लोणी काळभोर- मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी पोलीस सतर्क आहेत. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पोलीस ठाण्याचे हद्दीत असलेल्या गावांत पोलिसांनी संचलन (रूटमार्च) केले आणि मतदारांनी तणावमुक्त वातावरणात मतदानाचे पवित्र कर्तव्य बजवावे, असा संदेश दिला. शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे.
निवडणुकीच्या चौथ्या टप्यात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रचारादरम्यान झालेल्या सभांमधून सर्व पक्षांच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकमेकांवर शेलक्या शब्दात टीकाटिपण्णी केल्याने सर्व वातावरण ढवळून निघाले आहे. शनिवारी (दि. 27) सकाळी 11 च्या सुमारास हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी लोणी काळभोर गावातील मुख्य रस्त्यावरून संचलन केले. या संचलनात दोन सहायक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक, 100 पोलीस कर्मचारी आणि 120 होमगार्ड सहभागी झाले होते. यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सर्व गावांतून संचलन करण्यात आले.