लोणावळा परिसरात घरोघरी गौरी मातेचे आगमन

लोणावळा, (वार्ताहर) – आली गौरी आली लक्ष्मीच्या पावलानं, आली आई धन-धान्यांच्या पावलानं मावळातील ग्रामीण भागासह शहरी भागात धार्मिक विधिवत्‌ पूजन करून जलस्थानाहून वाजत गाजत देवींची पारंपरिक गाणी गात भक्‍तीमय वातावरणात आज आगमन झालेली गौराई घरोघरी विराजमान झाली.

आठवड्यापासून मावळातील महिला वर्ग गौरी आईच्या आगमनासाठी तयारीत मग्न होता. गौरींच्या स्वागतासाठी केवळ शहरातच नाही, तर विशेषत: ग्रामीण भागात घरोघरी आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, फुलांची तोरणे फळे-फुलांची सजावट तयारी पूर्ण झाली होती. तसेच देवीला नैवद्य म्हणून पंचपक्‍वान्न, फराळाचे विविध नाना प्रकार, अनेक प्रकारच्या रानभाज्या, रानफुले, फळे यांचीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवार सकाळपासून महिला, लहान मुली, माहेरवासिनींनी आपल्या लाडक्‍या गौरी आईच्या स्वागतासाठी मग्न झाल्या होत्या.

सुवासिनींनी गौरी आईचे मुखवट्यांना गावालगतच्या नद्या, खाणी आदी पाण्याच्या ठिकाणी घेऊन जाऊन स्नान घालून तिची विधीवत्‌ धर्मिक पूजन केले. घरात आकर्षक रांगोळी काढून गौरीला नवीन साडी-चोळी, विविध आकर्षक अलंकारांनी सजवण्यात आले.

गणराया प्रमाणे गौरींचीही सजावट शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागात इको फ्रेंडली करण्यात येत आहे. ग्रामीण भागात गौरीच्या सणाला एक विशेष महत्त्व आहे. घराच्या भिंती शेणाने सारवून त्यावर चुन्याने वारली चित्राकृतीचे विविध चित्रे रेखाटली जातात. यापारंपरिक व रिती-रिवाजाला साद घालत आधुनिकतेचेही प्रतिबिंब ग्रामीण भागात दिसत आहे.
मावळातील पवन, आंदर व नाणे या प्रांतातील ग्रामीण भागासह लोणावळा शहरात गौरी आईचे मोठ्या भक्तीमय वातावरणात आगमन करण्यात आले. पावसामुळे महिलांच्या आनंदावर विरजण पडले असले तरी उत्साहात तसूभरही कमी नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)