तीन लाखांचा ऐवज लंपास
राहाता – बंद घराचे कुलूप तोडून घरात घूसून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 33 हजार रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. ही घटना तालुक्‍यातील लोणी बुद्रूक येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत लोणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
बाळासाहेब रावसाहेब जाधव हे लोणी बुद्रूक येथील राजहंस वसाहतीशेजारी आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांचा मोठा मुलगा अतुल हा पुणे येथे नोकरीस असल्याने ते त्याला भेटण्यासाठी बुधवारी सकाळी घराला कुलूप लावून गेले होते. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक केली. कपाटाची कुलपे तोडून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व 40 हजार रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 33 हजार रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. घराचा दरवाजा उघडा दिसत असल्याची माहिती त्याच्या शेजारी राहणारे म्हस्के यांनी जाधव यांना दिली. आज सकाळी जाधव लोणी येथे आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ लोणी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नगर येथून आलेल्या श्वानपथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, श्वानपथक घराजवळच घुटमळले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाळासाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादी वरून लोणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)