लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचे काम रखडलेले

प्रभात वृत्तसेवा

पुणे-लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाने विमानतळाशेजारील खासगी मालकाची 15 एकर जागेची मागणी केली आहे. ही जागा ताब्यात घेऊन जागामालकास टीडीआर स्वरुपात मोबदला देण्यासाठीचा प्रस्ताव महानगरपालिकेने नगर विकास विभागाला पाठविला आहे. यावर निर्णय होत नसल्याने लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम रखडलेले आहे.

केंद्रीय पायाभूत समितीच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात कोणतीही ठोस निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान लोहगाव विमानतळासाठी राज्य सरकार तर्फे 25 एकर जमीन हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरु प्रसाद महापात्रा, अजय कुमार , एस विस्वास तसेच संरक्षण खात्याचे अतिरिक्त सचिव बरून मित्रा आणि हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते. विमान नगर ते लोहगाव विमानतळ तसेच पुढे वेकफिल्ड चौक हा रस्ता तयार करण्यासाठी महानगरपालिका, विमानतळ प्राधिकरण तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी यांनी संयुक्त बैठक तातडीने बोलवावी. त्याचप्रमाणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण आणि विमानांची उड्डाणसंख्या वाढ हे दोन मुद्दे लोहगाव विमानतळाच्या विकासासाठी महत्वाचे असल्याने त्यावर संरक्षण खात्याने कार्यवाही करावी, अशा सूचना गडकरी यांनी यावेळी दिल्या. तर लोहगाव विमानतळ येथील कार्गो सुविधा वाढविण्यासाठी आवश्‍यक असलेली हवाई दलाच्या वापरात नसलेली जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची सूचना गडकरी यांनी यावेळी केली, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.

-Ads-

लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी विमानतळाच्या बाजूस असलेली पंधरा एकर जागेची आवश्‍यकता आहे. ही जागा एका खासगी मालकीची आहे. त्या जागेचे भूसंपादन करताना त्याचा मोबदला जागा मालकास द्यावा लागणार आहे. ती जागा विमानतळाच्या शंभर मीटरच्या परिसरात येत आहे. त्यामुळे मोबदला देण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी विशेष तरतूद करून घ्यावी लागणार आहे. महापालिकेच्या हद्दीच्या विकास आराखड्याचा ईपी (विस्तारित आराखडा) राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यामध्ये ही जागा भूसंपादन करण्याच्या मोबदल्यात जागा मालकास टीडीआर देण्यास मान्यता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव महापालिकेकडून देखील पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारकडून त्याम मान्यता मिळाल्यास ही जागा ताब्यात घेता येणार आहे.

याविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सांगितले की, 15 एकर जागेच्या भूसंपादनाच्या मोबदल्यात जागा मालकाला टीडीआर देता यावा, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)