वंचित बहुजन आघाडीच्या अधिवेशनाकडे राजकीय पक्षांचे लक्ष

पिंपरी- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभरात लाखोंच्या सभा होत आहेत. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे खासदार बॅ. असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या सोमवारी (दि.28) या आघाडीची सत्ता संपादन सभा व महाधिवेशन पिंपरीतील एच.ए. मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या महाअधिवेशनाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

या अधिवेशनाला पुणे जिल्हा व परिसरातील सुमारे तीन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. याकरिता ओबीसी संघर्ष समिती, होलार समाज, मुस्लिम व अन्य समाजाचे प्रतिनिधी यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने या अधिवेशनाला जाहिर पाठिंबा देण्यात आला असून, सुरेश गायकवाड, आनंदा कुदळे, विश्‍वास शिरसाट यांनी ओबीसी समजाचा केवळ मतांसाठी होणारा वापर थांबवून, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यात सक्रीय सहभाग नोंदविला असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. होलार समाजाचे नाथन केंगार यांनी या अधिवेशनात समाज आपली ताकत दाखवून देऊ, अशी माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विधानसभा निवडणुकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपच्या जाहिर सभेनंतर आतापर्यंत एकाही नेत्याची एच.ए. मैदानावर जाहिर सभा झालेली नाही. वंचित बहुजन आघाडीने ऍड. प्रकाश आंबेडकर यांची सभा याठिकाणी आयोजित करून गर्दीचा उच्चांक मोडण्याचे शिवधनुष्य पेलले आहे.

या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, अकील मुजावर, के.डी. वाघमारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राजकीय पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होणार
राज्यभरात वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून शहरातील काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा भारिप बहुजन महासंघात प्रवेश होणार आहे. त्याकरिता काही राजकीय नेते आमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होईल, अश माहिती त्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)