लोणावळ्यात 9 तासांत 105 मि. मी. पाऊस

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून मंगळवार दि. 29 ला 9 तासांत 105 मि. मी. पाऊस झाला. पावसाने मागील वर्षीची सरासरी ओलांडली आहे. आज अखेर 4740 मि. मी. (186.61 इंच) पाऊस झाला.

मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज मात्र पावसाचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी पाणी वाहून जात असल्याने शहरातील काही रस्त्यावर व सखल भागांत किरकोळ पाणी साचण्याच्या घटना वगळता कोठेही आपत्‌कालिन स्थिती नाही. टाटा कंपनीचे वलवण धरण पूर्ण भरल्याने पाणी सोडण्यात येण्याचे टाटा कंपनीने सूचित केले असल्याने नागरिकांत काहीसे भितीचे वातावरण आहे. डक्‍ट लाईनमधून पाणी खोपोलीत सोडण्यात आल्याने आज तरी धरणातून पाणी सोडण्यात आले नाही.

धरण परिसरातील जवळकर वस्ती, खत्री फार्म, वरसोली, इंद्रायणी नदीलगतच्या वस्ती व गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आपत्‌कालीन स्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी वलवण व तुंगार्ली शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरेल त्या ठिकाणी प्रवाह मोकळा करण्यासाठी जेसेबी मशिन व साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)