वकिलांमध्ये “302′ क्रमांकाची क्रेझ

वाहन, मोबाइल क्रमांकाला पसंती

– विजयकुमार कुलकर्णी

पुणे – आपल्या वाहनांना “लकी नंबर’ मिळावा म्हणून 3 हजार रुपयांपासून अगदी लाखोंच्या घरात फी भरल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्वत:ला भाई, दादा, भाऊ, युवा नेता म्हणून मिरवून घेणाऱ्यांचे प्रमाण यात लक्षणीय आहे. हीच “क्रेझ’ आता वकिलांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषत: शेवटी “302′ असलेला मोबाइल क्रमांक, इतकेच नव्हे तर वाहनालादेखील तशाच क्रमांकाची गाडी घेण्यास वकील मंडळी पसंती देत आहेत.

राजकीय नेत्यांमध्ये अनेक वर्षांपासून “लकी नंबर’ची “क्रेझ’ आहे. निवडून आलेल्या मतांचा आकडा, जन्म तारखेचा अथवा अन्य कारणामुळे असे आकडे निवडण्याकडे कल दिसून येतो. पण, आता दिवाणी, फौजदारी स्वरूपाच्या केसेसमध्ये वकील प्रॅक्‍टिस करतात. त्यांच्यातही अशीच “क्रेझ’ दिसून येत आहे. फौजदारी प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) हे प्रसिद्ध आहे. वकिलांसोबत पक्षकार, सर्वसामान्य नागरिकांनाही याबाबत माहिती आहे. त्यामुळे हा वाहन क्रमांक, शेवटी तीन अक्षरे असलेला मोबाइल क्रमांक घेण्यास वकील पसंती देत आहेत.

भारतीय दंड संहितेतील 302 हे गंभीर स्वरूपाचे कलम आहे. फौजदारी क्षेत्रात प्रॅक्‍टिस करणाऱ्या वकिलांना याच्या केसेस चालवाव्या लागतात. या कलमाबाबत वकील, पक्षकार, सर्वसामान्यांना माहिती आहे. हा क्रमांक लक्षात ठेवण्यास सोपा आहे. ही गाडी वकिलांची आहे, हे सर्वांना सहजपणे समजते. त्यामुळे हा क्रमांक घेतला असून मोबाइलची शेवटची तीन आकडेही हेच आहेत.
– अॅड. विजयसिंह ठोंबरे, वकील.


खुनाच्या खटल्याचे काम पाहणारे वकील, अशी ओळख निर्माण झाल्यानंतर मी तीन चारचाकी आणि एक बुलेट गाडी या क्रमांकाची घेतली. तेव्हापासून असाच नंबर आहे.
– अॅड. विपीन बिडकर, वकील.


मी सांगलीमध्ये वकिलीचा अभ्यासक्रम शिकत होतो. त्यावेळी भविष्यात फौजदारीमध्ये प्रॅक्‍टिस करायची, म्हणून शेवटी “302′ असलेला क्रमांक घेतला. आता पुण्यामध्ये प्रॅक्‍टिस करतानाही तोच मोबाइल क्रमांक वापरत आहे.
– अॅड. भालचंद्र पवार, वकील.

चॉईस नंबरसाठी मोजतात लाखोंची रक्कम
कोणत्याही व्यक्तीला चॉईस नंबर हवा असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शुल्क आकारते. चारचाकी गाडीला चॉईस नंबर घेण्यासाठी 3 हजार रुपयांपासून सुरूवात होते. अनेकदा एकाच नंबरवर दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी दावा केल्यास ही रक्कम लाखो रुपयांपर्यंत जाते. शेवटी, लिलावाच्या माध्यमातून जास्त पैसे देणाऱ्यांना हा नंबर वितरीत केला जातो. तर, दुचाकीसाठीही अशीच प्रक्रिया असून, नंबर घेण्यासाठी चढाओढ असते. दरम्यान, अशा प्रकारामुळे आरटीओला मोठा महसूल मिळत असून एखदा चॉईस नंबरची किंमत तब्बल 12 लाख रुपयांपर्यंत गेल्याची नोंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)