लोणीकाळभोर खूनप्रकरणी 36 तासांत दोघे गजाआड

लोणी काळभोर – येथील तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील सिद्राम मळा परिसरात नवा व जुना मुठा कालव्यांच्या मधील मोकळ्या जागेत डोक्‍यात वार करून खून केलेल्या एका तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. हा खून करून फरार झालेल्या दोन जणांना गुन्हा घडल्यानंतर 36 तासांच्या आत गुन्हे शोध पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी सचिन सुुुभाष कदम (वय 34, रा, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) व रोहन ऊर्फ भैय्या अनिल चव्हाण (वय 25, लोणी काळभोर, ता. हवेली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत वाल्मिक काळभोर (वय 26, रा. समतानगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिद्राम मळा परिसरातील नवा व जुना मुठा कालव्यांच्या मधील पाटबंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला होता. हे ठिकाण लोकवस्तीपासून लांब असून निर्मनुष्य आहे. याच ठिकाणी सुमारे तीन वर्षापूर्वी एक खून झाला होता.
याप्रकरणी मयत अभिजीत याचा भाऊ मेघराज वाल्मिक काळभोर याने फिर्याद दिल्यानंतर पुणे विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवान, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समीर चमनशेख, सचिन मोरे, सागर कडू, परशुराम सांगळे यांनी गुन्ह्याचा सखोल अभ्यास केला. गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती गोळा केली. हा खून कदम व चव्हाण यांनी केल्याची खात्री पटल्यानंतर दि. 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातून ताब्यात घेतले.
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. कदम याने पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत अभिजीत काळभोर हा त्याला दारू पिऊन वारंवार त्रास देऊन दहशतीखाली ठेवून त्याने काम करून आणलेली रक्‍कम तो धाक दाखवून काढून घेत होता. तसेच त्यास शिवीगाळ करून वारंवार अपमानास्पद वागणूक देत होता. तसेच कदम रहात असलेल्या परिसरांत त्याच्या भावाची लहान मुुलगी घराच्या समोर खेळत असताना मयत अभिजीत याने तिचे अंगावर गाडी घातल्याचा राग कदम याच्या मनात होता. त्यामुळे काळभोर कदम व चव्हाण हे तिघे पाटबंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत गेल्यानंतर काळभोर डाव्या कुशीवर झोपल्याचा मोका साधून कदम याने तेथे पडलेला मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्‍यावर मागील बाजूस टाकला. दगडाचा घाव वर्मी बसल्याने काळभोर याचा जागीच मृत्यूमुखी झाला. कदम व चव्हाण यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी दोघांना दि. 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)