लोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद!

  • इमारत शासनाच्या नावावर करण्यासाठी घंटानाद आंदोलन

लोणावळा – लोणावळा शहर पोलीस ठाणे अंकित नारायणीधाम पोलीस मदत केंद्र या इमारतीची नोंद बेकायदेशीररित्या एका महिलेच्या नावे करण्यात आली असून, ही नोंद रद्द करून ही इमारत तसेच इमारतीचा विद्युत पुरवठा हा पोलिसांच्या किंवा शासनाच्या नावे करण्यात यावा या मागणीसाठी येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे प्रकाश पोरवाल यांनी 26 जानेवारी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

साधारण चार वर्षांपूर्वी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी नारायणी धाम संस्थेच्या आर्थिक मदतीने पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग लगत कैलास परबत हॉटेलच्या जवळ नारायणीधाम पोलीस मदत केंद्र ही इमारत बांधून घेतली. मात्र हे करीत असताना या इमारतीची तसेच या इमारतीसाठी लागणाऱ्या थ्री फेज विद्युत पुरवठा जोडणीची नोंद बेकायदेशीर रित्या सुमन विष्णू पाटील या महिलेच्या नावे करून त्याठिकाणी अमोघ फास्ट फूड या नावे हॉटेल व्यवसाय सुरू केल्याचा आरोप प्रकाश पोरवाल यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी त्यांनी या संदर्भात पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे दिलेला तक्रारी अर्ज, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई यांना पाठविलेला अहवाल तसेच राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई यांचा या तक्रारी संदर्भातील आदेशाची प्रत पत्रकारांसमोर ठेवल्या.
पोरवाल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान आपला या पोलीस मदत केंद्राला विरोध नसल्याचे सांगितले. मात्र पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत या मदत केंद्राची इमारत तसेच विद्युत जोडणी ज्या पद्धतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या नात्यातील एका महिलेच्या नावावर नोंद करून घेतली. त्याला आपला विरोध असल्याचे पोरवाल यांनी स्पष्ट केले.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी देखील पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अशोभनीय वर्तन केल्याने त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असा अहवाल सादर केला असल्याचे पोरवाल यांनी कागदपत्रांचा हवाला देत सांगितले. आपण अनेकदा मागणी करून तसेच तक्रारी करूनही या मदत केंद्राची संबंधित महिलेच्या नावे असणारी नोंद रद्द करण्यात आली नसल्याने, 26 जानेवारी रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा झेंड्याखाली घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा पोरवाल यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.

चौकी बांधण्यामागील माझा उद्देश चांगला – आय. एस. पाटील
लोणावळा शहराची वाढती लोकसंख्या आणि पर्यटकांची रेलचेल बघता शहरात ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्रांची नितांत आवश्‍यकता होती. ही आवश्‍यकता लक्षात घेऊन तसेच या ठिकाणी बाहेरून बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तादरम्यान आराम मिळावा या उद्देशाने नारायणी धाम या स्वयंसेवी संस्थेला विनंती केली. त्यानुसार हे मदतकेंद्र उभारण्यात आले. शिवाय सद्यस्थितीत याठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे हॉटेल चालू नाही. या मदतकेंद्र उभारण्यामागचा माझा उद्देश हा चांगला होता. मात्र जर हे बांधकाम अनधिकृत असून, लोकांच्या अहिताचे आहे असे कोणाचे मत असेल तर संबंधित बांधकाम पाडून टाकण्यात यावे अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक आय.एस. पाटील यांनी दिली. शिवाय या संपूर्ण प्रकरणी ज्या महिलेचे नाव घेतले जात आहे, ती आपल्या कोणत्याही नात्यात नसल्याचे सांगत पाटील यांनी आपण या संपूर्ण प्रकरणी पोरवाल यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.

तक्रारी मागे वैयक्‍तिक हेवेदावे असल्याचा संशय – बी. आर. पाटील
नारायणीधाम पोलीस मदत केंद्र या इमारतीच्या नोंदीवरून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमागे संबंधितांचे काही वैयक्तिक हेवेदावे असल्याचा संशय असून, यातून संपूर्ण यंत्रणा वेठीस धरण्यात येत आहे. या इमारतीमध्ये केवळ पोलीस मदत केंद्रच सुरू आहे. कोणत्याही स्वरूपाचे हॉटेल किंवा व्यवसाय येथे सुरू नाही. तसेच यासंदर्भात तक्रारदार यांनी वरिष्ठ पातळीवर तसेच पोलीस प्राधिकरण, मुंबई यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच पोलीस प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी प्रतिक्रिया लोणावळा शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.

कागदपत्रांची पडताळणी करून योग्य ती कारवाई – मुख्याधिकारी सचिन पवार
नारायणीधाम पोलीस मदत केंद्र या इमारतीच्या नोंदीबाबत आपल्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. संबंधित मदत केंद्र हे आरक्षित जागेवर बेकायदेशीर रित्या उभे असून, याठिकाणी भोगावटादार म्हणून सुमन विष्णू पाटील यांचे नाव लागले असल्या यासंदर्भात ही तक्रार आहे. याबाबत आपण सर्व कागदपत्रे मागवली आहेत. सर्व कागदपत्रांची पडताळणी करून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)