पुणे : लोहमार्ग पोलीसांना मिळणार अतिरिक्त कुमक

पुणे – राज्यात सर्वात मोठी हद्द असलेल्या पुण्याच्या लोहमार्ग पोलीसांना लवकरच सुगीचे दिवस येणार आहेत. या लोहमार्ग पोलीसांची वाढती हद्द आणि त्यांच्यावरील कामाचा वाढता ताण याची गंभीर दखल घेऊन पुणे लोहमार्ग पोलीसांना अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची तयारी लोहमार्ग पोलीसांच्या मुख्यालयाने दर्शवली आहे; त्याबाबतचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांतच या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लोहमार्ग पोलीसांच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

पुणे लोहमार्ग पोलीसांची हद्द राज्यात सर्वात मोठी समजली जाते; ही हद्द तब्बल तेराशे किलोमीटरची आहे. या हद्दीत पुण्यासह सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नगर, सातारा आणि कोल्हापूर या महत्वाच्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. या हद्दीच्या अंतर्गत सहा पोलीस ठाणी, 13 आऊटपोस्ट, तीन दूरक्षेत्र, चार मदत केंद्रे, 168 रेल्वे स्थानके आणि 235 रेल्वे प्लॅटफॉर्मांचा समावेश आहे. त्यामुळे या मोठ्या हद्दीत बंदोबस्त देताना आणि प्रवाशांना सुरक्षा पुरवित असताना लोहमार्ग पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, एवढी मोठी हद्द असतानाही लोहमार्ग पोलीसांकडे केवळ सातशे ते आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आहे. हे वास्तव असतानाच पुणे रेल्वे स्थानकातून आणि मुंबईवरुन येणाऱ्या महत्वाच्या तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यातच पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही वर्षांच्या कालावधीत प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन अथवा त्यांना खायला देऊन लुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. तसेच सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन दरोडेखोरांनी रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत; या घटना विशेषत: कुर्डुवाडी आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत घडल्या आहेत. वारंवार होत असलेल्या या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते; त्यामुळे काही प्रवाशांनी रात्रीचा प्रवास न करणेच पसंत केले होते. याबाबत दैनिक ” प्रभात’ ने 3 जूनच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रसिध्द करुन लोहमार्ग पोलीसांच्या या अडथळयाच्या शर्यतीवर प्रकाश टाकला होता.

त्याची गंभीर दखल घेऊन लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी या पदाची सूत्रे घेताच प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून कमी मनुष्यबळातही नेटका बंदोबस्त पुरविण्यावर त्यांनी भर दिला होता, विशेष म्हणजे त्यांची ही संकल्पना चांगलीच कामी आली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत या गुन्ह्यांचा टक्का बहुतांशी प्रमाणात कमी झाला आहे. मात्र; प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा मिळावी आणि त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी लोहमार्ग पोलीसांच्या वतीने मुख्यालयाकडे तशी मागणी करण्यात आली होती. याबाबत लोहमार्ग पोलीसांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाला मुख्यालयाने मंजूरी देण्यात आली आहे; येत्या काही दिवसांतच त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येइल अशी माहिती लोहमार्ग पोलीस दलातील सूत्रांनी ” प्रभात’ शी बोलताना दिली. याबाबत लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रियेसाठी ते उपलब्ध होउ शकले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)