लोणावळा, वडगाव आणि तळेगावातील दुय्यम निबंधक कार्यालये ओस

ऍड. सुभाष तुपे मारहाण प्रकरण : कठोर कारवाईची केली मागणी
वडगाव मावळ – दस्तनोंदणीच्या क्रमांकावरून येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शनिवारी (दि. 1) वकील ऍड. सुभाष परशुराम तुपे यांना पाच-सहा जणांनी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. या निषेधार्थ वडगाव ऍडव्होकेट बार असोसिएशनने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. सोमवारी (दि. 3) रोजी मावळ तालुक्‍यातील वडगाव, तळेगाव दाभाडे व लोणावळा येथील दुय्यम निबंधक कार्यालय खुली असली तरी दस्तनोंदणीकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले.

वडगाव मावळ दुय्यम निबंधक कार्यालय एरवी वर्दळीचे व गर्दीचे असते. पण वडगाव बार असोसिएशनच्या बंदला वकील व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वडगावमध्ये एकही दस्त नोंदणी झाली नाही. कार्यालय ओस पडलेले होते. केवळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोणावळा कार्यालयात दिवसभरात एकाच दस्त नोंदणी झाली, तर तळेगाव दाभाडे कार्यालयात 4 दस्त नोंदणी झाली. कार्यालयात वकील नसल्याने नागरिकही केवळ कार्यालयात चौकशी करून जात होते. दैनंदिन लाखोंचा महसूल जमा होणाऱ्या कार्यालयात सोमवारी अत्यल्पच महसूल जमा झाला. मावळ तालुक्‍यातील ही पहिलीच घटना असल्याने पोलीस निरीक्षक दगडू हाके यांना आरोपींवर कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी वकील संघटनेकडून करण्यात आली आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात वकील ऍड. सुभाष परशुराम तुपे यांना मारहाण केल्याची घटना घडली. घटनास्थळी वडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. यशवंत गोरे, उपाध्यक्ष ऍड. प्रताप शेलार, सचिव ऍड. घनश्‍याम दाभाडे, ऍड. चेतन जाधव, ऍड. अविनाश पवार, ऍड. राजेंद्र फुगे, ऍड. अजित वहिले, ऍड. शैलेश पडवळ, शैलेश घारे व वकीलांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये आरोपींवर गुन्हा दाखल केल्यावर आरोपींचे वकीलपत्र मावळ तालुक्‍यातील वकील घेणार नसल्याचा निर्णय घेलता. मात्र पुण्यातील ऍड. विकास शहा यांनी आरोपींचे वकीलपत्र घेतल्याने वडगाव बार असोसिएशनच्या वतीने ऍड. शहा यांचा निषेध नोंदवन त्यांचे पुणे बार असोसिएशनकडे तक्रार करीत ऍड. शहा यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली, असल्याचेही ऍड. गोरे यांनी स्पष्ट केले आहे.

जितेंद्र बडगुजर दुय्यम निबंधक म्हणाले की, वकिलाला मारहाण या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमुळे आज कार्यालयात केवळ अधिकारी व कर्मचारी होते. एकही दस्त नोंदणी झाली नाही. तसेच बंदमुळे वकील फिरकलेच नाहीत.

मावळ तालुक्‍यात प्रथमच अशी घटना घडली असून, अशा भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविला. वकीलांवरील भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– यशवंत गोरे, अध्यक्ष, वडगाव ऍडव्होकेटस बार असोसिएशन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)