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात प्रॅक्‍टिस करणारे वकील अब्दुल मजीद दार यांना खोटे सोने दाखवले. आरोपींचे नागपूर येथे सोन्याचे दुकान आहे. त्यांना पैशांची गरज असून सोन्याच्या बदल्यात दहा लाख रुपये द्यायला सांगितले. त्याबदल्यात अब्दुल यांना एका वर्षात दुप्पट रक्कम मिळणार असल्याचेही सांगितले आणि फसवणूक केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करून 72 तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी मोहम्मद गौस नदाफ, फारूक मुल्ला, नारायण जाधव, मयूर वाडकर, जमीर तांबोळी, नितीन बहिरट, दत्तात्रय बनसुडे, किरण आरुटे, राहुल खारगे, तुषार शेटे, धनराज किरनाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)